पत्ताकोबीची भाजी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

पत्ताकोबी बाजारातून आणताना तिला छिद्रे तर नाहीत ना हे जरूर पाहावे. छिद्रे असतील तर अळ्या आतपर्यंत पोखरत गेलेल्या असतात. अशावेळी मग प्रत्येक पान काढून नीट पाहून मग धुऊन चिरावे लागते. पत्ताकोबी चिरण्याआधी नीट धुऊन घ्यावी व मग बारीक चिरून घ्यावी. 

साहित्य ः तीन वाट्या धुऊन चिरलेली पत्ताकोबी, अर्धी वाटी भिजवलेली चणाडाळ, पाव वाटी खवलेला नारळ, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, १ चमचा साखर, २ टेबलस्पून तेल, पाऊण चमचा मीठ, एक मिरची, कोथिंबीर. 
कृती : कढईत दोन टेबलस्पून तेल घ्यावे व कढई गरम करावी. तेल तापले, की त्यात मोहोरी घालून ती फुटल्यावर हिंग, हळद व हिरव्या मिरचीचे तुकडे किंवा तिखट किंवा दोन्ही घालावे. लगेच त्यात भिजवलेली चणाडाळ घालावी व थोडे परतावे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोबीची भाजी घालावी. अर्धी - पाऊण वाटी पाणी घालावे, ढवळावे व झाकण ठेवून मंद/मध्यम आचेवर शिजवून घ्यावी. पाच मिनिटांनी झाकण काढून साखर व मीठ घालून परतावे. पाणी राहिले असल्यास आटू द्यावे. कोबी शिजली की जरा चकचकीत दिसते. मग पातेल्यात काढून त्यावर नारळ व कोथिंबीर पसरवून सजवावे. 

टिप्स : 

  • पत्ताकोबी प्रोसेसरमधे अर्ध्या मिनिटात चिरून होते. त्यासाठी फूड प्रोसेसरला स्लायसरची अटॅचमेंट लावावी. जारचे झाकण बंद करावे. पत्ताकोबीचे उभे दोन भाग करून त्यातील प्रत्येक भागाचे चार किंवा सहा उभे भाग करावे व ते उभे भाग उभेच फीडरमध्ये भरावे. प्रोसेसर सुरू करावा व वरून दाब देण्याच्या अटॅचमेंटने हलके दाबावे. अक्षरशः दोन ते चार सेकंदात सगळी कोबी एकसारखी बारीक चिरून होते. 
  • चणाडाळीच्या ऐवजी जर बटाटा वापरायचा असेल तर बटाट्याचे उभे चार तुकडे करून ते उभेच फीडरमध्ये घालून वरून दाब देत प्रोसेसरमधे काप करून घ्यावे. बाकी कृती वरीलप्रमाणेच. 
  • मटार घालूनही ही भाजी छान होते. 
  • अनेकांना या भाजीत काळा मसाला किंवा धणेजिरे घातलेले आवडते. 
  • उन्हाळ्यात पत्ताकोबीला एक प्रकारचा उग्र वास येतो. अशावेळी भाजी चिरल्यावर मिठाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून ठेवावी. 
  • भाजी शिजवताना अर्धी वाटी दूध घालून शिजवले तर उग्र वास बराच कमी होतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या