स्वयंपाक कसा करावा?
कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर.
घरापासून दूर, शिक्षण, नोकरी वा लग्नाच्या निमित्ताने आल्यावर सुरवातीचे काही दिवस खूप आनंदात जातात. हवे ते पदार्थ कोणी न टोकता बाहेर खायला मिळतात. पण, स्वातंत्र्याचा हा आनंद लवकरच ओसरू लागतो. घरी आईजवळ राहात असताना स्वयंपाकघरात न फिरकल्याबद्दल पश्चात्ताप होऊ लागतो. काहीतरी चमचमीत; परंतु घरचे खावेसे वाटू लागते. जरुरीपुरते सामान - कुकर, पॅन किंवा तवा, तांदूळ, कणीक - बिणीक आईने बरोबर दिलेले असते (जी घेताना आपण नाके मुरडलेली असतात); पण काय व कसे करायचे माहीत नसते. चपाती करायची भीती वाटते.. अशावेळी झटपट, फारसे कौशल्य न लागणारा पदार्थ आपण करू शकतो तो म्हणजे कणकेचे
खुसखुशीत थालीपीठ
साहित्य : एक वाटी कणीक (गव्हाचे पीठ), पाव चमचा मीठ, अर्धा चहाचा (लहान) चमचा तिखट, ४ चहाचे चमचे तेल, १ टेबल स्पून दही, पाव वाटीपेक्षा थोडे जास्त पाणी.
कृती : कणकेत पाणी सोडून वरील सर्व पदार्थ मिसळून घ्यावे. मग थोडेथोडे वाटीतले पाणी टाकत सैलसर गोळा करून घ्यावा. तव्यावर किंवा पॅनवर २ चमचे तेल पसरावे. हाताला थोडे तेल अथवा पाणी लावून तो गोळा तव्यावर थापावा किंवा दुधाच्या पिशवीवर थापून घ्यावा. साधारणपणे आठ ते नऊ इंच व्यासाचे थालीपीठ थापावे व त्यात बोटाने पाच छिद्रे करावीत. एक चमचा तेल घेऊन त्या छिद्रांमधे सोडावे. हा तवा गॅसवर ठेवून गॅस मीडियम आचेवर ठेवावा. थालीपीठ झाकले जाईल अशी झाकणी ठेवावी. २-४ मिनिटांत झाकणावरची वाफ तव्यावर पडून चुर्र चुर्र आवाज येऊ लागला, की झाकण काढावे. सराट्याने थालीपीठ उचलून पाहावे व बदामीसर, लालसर झाले असल्यास तव्यावर उलटावे. पुन्हा कडेने २ चमचे तेल सोडावे. मंद आचेवर दुसऱ्याही बाजूने शेकावे.
टीप : वरील साहित्यात एक खमंग, खुसखुशीत चविष्ट थालीपीठ तयार होईल. ते लोणी, दही, दह्याचा गोडसर रायता किंवा कुठल्याही गोड लोणच्याबरोबर किंवा नुसतेही अप्रतिम लागते. तिखट किंवा मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायला हरकत नाही.