मटकीची उसळ 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 15 जून 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे नवीन सदर.

मोड आलेली कडधान्ये खाणे हा प्रथिने व व्हिटॅमिन्स मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. रोजच्या जेवणात कडधान्याची वाटीभर उसळ खाल्ली तर पुरेशी प्रथिने आपल्याला मिळू शकतील. 

आपल्याकडे मूग, मटकी, पांढरा वाटाणा, काळा वाटाणा, लाल चणे, हिरवे चणे, काबुली चणे, मसूर, अख्खे उडीद, राजमा इत्यादी अनेक प्रकारची कडधान्ये मिळतात. 

कडधान्याला मोड आणले, की ती पचायला सोपी होतात आणि त्यातल्या व्हिटॅमिन्सच्या प्रमाणात प्रचंड वाढ होते. व्हिटॅमिन सी तर मोड आणण्याच्या प्रक्रियेतच तयार होते. अर्थात कडधान्ये आठवड्यातून कितीदा खावीत हे ज्याने त्याने आपल्या पचनाच्या क्षमतेप्रमाणे ठरवावे. 

कडधान्याला मोड आणणे ही तशी सोपी गोष्ट आहे. कुठलेही कडधान्य स्वच्छ धुऊन दुप्पट पाण्यात किमान ६-७ तास भिजू द्यावे. म्हणजे, सकाळी १० वाजता कडधान्य भिजत घातले तर संध्याकाळी ५-६ वाजेकडे मोठ्या गाळणीत एखादा कपडा घालून त्यावर ओतावे म्हणजे जास्तीचे सगळे पाणी निघून जाईल. थोडे नळाखाली धरावे व मग त्या कपड्याची चारी टोके एकत्र करून घट्ट पुरचुंडी बांधावी व चाळणीत ठेवून द्यावी. ४-५ तासांनी कपडा वाळला असेल तर पाण्याचा शिपका मारावा. असे घट्ट बांधल्याने मोड लवकर येतात. 

कपड्यात न बांधता, भिजवलेले कडधान्य नुसतेच गाळणीत काढून घेऊन पाण्याखाली धरावे व मग गाळणी एखाद्या अडणीवर ठेवून गाळणीवर झाकण ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी छान मोड आलेले दिसतील. आणखी लांब मोड हवे असतील तर आणखी सात-आठ तास ठेवावे. थोडक्‍यात, उसळीसाठी २८ ते ३० तास आधी योजना करावी. 

कडधान्याला मोड आणण्यासाठी एक चार थरांचा प्लास्टिकचा डबाही मिळतो. त्यात एका वेळी तीन वेगवेगळ्या कडधान्यांना मोड आणता येतात. दिसतेही सुरेख; पण बरेचदा त्यातल्या पाण्याचा निचरा बरोबर होत नाही व मग कडधान्याला वास येऊ शकतो. 

आज आपण ‘मटकीची उसळ’ करणार आहोत. 
साहित्य ः एक वाटी मटकी, दोन चमचे तेल, अर्धा चमचा मोहोरी, चिमूटभर हिंग, 
अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, १ हिरवी मिरची, गुळाचा लहान लिंबाएवढा खडा, पाऊण चमचा काळा/गोडा मसाला, अर्ध्या चमच्यापेक्षा थोडे जास्त मीठ, २ चमचे चिंचेचा कोळ, कोथिंबीर व नारळाचा चव (कांदा, लसूण ऐच्छिक). 

कृती ः उसळ करायच्या २४ ते ३० तास आधी एक वाटी मटकी निवडून, धुऊन २-३ वाट्या प्यायच्या पाण्यात भिजत घालावी. सात-आठ तासांनी पाणी काढून, धुऊन वरील पद्धतीने मोड आणून घ्यावे. एक वाटी मटकी चांगले मोड आल्यावर साधारण अडीच वाट्या होईल. आता एका कढईत तेल गरम करून मोहोरी, हिंग, मिरची, हळद, तिखट घालून फोडणी करावी. आवडत असल्यास एक कांदा बारीक चिरून, लसणाच्या ३-४ कळ्या ठेचून त्यात घालाव्यात व लालसर रंग आला की त्यात मोड आलेली मटकी टाकावी. दोन मिनिटे परतून रस जितका हवा त्या प्रमाणात पाणी (साधारण दीड-दोन वाट्या) घालून झाकण ठेवून १०-१२ मिनिटे शिजवावे. आता त्यात मीठ, गूळ, चिंचेचा कोळ, काळा मसाला घालून आणखी ४-५ मिनिटे शिजवावे व वाढताना ओला नारळ कोथिंबीर पेरून वाढावे. 

टीप :

  • मटकीची उसळ लोखंडी कढईत केली तर उसळ काळी पडते. त्यामुळे स्टेनलेस स्टील, पितळ, काच, नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमची कढई वापरावी. मटकीशिवाय इतर बहुतेक कुठलेही कडधान्य लोखंडी कढईत करताना काळे पडत नाही. 
  • वेगवेगळ्या कडधान्याला मोड यायला वेगवेगळ्या हवामानात वेगवेगळा वेळ लागतो. 
  • पुरेसे मोड आलेले कडधान्य एखाद्या डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठ दिवस चांगले राहू शकते. त्यात पाणी मात्र अजिबात नको. 
  • भिजवलेले कडधान्य पाण्यात सात - आठ तासांपेक्षा जास्त काळ राहिले तर मोड येतीलच; पण कडधान्याला घाणेरडा वास येऊ लागेल. असा वास येऊ लागला की तो वास, कडधान्य नंतर कितीही धुतले तरी जात नाही. असे वास येणारे कडधान्य मग पाखरे किंवा गुरांना खाऊ घालावे किंवा सरळ खतासाठी वापरावे. कितीही मसाला घालून वास घालवण्याचा प्रयत्न केला तरी तो वास जात नाही व पदार्थ वाया जातो. 
  • एक वाटी मटकी घेतली तर भिजवून, मोड आणून केलेली तिची उसळ ४ जणांना पुरेल.

संबंधित बातम्या