साधं वरण भात 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 11 मे 2018

कुकिंग-बिकिंग

शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पणनसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

आपल्याकडं आईचं दूध सुरू असताना बाळाला हळूहळू अन्न सुरू करण्याच्या वेळी म्हणजेच पाचव्या - सहाव्या महिन्यात बाळाचं उष्टावण करतात. भोवती रांगोळी काढलेल्या पाटावर बसून बाळाला मांडीवर घेऊन बाळाच्या मामानं बाळाचं उष्टावण, सोन्याच्या अंगठीनं खीर चाटवून करायचं असतं. 
त्यानंतर बाळाला चाटवला जाणारा अन्नपदार्थ म्हणजे साजूक तूप घातलेला मऊ, पातळसर वरणभात! अत्यंत सोपा आणि चविष्ट! आताच्या बुफेमधे लुप्त झालेला; परंतु, लग्नामुंजीतल्या पंगतीच्या जेवणातला, नैवेद्याच्या ताटातला आवश्‍यक पदार्थ म्हणजे साधं वरण भात. चला तर करूया साधं वरण भात.

वरणासाठी साहित्य : एक वाटी तुरीची डाळ, एक ते सव्वा वाटी पाणी, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, एक चमचा गूळ अथवा साखर, अर्धा चमचा मीठ. 
तयारी : कुकरचं भांडं घेऊन त्यात एक वाटी तुरीची डाळ घ्यावी व स्वच्छ पाण्यानं दोनदा धुऊन त्यात एक/सव्वा वाटी प्यायचं पाणी, चिमूटभर हिंग व अर्धा चमचा हळद घालून बाजूला ठेवून द्यावी. 
भातासाठी साहित्य : एक वाटी तांदूळ, दोन वाट्या पाणी, अर्धा चमचा मीठ (ऐच्छिक). 
तयारी : तांदूळ प्यायच्या पाण्यानं धुऊन त्यात दोन वाट्या प्यायचं पाणी व आवडत असल्यास मीठ घालून बाजूला ठेवून द्यावं. 
कृती : डाळ - तांदूळ धुऊन घेतल्यावर अर्ध्या तासानं कुकरमधे तीन वाट्या प्यायचं पाणी घालावं व त्यात कुकरची जाळी तळाला घालावी. जाळीवर डाळीचं भांडं ठेवावं. डाळीच्या भांड्यावर झाकण ठेवून मग त्यावर भाताचं भांडं ठेवावं आणि कुकरचं झाकण बंद करून गॅस सुरू करावा. एक शिटी झाल्यावर गॅस कमी करून मंद आचेवर सात ते आठ मिनिटे शिजू द्यावं व मग गॅस बंद करावा. 
    कुकरची वाफ गेली की त्यामधून भात व वरणाची भांडी बाहेर काढून भात पुन्हा कुकरमधे झाकण लावून ठेवून द्यावा, म्हणजे गरम राहील. 
    आता डावानं अथवा रवीनं वरण घोटून त्यात गूळ अथवा साखर आणि मीठ घालावं. वरणात एक वाटी पाणी घालून ढवळून नीट एकजीव करून घ्यावं व स्टीलच्या जाडसर पातेल्यात उकळावं. उकळी आली की गॅस बंद करावा. वरण घट्ट अथवा पातळ जसं आवडतं त्याप्रमाणं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करावं. 
    जेवताना गरम वाफेभरल्या भातावर गरमागरम वरण वाढावं. त्यावर चमचा - दोन चमचे साजूक तूप वाढावं आणि लिंबू पिळून कालवावं. मस्त लागतो. 

टिप्स : 

  • या अशा साधं वरण भातासाठी भात मऊ शिजलेला असेल तर जास्त छान लागतो. एक वाटी तांदळाला दोन वाट्या पाणी हे मऊमोकळ्या भातासाठी सामान्य प्रमाण झालं. मऊ भातासाठी थोडं पाणी जास्त घ्यावं. फडफडीत भात आवडत असेल तर एक वाटी तांदुळाला पावणेदोन वाट्या पाणी घ्यावं. 
  • समजा भात मोकळा हवा आहे अन तो मऊ झाला असेल तर भात गरम असतानाच लगेच ताटात पसरावा अथवा काट्यानं उकरावा व थोडा पंख्याखाली ठेवावा म्हणजे भाताची घट्ट वडी होणार नाही. 
  • डाळ भिजलेली असली की लवकर शिजते. त्यामुळं सकाळी चहाच्या वेळीच धुऊन ठेवली, की काम सोपं होतं. 
  • उगाच जास्त पाणी घालून वरण शिजवू नये. एक वाटी डाळीला एक वाटी पाणी पुरतं. वरणाचा घट्ट गोळा असेल तर फ्रीजमध्ये ३-४ दिवस चांगला राहातो व ऐनवेळी कोणी आलं तर त्याचे वेगवेगळे पदार्थ करता येतात. 
  • वरील साहित्याचा वरण भात साधारण चार लोकांना नेहमीच्या वरण, भात, भाजी, पोळी, चटणी, कोशिंबीरीच्या जेवणात पुरेसा होईल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या