स्वयंपाकघरातले उपकरण
कुकिंग-बिकिंग
बहुतेक घरांमध्ये साधारण पन्नासएक वर्षांपूर्वी पाटावरवंट्याऐवजी मिक्सर आला आणि बायकांच्या कामांमध्ये क्रांतीच घडून आली. तशी स्थिती फूड प्रोसेसर आल्यावर येईल असे वाटले व फूड प्रोसेसरची खरेदीही घरोघरी झाली. परंतु त्याचा वापर मात्र बऱ्याच घरांमधून मिक्सरच्या कामापुरता मर्यादित राहिला. फारतर कणीक मळणे व्हायला लागले. पण तरीही प्रोसेसरचा पूर्ण उपयोग फार कमी घरांमध्ये केला जातो. कारणे अनेक.. ती कशी बाजूला करता येतील आणि रोजच्या स्वयंपाकासाठी कसा त्याचा पुरेपूर उपयोग करून कष्ट व वेळ वाचवता येईल हे आज पाहू.
समजा मला गुळाच्या पोळ्या, गोळाभात, काकडीची कोशिंबीर, कढी, कांद्याची भजी, चिरोटे, नारळाची चटणी, पत्ताकोबीची भाजी इत्यादी गोष्टी करायच्या आहेत. मदतीला फक्त फूड प्रोसेसर! बाई नाही! तर एवढा स्वयंपाक करता येईल का? तोही कमी श्रमात, कमी वेळात आणि आनंदाने? तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे.
फूड प्रोसेसरची भीती आणि बाऊ करणे थांबवून कल्पनाशक्तीला चालना दिली तर हे सहज शक्य आहे. करूनच पाहू कसे ते!
पहिल्यांदा गूळपोळीसाठीची कणीक प्रोसेसरच्या भांड्यात टाकून त्यात मोहन व मीठ टाकून कणकेच्या अर्ध्या मापात कोमट पाणी हळूहळू टाकत भिजवून घेऊ. वेळ जास्तीत जास्त दोन मिनिटे.
ह्या कणकेच्या गोळ्याला तेलाचा हात लावून झाकून ठेवले, की लगेच त्याच भांड्यात चिरोट्यांसाठीचा मैदा (किंवा रवा व मैदा) त्याच पद्धतीने भिजवून गोळा करून घेऊ व तेलाचा हात लावून झाकून ठेवू. वेळ जास्तीत जास्त दोन मिनिटे.
आता याच भांड्यातले ब्लेड काढून नारळ खवायची ॲटॅचमेंट लावून घेऊन नारळ खवून घेऊ. याला जरा वेळ लागेल पण ५-६ मिनिटांच्या वर नाही.
आता नारळाची ॲटॅचमेंट खवलेल्या नारळासह बाजूला काढून स्लायसरची ॲटॅचमेंट लावायची. वेळ अर्धा मिनीट. आता पत्ताकोबीचे, मधला कडक भाग काढून, उभे सहा किंवा आठ तुकडे करून, तीन तुकडे झाकणाच्या फीडरमध्ये टाकून वरून त्याला पुशरने प्रेस करून हाय स्पीडवर फिरवायचे. पाच सेकंदांत बारीक चिरून तयार! अख्खा एक (किलोभराचा) कोबी चिरायला एक दीड मिनीट पुष्कळ झाले.
जरा आणखीन बारीक चिरलेला कोबी हवा असेल, तर स्लायसरची ॲटॅचमेंट न लावता कणीक भिजवायसाठीचे ब्लेड पुन्हा लावायचे व सरळ कोबीचे मोठे ६-८ तुकडे त्यात टाकायचे. टर्बो बटन दाबत बारीक होईपर्यंत फिरवायचे. वेळ अर्धा ते एक मिनीट.
आता कोबी काढून त्याच प्रोसेसरमध्ये २-३ काकड्या, २-२ किंवा ३-३ तुकडे करून, अख्खी मिरची मोठी कापून किंवा तशीच, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, हवे असल्यास दही व मीठ साखर घालून झाकण लावून टर्बोवर हवे तेवढे बारीक होईपर्यंत फिरवायचे. कोशिंबीर फक्त अर्ध्या मिनिटात तयार! फोडणी घातली तरी चालेल. नाही घातली तरी चालेल.
ही कोशिंबीर निपटून काढून घेतली, की त्याच भांड्यात दही+बेसन+साखर+मीठ +हळद+पाणी व किसलेले आले घालून फिरवून घ्यावे. कढीच्या तयारीला वेळ फक्त अर्धा मिनीट.
कढी पातेल्यात काढून घेतली, की भज्यांसाठी प्रोसेसरमध्ये बेसन, कोथिंबीर, मिरची, तिखट-मीठ, ओवा, मोहन, पाणी घालून पाव ते अर्धा मिनीट फिरवून घ्यावे. भांडे उघडून फक्त ब्लेड काढून त्याजागी स्लायसरची ॲटॅचमेंट लावावी व झाकणातल्या फीडरमध्ये अर्धे कापलेले सोललेले कांदे टाकून हाय स्पीडवर कांदे लांबलांब चिरून घ्यावेत. कांद्याऐवजी बटाटे हवे तर स्लाइस करून घ्यावे. वेळ १ मिनीट टोटल. हे सगळे भांड्यात काढून घ्यावे व भजी तळावी.
आता गुळाच्या पोळीसाठी गूळ फोडून लहान तुकडे करून मिक्सरच्या लहान भांड्यात घ्यावा. त्यात भाजलेले तीळ, खोबरे, खसखस, तेलात भाजलेले बेसन व अर्धा चमचा तेल किंवा तूप घालून फिरवावे. अर्ध्या मिनिटात मऊसूत गूळ पोळीसाठी तयार होतो. असा सगळा गूळ तयार करून घ्यावा.
आता गूळ काढून घेतल्यावर मिक्सरमध्ये चटणीचे साहित्य घालून चटणी वाटून घ्यावी.
तुमच्या लक्षात आले असेल, की मी मधे एकदाही प्रोसेसर किंवा मिक्सरचे भांडे धुऊन घ्या म्हटलेले नाही. कारण तशी गरजच पडत नाही. अगदीच दोन पदार्थांचे वास मॅच होणारे नसतील तर गोष्ट वेगळी.
मी याच पद्धतीने प्रोसेसर व मिक्सर रोज दणकून वापरते. त्यामुळे माझा स्वयंपाक खूपच सोपा व कमी कष्टाचा झाला आहे. असाच तो तुम्हा सगळ्यांचा होवो.
टीप्स :
- प्रोसेसर हा ओट्यावर सहजपणे हाताळता येईल असे इलेक्ट्रिक कनेक्शन जोडूनच ठेवावे व त्याशेजारीच एका कप्प्यात सगळ्या ॲटॅचमेंट्स ठेवाव्यात. म्हणजे प्रोसेसर वापरला जाईल. अनेकांकडे तो कपाटात बंद करून ठेवतात. मग तो फक्त शोभेची वस्तू बनून राहातो.
- प्रोसेसरची भांडी बिनदिक्कत बाईकडे धुवायला टाकावीत. हवे तर तिला एकदा कशी धुवायची ते दाखवून द्यावे. म्हणजे मग आपण प्रोसेसर वापरायचा कंटाळा करत नाही. मी टाकते. शेवटी आपल्यासाठी यंत्र! यंत्रांसाठी आपण नव्हे!