टोमॅटोचे वरण

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 18 मे 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे सदर.

एकदा प्राथमिक साधं वरण छान बनवता आलं, की मग पुढचा प्रवास खूप आनंददायी असतो. प्रयोग करतकरत शिकताना मात्र कधी डाळ कच्चीच राहिली, डाळीनं कुकरमधे उडी घेतलीय, डाळीचं पाणी भातात जाऊन भात पिवळा झालाय, डाळ करपून विचित्र वास घरभर पसरलाय असे चित्रविचित्र अनुभव गाठीशी येतात. मग सल्ला देण्यासाठी किंवा असे मार्गदर्शनपर लेख लिहिण्यासाठी आपण सक्षम होतो. अनुभव हा माणसाचा गुरू आहे. म्हणजे, असं प्रयोगशील व्यक्तिमत्त्व असलं की मग माणसं कशा आणि किती प्रकारे चुका करू शकतात याचा फर्स्ट हॅंड अनुभव येतो व मग त्या कशा होऊ द्यायच्या नाहीत, हे सांगता येतं. वरणभात आजकाल कुकरमधेच शिजवला जातो. कुकर घेताना शक्‍यतो स्टेनलेस स्टीलचा व बाहेरून लावण्याच्या झाकणाचा घ्यावा. याचे खूप फायदे आहेत - 

  • स्टीलचा कुकर स्वच्छ करायला खूप सोपा पडतो. 
  • ॲल्युमिनिअमच्या कुकरवर आतून बाहेरून लवकर डाग पडतात. 
  • बाहेरून लावण्याच्या झाकणामुळे कुकरमधे मोठ्या आकाराची भांडी ठेवता येतात व मोदक किंवा अळूवडीचा उंडा वाफवण्याकरतासुद्धा स्टीलची मोठी चाळणी त्यावर सहज बसते. 
  • कुकर लावताना कुकर स्वच्छ असावा व त्यात खाली प्यायचेच पाणी टाकावे म्हणजे वरण आतमधे सांडल्यास ते वापरता येते.

आपण बेसिक वरण म्हणजेच साधं वरण यापूर्वीच्या भागात शिकलो आहे. आज टोमॅटोचे वरण कसे करायचे ते पाहू.

साहित्य : अर्धी वाटी तूर डाळ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, दोन चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, १ हिरवी मिरची, ७-८ लसणीच्या कळ्या, एक मोठा टोमॅटो, एक चमचा पांढरे व्हिनेगर (ऐच्छिक). 
कृती : अर्धी वाटी तूरडाळ प्यायच्या पाण्याने धुऊन घ्यावी व त्यात एक वाटी पाणी, हिंग व हळद अर्धा तास भिजवून ठेवून मग कुकरमधे मऊ शिजवून नंतर घोटून घ्यावी. टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कढीलिंबाची पानं धुऊन घ्यावीत. टोमॅटो, मिरची, कोथिंबीर वेगवेगळे बारीक चिरून घ्यावेत. लसूण सोलून, चिरून तुकडे करून ठेवावेत. 
    कढईत दोन चमचे तेल तापवून त्यात जिरे घालून ते तडतडू द्यावे. जिरे तडतडल्यावर त्यात लसणाचे व मिरचीचे तुकडे टाकून लसूण थोडा खमंग परतावा. नंतर त्यात हिंग, कढीलिंब, टोमॅटो, हळद, तिखट घालून परतून  झाकण ठेवावे व दोन मिनिटांनी झाकण काढून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवावे. त्यानंतर घोटलेले वरण त्यात घालून मीठ, साखर व एक ते दीड वाटी पाणी घालून उकळून घ्यावे. यात आवडत असल्यास एक चमचा व्हिनेगर घालावे व वाढायच्या वेळी कोथिंबीर घालावी. व्हिनेगरनं वेगळाच छान स्वाद येतो.
 

संबंधित बातम्या