भात

साहित्यलक्ष्मी देशपांडे
बुधवार, 21 मार्च 2018

कुकिंग-बिकिंग

शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर.

आधीच्या अंकांमध्ये आपण थालीपीठ, फुलके व गाजराच्या पुऱ्या सोप्या पद्धतीने करून पाहिल्या. आज तितक्‍याच महत्त्वाच्या अशा तांदूळ या घटकापासून बनणाऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपैकी साधा भात कसा करायचा हे पाहू. 

भात करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात दोन - तीन प्रकारचे जुने तांदूळ आणून ठेवावेत. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ मिळतात. त्यातील मुख्य आवडीने खाल्ले जाणारे तांदळाचे प्रकार म्हणजे - आंबेमोहोर, बासमती, बासमती तुकडा, सुरती कोलम, जिरेसाळ, इंद्रायणी, लुचई, काळी कमोद, चिन्नोर इत्यादी. याशिवाय हातसडीचा, बिनापॉलिशचा, ब्राऊन राइस, रेड राइस, ब्लॅक राइस इत्यादी प्रकारही मिळतात. त्यातला आपल्याला आवडेल, पचेल व परवडेल असा कोणताही जुना तांदूळ विकत आणावा. कारण नवीन तांदळाचा भात चिकट होतो व पचावयास जड असतो. 

प्रत्येक तांदळाला शिजायला लागणारा वेळ वेगळा, प्रत वेगळी, प्रकृतीला होणारे फायदे-तोटेही वेगळे व फुगून होणारे आकारमानही वेगवेगळे असते. भात शिजवायच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आत्ता फार खोलात न जाता प्रेशर कुकरमध्ये रोजचा साधा भात कसा करायचा ते पाहू. 

साहित्य : एक वाटी तांदूळ (आंबेमोहोर, चिन्नोर, सुरती कोलम किंवा कुठलाही पॉलिशचा तांदूळ), दोन वाट्या पाणी, चिमूटभर मीठ. 

कृती : तांदूळ निवडून एका पातेल्यात किंवा कुकरच्या डब्यात घ्यावा. प्यायचे पाणी घालून दोनदा ते तीनदा धुऊन पाणी काढून टाकावे. 

अर्ध्या तासाने त्या पातेल्यात दोन वाट्या प्यायचे पाणी व हवे असल्यास एक चिमूट मीठ टाकावे. आता स्वच्छ घासलेल्या कुकरमध्ये २ वाट्या प्यायचे पाणी घालावे व कुकरची जाळी तळाशी ठेवून त्यावर भाताचे पातेले अथवा डबा ठेवून कुकरचे झाकण लावावे. आता गॅस चालू करून मोठ्या आचेवर ठेवावा. कुकरची शिटी झाली, की लगेच गॅसची आच कमी करावी. बरोब्बर पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. आठ-दहा मिनिटांनी वाफ जिरली, की कुकर उघडावा. आपण सर्वसाधारणपणे खातो तसा मऊ पण मोकळा भात तयार झालेला असेल. हा भात सार, वरण, आमटी, दही, दूध, तूप या कशाबरोबरही खाता येतो व भाताचे इतर प्रकार करण्यासाठी वापरला जातो.

संबंधित बातम्या