गुरगुट्या भात 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
बुधवार, 21 मार्च 2018

कुकिंग-बिकिंग

शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर. 

गुरगुट्या भाताला तांदळाच्या तिप्पट ते चौपट पाणी हवेच! म्हणजे एक वाटी तांदूळ घेतले तर तीन ते चार वाट्या पाणी घ्यावे. १ शिट्टी झाली की गॅस कमी करून १५ मिनिटे शिजवावे व मग गॅस बंद करावा. 
गरम गरम गरगुट्या भातावर मीठ, मेतकूट व भरपूर तूप घ्यावे.. आणि मस्त ब्रह्मानंदी टाळी लावावी. गरम गरम गुरगुट्या भातावर थोडे दूध, थोडे दही, भरपूर साय, चवीला मीठ व निदान चमचाभर साजूक तूप घालून कालवावे. अहाहा! खातच राहाल! जोडीला लिंबाचे तिखटगोड जुने लोणचे घ्यावे. गरमागरम गुरगुट्या भातावर पिवळेधम्मक दाट साधे वरण, थोडे लिंबू व साजूक तुपाची धार घालून कालवले, की पण ‘अहाहा!’ असे म्हणायची वेळ येते. 
टीप्स : 

  • एक वाटी तांदळाचा भात करावयाचा असल्यास निदान ४ वाट्या पाणी मावेल एवढे मोठे पातेले घ्यावे. म्हणजे भात कुकरमध्ये सांडणार नाही. 
  • कुकरमध्ये भात करताना त्यावर झाकण ठेवल्यास भात सांडण्याची शक्‍यता वाढते. 
  • कुकर घेताना बाहेरून लावायच्या झाकणाचा व स्टीलचा घ्यावा म्हणजे स्वच्छ करायला सोपा. 
  • कुकरमध्ये प्यायचेच पाणी वापरावे म्हणजे भात यदाकदाचित उतू गेलाच तर वापरता येतो. 
  • वरणभाताचा कुकर एकत्र लावताना वरणाचे पातेले खाली ठेवून त्यावर झाकणी ठेवून मग त्यावर भाताचे पातेले या पद्धतीने ठेवावे म्हणजे वरणाचे हळद-हिंगाचे पाणी भातात जाणार नाही. भाताच्या पातेल्याला खालून वरण लागणार नाही व भात उतूही जाणार नाही. 
  • भात फार मऊ झाला आहे असे वाटल्यास पुढील वेळी पाव वाटी पाणी कमी घालावे. 
  • एक वाटी तांदळाचा साधारण तीन साडेतीन वाट्या भात होईल. रोजच्या जेवणात साधारणपणे चार माणसांसाठी एक वाटी तांदळाचा भात पुरेसा होतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या