सांजा

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 16 मार्च 2018

कुकिंग-बिकिंग    
 

साहित्य : एक वाटी रवा, २ टेबलस्पून तेल, एक बारीक चिरलेला कांदा, एक चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा ते पाऊण चमचा मीठ, दीड चमचा साखर, अर्धी वाटी हिरवा वाटाणा, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, दोन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धे लिंबू. 

कृती : कढई गॅसवर ठेवून मध्यम आचेवर गॅस पेटवावा व त्यात तेल घालून तेल गरम झाल्यावर मोहोरी घालावी. मोहोरी फुटत आली, की हिंग घालून लगेच त्यात कांदा घालून दोन मिनिटे परतावे. मग त्यात मिरची, हिरवा वाटाणा घालून ढवळून घ्यावे व झाकण ठेवून मध्यम किंवा कमी आचेवर दोन मिनिटे शिजू द्यावे. मग झाकण काढून त्यात कढीलिंबाची पाने व रवा घालावा व चांगला खरपूस होऊन किंचित बदामीसर रंग व छान वास येईपर्यंत रवा परतावा. दुसऱ्या गॅसवर दोन वाट्या पाणी उकळायला ठेवावे. आता कढईत हळूहळू हे सगळे पाणी ओतावे. मीठ व साखर घालून व्यवस्थित ढवळून झाकण ठेवावे. दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. वाढतेवेळी त्यावर कोथिंबीर व सुक्‍या खोबऱ्याचा कीस किंवा ओल्या नारळाचा चव वरून पेरावा व लिंबू पिळावे. वरील साहित्यात साधारण दोन ते तीन बाऊल सांजा १० ते १५ मिनिटांत तयार होईल. 

टीप : 

  • हा सांजा जाड, बारीक कोणत्याही रव्याचा छान लागतो. 
  • या सांज्यात शिजवताना थोडे दही घातले तरी छान चव येते. 
  • कोथिंबिरीबरोबरच वरून बारीक शेव घालूनही छान लागतो. 
  • बारीक चिरलेला फ्लॉवरही यात वाटाण्यांबरोबर घालता येतो व छान लागतो. 
  • लिंबाचे वा कैरीचे गोड लोणचे व दही याबरोबर छान लागते. 
  • रवा बाजारातून आणल्यावर लगेच चाळून, निवडून प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा डब्यात बंद करून फ्रीजमध्ये ठेवला, तर आळ्या, पोरकिडे होत नाहीत किंवा स्वच्छ केल्यावर नुसताच भाजून ठेवला तर बाहेरही चांगला राहतो. ऐनवेळी शिरा, सांजा करताना कमी भाजून चालते व वेळही वाचतो.

संबंधित बातम्या