भरली वांगी

साहित्यलक्ष्मी देशपांडे    
गुरुवार, 22 मार्च 2018

शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर.

ज आपण एक अत्यंत चविष्ट, थोडी कठीण वाटणारी पण सोप्पी भाजी करणार आहोत. घरापासून दूर, पण एकदम घरच्या चवीची! 

साहित्य ः सात - आठ लहान वांगी, २ टेबल स्पून किसलेले व भाजून घेतलेले सुकेखोबरे, १ मोठा कांदा बारीक चिरून, १ चहाचा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, १ चहाचा चमचा धणेजिरे पूड, अर्धा चमचा आले पेस्ट, अर्धा चमचा मिरची पेस्ट, २-३ लसणीच्या कळ्या, एक ते दोन चमचे भरून गूळ, पाव वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी तेल, मोहोरी, हिंग व अर्धा ते पाऊण चमचा मीठ. 
कृती ः बाजारातून वांगी आणताना त्यांना छिद्रे नाहीत हे पाहून निवडून आणावीत. प्यायच्या पाण्याने वांगी स्वच्छ धुऊन घेऊन (पहिल्या छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे) एक उभा व एक आडवा छेद द्यावा. देठाचा भाग चिरायचा नाही. एका पातेल्यात दोन कप पाणी व एक चमचा मीठ घालावे. वांग्याच्या आत कीड नाही हे पाहून घ्यावे व वांगे मीठ घातलेल्या पाण्यात टाकावे. असे केल्याने वांगी काळी पडत नाहीत.
आता भाजलेले खोबरे, चिरलेला कांदा, काळा मसाला, तिखट, हळद, धणेजिरेपूड, आले, मिरची-लसूण पेस्ट, गूळ, मीठ हे एकत्र अगदी कमी पाणी घालून मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावे. वांगी पाण्यातून बाहेर काढून पाणी फेकून द्यावे. आता ह्या वाटलेल्या मिश्रणात थोडी कोथिंबीर मिसळून (छायाचित्र क्रमांक २ सारखे) वांग्यांमध्ये भरून घ्यावे. 
आता कढईत अर्धी वाटी तेल घेऊन मोहोरी, हळद, तिखट व हिंग घालून फोडणी करावी. त्यात ही भरलेली वांगी टाकून परतावी. उरलेला सगळा मसाला टाकावा. रस्सा ज्या प्रमाणात हवा त्याप्रमाणे अर्धी किंवा एक वाटी पाणी घालावे व झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. वरून कोथिंबीर पेरावी. भाकरी, लोणी, कांदा व ही भरल्या वांग्याची भाजी हा बेत सर्वसाधारणपणे एकदम सगळ्यांना आवडणारा मेन्यू आहे. 

टीप 

  •     या भाजीत कांदा, लसूण घातला नाही तरी भाजी छान होते. 
  •     मसाल्यात आवडत असल्यास चमचाभर खसखस, शेंगदाणे कूट किंवा तिळाचे कूट (भाजून व पूड करून) टाकावे. 
  •     देठे चोखून छान लागतात. आवडत नसल्यास आधीच काढून टाकावीत. 
  •     ही भाजी तेलावरच व थोडी तिखट करतात. असे करायचे असल्यास भाजी शिजवताना पाणी घालू नये. भाजीवर पाण्याचे झाकण ठेवावे. म्हणजे वाफेवरच शिजेल. अधूनमधून ढवळावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या