पिठले? छे छे, उकडपेंडी!!

साहित्यलक्ष्मी देशपांडे, मुंबई
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

कुकिंग-बिकिंग 

शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर.

ही ३७-३८ वर्षांपूर्वीची गोष्ट. वय १९. नुकतंच लग्न झालं होतं. ह्यांचा जिवश्‍चकंठश्‍च मित्र घरी आला होता आणि आम्हा तिघांनाही भूक लागली होती. म्हणाला, ‘वहिनी उकडपेंडी कर.’ मला जेमतेम वरण, भात, भाजी, पोळी इतकंच कसंबसं करता येत होतं. मी म्हटलं, ‘तुम्ही सांगा, मी करते.’ 
त्यांनी सांगितलं - फोडणी करायची, त्यात कांदा परतायचा. कणीक परतायची. मीठ, साखर घालायचं. पाणी घालायचं आणि वाफ येऊ द्यायची... मी तस्संच केलं. फोडणी केली, त्यात कांदा व कणीक परतली, साखर-मीठ टाकलं, पाणी टाकलं व हलवलं. ते चिकट पिठल्यासारखं झालं. काही केल्या उकडपेंडीसारखं दिसेना. शेवटी तसंच पिठलं तिघांनी खाल्लं. त्या फजितीनंतर हळूहळू स्वयंपाकाची गोडी लागली. 
आता उकडपेंडी उत्तम जमू लागली आहे. तुम्हालाही सांगते, कशी करायची ते... 

साहित्य : एक वाटी गव्हाचे पीठ, १ बारीक चिरलेला कांदा, २ हिरव्या मिरच्या, कढीलिंबाची पाने, अर्धे लिंबू, अर्धी वाटी तेल, पाव चमचा मोहोरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा तिखट, पाव वाटी दही, अर्धा चमचा मीठ, १ चमचा साखर, सुके वा ओले खोबरे व कोथिंबीर. 
कृती : कढईत अर्धी वाटी तेल घ्यावे. तेल तापल्यावर गॅस कमी करून त्यात अनुक्रमे मोहोरी, जिरे व हिंग घालावे. मोहोरी, जिरे फुटल्यावर लगेच चिरून ठेवलेला कांदा, कढीलिंबाची पाने व हिरवी मिरची घालावी. कांदा छान लालसर होऊ लागला, की त्यात एक वाटी कणीक म्हणजेच गव्हाचे पीठ टाकावे व मंद आचेवर लालसर होईपर्यंत सतत हलवत परतावे. छान खमंग वास येऊ लागला, की त्यात दही घालून परतावे. त्यानंतर हळद, तिखट, मीठ व साखर घालून ढवळून घ्यावे. नंतर हातात २-३ चमचे पाणी घेऊन शिपका मारावा व परतावे. असे शिपके मारत व परतत मोकळी उकडपेंडी झाली, की झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ येऊ द्यावी. चविष्ट उकडपेंडी तयार. 
वाढताना लिंबू पिळून वर कोथिंबीर व खोबरे पसरावे. बरोबर दही किंवा लिंबाचे गोड लोणचे द्यावे. 
उकडपेंडी करताना तेल कमी घालू नये; एकवेळ जास्त चालेल व पीठही शक्‍यतो जाडसर घ्यावे. तेल कमी घातल्यास उकडपेंडी चांगली होत नाही. पाणी कमी व थोडेथोडेच घालावे, नाहीतर गिचका होतो. साधारण अर्धी वाटी पाणी पुरेसे होईल. वरील साहित्यात साधारण दोन वाट्या वा दीड बाऊल उकडपेंडी दहा मिनिटांत तयार होईल.

संबंधित बातम्या