गाजराच्या तिखटा-मिठाच्या पुऱ्या
कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर.
मागच्या एका भागात आपण कणीक कशी भिजवायची व फुलके कसे करायचे ते शिकलो. आता आज मस्तपैकी गाजराच्या तिखटमीठाच्या पुऱ्या कशा करायच्या ते पाहू.
साहित्य : दोन वाट्या कणीक, अर्धी वाटी डाळीचे पीठ, १ वाटी गाजराचा कीस, पाव वाटी कोथिंबीर, आल्याचा छोटा तुकडा, १ हिरवी मिरची, अर्धा चमचा ओवा, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, २ चहाचे चमचे मोहनासाठी तेल, १ वाटीपेक्षा किंचित कमी पाणी आणि तळण्यासाठी तेल.
कृती : आले, लसूण, ओवा, हिरवी मिरची व वाटीतलेच थोडे पाणी मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यावी. नंतर परातीत किंवा मोठ्या बाऊलमध्ये इतर सर्व साहित्य म्हणजे वाटीतले उरलेले पाणी, गव्हाचे पीठ (कणीक), डाळीचे पीठ (बेसन), गाजराचा कीस, तिखट, हळद, मीठ, तेल घेऊन त्यात ही पेस्ट घालून कणीक घट्ट मळून घ्यावी. वरून तेलाचा हात लावून झाकून ठेवावी. दहा मिनिटांनी कणीक पुन्हा एकदा चांगली मळून घ्यावी व तिचे १५ गोळे करावेत.
आता गॅस सुरू करून कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे. एका बाजूला सर्व पुऱ्या लाटून ठेवाव्यात. एका वेळी २-३ पुऱ्या तेलात सोडाव्यात व जरा वर आल्या की झाऱ्याने हलकेच दाबाव्यात म्हणजे फुगतील. पुरी खालून जरा लालसर होऊ लागली, की पलटावी. दुसऱ्या बाजूने लालसर झाली, की झाऱ्याने पुरी कढईच्या कडेला धरावी म्हणजे तेल निथळून जाईल. मग पुरी बाहेर काढून घ्यावी व किचन टिश्यू पेपरवर ठेवावी. नंतर नारळाच्या आंबटगोड चटणीबरोबर खायला द्यावी.
टिप :
- आले लसूणाबरोबरच गाजर बारीक वाटून घातले तरी चालेल. पुरी फुटून तेलकट होण्याचा धोका कमी होईल.
- कणीक भिजवताना जास्त पाणी अजिबात घालू नये. कारण गाजराचे पाणी सुटून कणीक थोड्याच वेळात सैल होते व पुऱ्या क्रिस्प होत नाहीत.
- यदाकदाचित कणीक सैल झालीच, तर थोडे पीठ टाकून कणीक मळावी.
- वरील साहित्याच्या १५ पुऱ्या होतील.