टोमॅटोचे सार
कुकिंग-बिकिंग
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जेवताना, विशेषतः संध्याकाळी, काहीतरी गरम पेय हवेसे वाटते. आपल्या भारतीय विशेषतः महाराष्ट्रीयन जेवणाबरोबर सूप तितकेसे बरोबर वाटत नाही. ताकही नको वाटते. अशा वेळी वरणाऐवजी सार केले तर जास्त चांगले वाटते.
सूप हे पाश्चात्त्य पद्धतीच्या जेवणाअगोदर क्षुधावर्धक पेय म्हणून घेतले जाते, तर सार हे भारतीय जेवणात मुख्य जेवणातील एक पदार्थ म्हणून केले जाते. सूपला फोडणी घालत नाहीत तर साराला फोडणी बहुधा घालतातच. आज आपण टोमॅटोचे सार करूया.
साहित्य ः सहा टोमॅटो, ४ लसणाच्या पाकळ्या, १ हिरवी मिरची, १०-१२ कढीलिंबाची पानं, अर्धी वाटी खवलेला नारळ, २ चमचे साजूक तूप, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, २-३ चमचे साखर, १ सपाट चमचा मीठ.
कृती ः टोमॅटो धुऊन त्यांचे चार चार तुकडे करून कुकरच्या मोठ्या भांड्यात घ्यावे. त्यात लसणीच्या ३-४ पाकळ्या सोलून घालाव्या व त्यात दोन वाट्या पाणी घालून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये वरण-भाताबरोबर शिजवून घ्यावे.
कुकर झाल्यावर टोमॅटो थंड होऊ द्यावे व थंड झाल्यावर त्यात नारळ घालून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यावे.
आता एका कढईत दोन चमचे तूप गरम करावे व त्यात जिरे घालून ते तडतडल्यावर त्यात हिंग, हिरवी मिरची, कढीलिंब, हळद घालून फोडणी करावी.
त्यात वाटलेल्या टोमॅटो-लसूण-खोबऱ्याचा रस गाळून अथवा तसाच घालावा. दोन ते तीन वाट्या पाणी घालावे व मीठ आणि साखर घालून छान उकळी आणावी आणि गॅस बंद करावा.
वाढतेवेळी त्यात कोथिंबीर घालावी. हे गरम गरम आंबटगोड सार मसालेभात, पुलाव इत्यादी बेत केलेला असताना वरणाऐवजी करता येते व छान लागते. विशेषतः हिवाळ्यात व पावसाळ्यात हे करावे. गरम सार साधारण माणशी दोन वाट्या या अंदाजाने करावे. हे सार पोळी व तुपाबरोबरही मस्त लागते व साध्या तूप भाताबरोबरही! वरील साहित्याचे साधारण सहा वाट्या सार तयार होईल.
टीप
- घाईत सार करायचे असेल तेव्हा टोमॅटो, नारळ व लसूण कच्चेच घेऊन मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावे व वरीलप्रमाणे इतर कृती करावी. हेही सार छान लागते.
- छोट्या जारमधून बारीक वाटले तर गाळण्याची गरज पडत नाही.
- टोमॅटोची साले व बिया काढायच्याच असल्यास उकडल्यावर साले काढावीत व मग मिक्सरमधून काढल्यावर मोठ्या गाळणीने गाळून घ्यावे.
- घडीची पोळी कुस्करून त्यावर सार व तूप घालून कालवून खावे. मस्त लागते.
- टोमॅटोच्या आंबटपणाप्रमाणे साखर, मीठ व पाण्याचे प्रमाण निश्चित करावे.