कांद्याची भजी

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 21 जून 2018

कुकिंग-बिकिंग
 

खूप अंधारून आलंय, मस्त धुवांधार पाऊस पडतोय, हवेत गारवा आलाय अशा वेळी सगळ्यात जास्त आठवण येते ती कांद्याच्या गरमागरम भज्यांची व भरपूर आलं व गवती चहा घालून केलेल्या वाफाळत्या चहाची! 

एक मस्त मोठी खिडकी.. त्यात नुकतंच नखशिखांत भिजून येऊन कपडे बदलून अंगावर एक ऊबदार रजई गुरफटून घेऊन आपण बसलोय... हातात एखादे छान पुस्तक, किंचितसा सर्दीचा आभास आणि आईनं हळुचकन आणून दिलेली कांद्याच्या भज्यांची बशी आणि आल्याचा गरमागरम वाफाळता चहा...! हे लहानपणी, तरुणपणी उपभोगलेलं सुख प्रत्येक पावसाळ्यात आईची आठवण करून देतं. आई गेली. पुस्तकं बदलली... महाबली वेताळ आणि चांदोबाची जागा रोमॅंटिक कादंबऱ्यांनी घेतली, पण भजी आणि चहा मात्र आयुष्याचा अविभाज्य भाग बनून राहिलं. आज कांद्याची भजीच करूया. 

कांद्याची भजी 
साहित्य ः चार मोठे कांदे उभे काप केलेले, दोन वाट्या बेसन, एक टेबलस्पून तांदळाची पिठी, एक चहाचा चमचा ओवा, मसाल्याच्या छोट्या चमच्याने एक चमचा हळद, २ चमचे तिखट, २ टेबल स्पून चिरलेली कोथिंबीर, ५-६ हिरव्या मिरच्या (देठासकट पण मधे उभा छेद देऊन), पाऊण ते एक चहाचा चमचा मीठ, पाव चहाचा चमचा खायचा सोडा व तळायला तेल. 
कृती ः साले व मधला देठाजवळचा पांढरा कडक भाग काढून कांदे धुऊन कांद्यांचे पातळ उभे काप करावेत. त्यात मीठ, तिखट, ओवा, हळद घालून दहा मिनिटे झाकून ठेवावे म्हणजे कांद्याला थोडे पाणी सुटेल. दहा मिनिटांनी त्यात तांदळाची पिठी, सोडा, कोथिंबीर, मिरच्या व एखादं चमचा गरम तेल टाकून थोडेथोडे बेसन घालत हाताने कालवावे. साधारण सगळ्या कांद्याला व्यवस्थित कोटिंग होईल इतपत बेसन घालावे. कांदा अगदीच कोरडा वाटल्यास एखादं टेबल स्पून पाणी घालावे. 
एका बाजूला तेल तापत ठेवावे व हाताने भजी तेलात सोडावी. चमच्याने टाकलीत तरी चालेल. मिरच्यांवरही बेसनाचे कोटिंग आले असेल. त्याही तळून घ्याव्या. तांदळाचे पीठ घातल्याने भजी छान कुरकुरीत होतात व सोडा घातल्याने हलकी होतात. साधारणतः २ - ३ जणांना एवढी भजी पुरावीत. 
भज्यांबरोबर कडक चहा पण हवाच.. बघूया तोही करून... 

आल्याचा चहा 
साहित्य ः पाऊण कप पाणी (१७५ मिली) गवती चहाचे एक पान बारीक तुकडे करून, पाव चमचा किसलेले आले, चहाच्या चमच्याने दोन चमचे चहा, दोन चमचे साखर व पाव कप दूध. 
कृती ः चहाच्या पातेल्यात दूध व चहा वगळून सर्व साहित्य घालावे. पाण्याला उकळी फुटली की चहापत्ती/पावडर घालावी व एका मिनिटाने दूध घालावे. पुन्हा उकळी आली की गॅस बंद करून झाकण ठेवावे. दोन मिनिटांनी चहा गाळावा. सर्दी झालेली असताना किंवा पावसाळ्यात हा कडक चहा आराम देतो. 

टीप 
    भजी करताना तांदळाचे पीठ किंवा सोडा घातला नाही तरी चालेल. 
    तळण्याआधी पिठाची चव घेऊन पाहावी. आवडीप्रमाणे प्रमाणात बदल करता येईल. 
    तेल गरम असावे परंतु मध्यम आचेवर भजी तळावी म्हणजे न करपता कुरकुरीत होतील.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या