एमएच१४ बीटी ०९१२

शामराव गावडे,नवेखेड, सांगली
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

नोंद    

जगण्याला मोलाचा हातभार लावणाऱ्या प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही आपल्या संस्कृतीची शिकवण. कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी पार पाडताना आपल्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग झालेल्या साधनांची दसऱ्याच्या शिलंगणाच्या आधीच्या दिवशी, खंडेनवमीला होणारी पूजा करण्याची व्यक्त करणे हा त्याच सांस्कृतिक परंपरेचा भाग. सांगली जिल्ह्यातल्या येलूर गावच्या माणिक यादवांनी ही परंपरा एका आगळ्या भावनिक रीतीने पुढे नेली आहे. 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या असंख्य गावांशी नातं जोडलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या, एसटीच्या, चालकांच्या ताफ्यातले सदस्य माणिक यादव. गेल्या मार्चअखेर यादव एसटीच्या सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीच्या दिवशी माणिकरावांना भरून आलं होतं. आयुष्य नुसतंच सावरणाऱ्याच नव्हे तर एसटीतल्या नोकरीदरम्यान त्यांच्या भावविश्वाशी कायमच्या जोडल्या गेलेल्या एमएच १४ बीटी ०९१२ या एसटी बसच्या छायाचित्राला घरातल्या विठ्ठल- रखुमाईच्या देव्हाऱ्याशेजारचं स्थान देऊन या बसचं आपल्या आयुष्यातलं स्थान कायमचं अधोरेखित केलं आहे.

गरिबीबरोबर दोन हात करणारे यादव दहावीनंतर मिळेल ते काम करून घराला हातभार लावू लागले. हा काळ होता १९७७-७८चा. गावातल्या काही मित्रांच्या संगतीने ट्रकवर क्लीनर म्हणून काम करताना माणिकला वाहनांची गोडी लागली. दोन-तीन वर्षे क्लीनर म्हणून काम केल्यानंतर तो हळूहळू ट्रक चालवू लागला, एक चांगला वाहनचालक म्हणून ओळखला जाऊ लागला. १९८४च्या दरम्यान एसटीच्या सांगली विभागात चालक भरती निघाली, नोकरीसाठी अर्ज केला त्यात त्याची निवड झाली. छातीवर एसटी चालकाचा बिल्ला लावून मोठ्या अभिमानाने त्याने बसमध्ये पाऊल ठेवले, ते तिला लक्ष्मी मानूनच. वीस वर्षांपूर्वी मिरज आगारात असताना त्यांच्या आयुष्यात आली बस क्रमांक एमएच१४ बीटी ०९१२. 

सलग पंधरा वर्षे मिरज -शिर्डी मार्गावर ०९१२ चालवल्यावर इस्लामपुरात बदली झाल्यावर माणिकरावांनी त्यावेळच्या त्यांच्या वरिष्ठांना विनंती करून ०९१२ इस्लामपूर आगारासाठी मागून घेतली. माणिकरावांनी एमएच१४ बीटी ०९१२चं नामकरण केलं -इंद्रायणी एक्स्प्रेस. पुढच्या काचेच्यावर भरारी घेणाऱ्या गरुडाची स्थापना झाली. चालक केबिनच्या मागे लावलेल्या गणेशाच्या प्रतिमेला हार आरती करून इंद्रायणी एक्स्प्रेस रोज मार्गस्थ होत असे. येलूर –सांगली अंतर पन्नास किलोमीटरचे. वारणाकाठच्या येलूर, तांदूळवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, नागाव, बागणी अशा गावातल्या अनेक नोकरदारांचं, विद्यार्थ्यांचं वेळेच्या बाबतीत काटेकोर असणाऱ्या माणिकरावांशी आणि इंद्रायणी एक्स्प्रेसशी एक नातं जुळलं होतं. 

आज निवृत्तीनंतर एमएच१४ बीटी ०९१२ला घरातल्या देव्हाऱ्यात मांडताना माणिकरावांसमोर असंख्य आठवणी आहेत. कधीकाळी एखादा प्रवासी धावताना दिसला की इंद्रायणी एक्स्प्रेसचा वेग कमी व्हायचा. धापा टाकत बस पकडणारा प्रवासी माणिकरावांना हसून ‘यादव महाराज आभारी आहे’ म्हणायचा आणि तेही स्मितहास्य करून रोजच्या त्या सहप्रवाशाचे स्वागत करायचे. एखाद्या गावातल्या कॉलेज विद्यार्थ्याचा जेवणाचा डबा त्याचा बाप विश्वासाने त्यांच्याकडे सुपूर्द करायचा, एखादी होऊ घातलेली आई वाटेतल्या ‘दवाखान्यासमोर गाडी उभी करा दादा’ असं हक्काने सांगायची, सकाळच्या गडबडीत पर्स विसरून आलेल्या एखाद्या नोकरदार बहिणीला यादव दादांकडून तिकिटासाठी पैसे दिले जायचे. आष्ट्यात बस जितकी रिकामी व्हायची तितकीच भरायची पण. गाडीबरोबर पाठवलेले पोरांचे जेवणाचे डबे डांगे शिक्षण संकुलाच्या थांब्याजवळच्या दुकानात काढून ठेवले जायचे. मिरज वाडी, कारांदवाडी, तुंग, कसबे डिग्रज अशा मार्गाने सांगली पुलावरून इंद्रायणी एक्स्प्रेस सांगली शहरात प्रवेश करायची. मग प्रवाशांची उतरण्यासाठी गडबड. ‘चला यादव दादा संध्याकाळी भेटू’, म्हणून निरोप घेतला जायचा. सायंकाळी साडेसहा वाजता सांगलीहून मुक्कामासाठी ०९१२ निघायची, परतताना तोच मार्ग. गणेशोत्सवाच्या काळात गावागावात जेवणावळी असायच्या. तरुण कार्यकर्ते आवर्जून गाडी थांबवायचे. प्रसादाचा आग्रह व्हायचा.

‘०९१२ने मला वाटेत कधीही दगा दिला नाही, हे वैशिष्ट्य आहे’, यादव आवर्जून सांगतात. सेवानिवृत्तीच्या दिवशी निवृत्तीचा सत्कार स्वीकारण्या आधी माणिक यादव आपली ‘लक्ष्मी  माय’ आणि गणरायाच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन यावे म्हणून बसमध्ये चढले. इतक्या वर्षांचा ऋणानुबंध जणू त्यांच्या डोळ्यासमोर आला, ‘आता तुझी माझी भेट नाही,’ अशा भावनेने त्यांना हुंदका अनावर झाला. कोणीतरी सहकाऱ्यानी तो क्षण नेमका टिपला. त्या छायाचित्राला नेटकऱ्यांकडून मोठी पसंती मिळाली. त्या छायाचित्राची दखल घेत खुद्द परिवहन मंत्री अनिल परब यांनीही यादव यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले.

संबंधित बातम्या