घडीची पोळी

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

कुकिंग-बिकिंग

शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर.

आमच्या लहानपणी आम्ही मातीत खेळायचो.. चिक्कणमाती कालवून त्याची चूल करायची, फळं करायची, भाज्या करायच्या, वाळवायच्या, रंगवायच्या... असा साग्रसंगीत कार्यक्रम असायचा. शाळेत शिवण हा कंपल्सरी विषय होता. धावदोरा, टीप, गव्हाचा टाका इत्यादी टाके, बटणहोल, बटण लावणे व एक रुमाल, एक चड्डी हातानं शिवणं कंपल्सरी होतं. आयाही सगळं ‘मुलांकडूनच’ करवून घ्यायच्या. तसंच ही मातीची खेळणी/फळं करावीच लागायची. खूप मजा यायची. 

आताच्या मुलांना ना मातीत खेळण्याचा आनंद, ना हातानं वस्तू बनवण्याचा! त्यामुळं कणकेत हात चिकट झाले, की त्यांच्या अंगावर काटा येतो. स्वयंपाक करायला सुरवात करताना सगळ्यात भीती असते, किळस येते किंवा कंटाळा येतो तो कणीक भिजवण्याचा! 

 कणीक कशी भिजवायची याची पहिली पद्धत परातीत कणीक घेऊन मधे आळे करून त्यात मीठ व पाणी घालायचे व हाताने मळून गोळा करायचा. 

 दुसरी पद्धत आपण फुलके शिकताना पाहिली. त्यात खोलगट वाडग्यात आधी पाणी व मीठ घालून त्यात उजव्या हाताची पाच बोटं बुडवून भांडं डाव्या हातानं गोल फिरवलं व कणीक एकत्र झाल्यावर मळली. आता वेगळी पद्धत पाहू. 

एका खोलगट वाडग्यात एक वाटी कोमट पाणी घ्यावे. त्यात अर्धा चमचा मीठ, एक चहाचा चमचा साखर व दोन चमचे तेल घालावे. आता त्यात दोन वाट्या कणीक घालावी व खाण्याच्या काट्यानं किंवा चमच्यानं गोलगोल फिरवत मिसळावी. साधारण एक - दीड मिनिटात सगळं पीठ एकत्र गोळा झालं, की हाताला अर्धा चमचा तेल लावून गोळा दोन - तीन मिनिटं मळून घ्यावा. फार घट्ट वाटल्यास एखाद चमचा पाणी घालून मळावं. पण एक सपाट वाटी पीठ असेल तर त्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी घेतलं, की पुरतं. गोळा नीट झाकून १५-२० मिनिटं ठेवावा व नंतर पुन्हा मळून पोळ्या कराव्यात. कणीक नीट भिजवली, मळली व मुरली की पोळी फुलतेही छान व मऊपण होतं. 

तिपोडी अथवा चौपदरी घडीची पोळी 
कृती - सर्वसाधारणपणे आपल्याकडं घडीची पोळी चौपदरीच होते. वरील पिठाच्या गोळ्याचे सहा लहान गोळे करून घ्यावेत. एक गोळा घेऊन तो साधारण आपल्या चाफेकळीएवढा म्हणजेच अंगठ्याच्या जवळच्या बोटाएवढा व्यास होईल एवढा गोल लाटल्यावर बोटानं त्यावर तेल लावावं. आता त्यावर चिमूटभर तांदुळाची पिठी किंवा कणीक भुरभुरावी व अर्धी घडी करावी. आता या चंद्रकोरीवर पुन्हा बोटानं तेल लावून, पिठी पेरून घडी घालावी व पिठात घोळवून लाटावं. त्रिकोणीसर आकाराची घडीची पोळी तयार होईल. तिला बाहेरचे दोन व आतले दोन असे चार पदर असतात. पोळी लाटताना जो भाग वर असतो तो तव्याला लागेल अशा पद्धतीनं तव्यावर टाकावी. आच मध्यम असावी. एक बाजू भाजून झाल्यावर उलटावी. दुसरीही बाजू पूर्ण भाजून झाल्यावर पोळीला तव्यावर असतानाच वरच्या बाजूला साजूक तूप लावून थेट पानात वाढावी. तूप तव्याला लागू द्यायचं नाही. अप्रतिम लागते. दोन्ही बाजूनं तव्यावर तेल सोडूनही घडीची पोळी करतात. घडीची पोळी करताना फुलक्‍यासारखी फार पातळ लाटायची नाही. 

दुपोडी घडीची पोळी 
दुपोडी पोळी करताना गोळा गोल न लाटता लांबट लाटून मधे चिमटा घेऊन वरीलप्रमाणं तेल व पिठी लावून दोन्ही गोल भाग एकमेकांवर घडी घालतात. ही पोळी गोल व जरा पातळ  लाटली जाते व थोडंच तेल लावून तव्यावर शेकली जाते. हिला चपाती म्हणतात. हिला दोनच पदर असतात व ही फुलक्‍यापेक्षा जाड पण घडीच्या पोळीपेक्षा पातळ लाटतात. सर्वसाधारणपणं चपाती लाटताना पिठीचा वापर कमीतकमी करतात. फुलके व घडीची पोळी लाटताना पिठीमुळं पोळी पोळपाटावर आपोआप गोल फिरते. मात्र चपाती करताना पिठी अगदीच कमी लावल्यामुळं हातानी उचलून पोळपाटावर फिरवत फिरवत लाटतात. 

घडीच्या पोळीसाठी कणीक भिजवताना जरा जास्त तेलाचं मोहन घातलं, की पोळी खुसखुशीत होते. चवीला मीठाबरोबरच किंचित साखरही घालावी. अप्रतिम चव लागते. साखर ऐच्छिक! 

फुलके 
फुलक्‍यांसाठी कणीक भिजवताना तेल सहसा घालत नाहीत. पिठीवर गोल पातळ लाटून तव्यावरच दोन्ही बाजूंनी शेकून (कापडानं दाबत दाबत) फुलवतात अथवा तव्यावर दोन्ही बाजूंनी शेकल्यावर गॅसवर/आगीवर फुलवतात. 

माझ्या सासूबाई कधीकधी सोळा पदरी घडीची पोळी करायच्या. ती आणखीनच छान लागायची. पुढल्या वेळी ती पाहू...

संबंधित बातम्या