वांग्याचे भरीत

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

‘लसूण, कांदे, वांगे यांची 
संगत कधी नऽऽ सोडावी 
सोडावी तर सोडावी 
चातुर्मासात सोडावी’ 

आषाढी एकादशीला म्हणजेच २३ जुलैला चातुर्मास सुरू झाला तो थेट कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे २० नोव्हेंबरपर्यंत आहे. पूर्वी सगळे लोक चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी, मुळा, भोपळा वगैरे भाज्या, अभक्ष्य खात नसत. हे सर्व पदार्थ आयुर्वेदिक दृष्टीने निषिद्ध असायचे कारण या काळात पचनासाठी हे पदार्थ जड असतात. नारळी पौर्णिमेपर्यंत मासे खात नसत. समुद्रात नौका घालणे धोकादायक हे एक कारण व या काळात समुद्रात माशांची भरपूर संख्यावाढ व्हावी हा त्यामागचा मुख्य उद्देश असायचा. अजूनही भारतभर अनेक लोक ही बंधने काटेकोरपणे पाळतात .काहीजण धार्मिक कारणांसाठी व काहीजण प्रकृतिस्वास्थ्यासाठी. परंतु, माझ्यासारखे अनेक लोक असतात; ज्यांना भाजीबाजारात गेल्यावर दिसणारी मोठ्ठाल्ली जांभळीकाळी चमकदार वांगी पाहिल्यावर ती विकत घेऊन घरी आणल्याशिवाय आणि त्याचे खमंग भरीत करून खाल्ल्याशिवाय जमतच नाही. वांगी भाजायला ठेवल्यावर घरभर सुटणारा त्याचा वास मन वेडे करतो आणि मग मस्त वांग्याचे झणझणीत भरीत, शेंगदाण्याची सोलापुरी चटणी, गरमागरम ज्वारी/बाजरीची भाकरी, घरच्या ताज्या लोण्याचा गोळा आणि बुक्कीने फोडलेला कांदा असा फक्कड बेत होतो. 

बाजारात वांगी दिसल्यापासून त्याचे भरीत पोटात घालून तृप्तीचा ढेकर देईपर्यंतचा प्रवास हा एक उत्सव असतो. 

साहित्य ः एक भरताचे मोठे वांगे, २ कांदे, लसणाच्या ५-६ कळ्या, २ टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी हिरवे वाटाणे, अर्धी वाटी कोथिंबीर, पाव ते अर्धी वाटी तेल, अर्धा चहाचा चमचा मोहोरी, अर्धा चहाचा चमचा हळद, १ चहाचा चमचा तिखट, चहाचा पाव चमचा हिंग, पाऊण ते १ चमचा मीठ, दीड चमचा साखर. 

कृती ः साहित्यातील सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. वांग्याला तेलाचा हात लावून फोटोतल्याप्रमाणे देठासकट मोठ्या आचेवर गॅसवर भाजायला ठेवावे. एक एक मिनिटाने ते देठाला पकडून फिरवत फिरवत सर्व बाजूंनी मऊ होऊन साल सुटू लागेपर्यंत भाजावे. देठाजवळचा भाग शिजायला वेळ लागतो. तोही नीट भाजून घ्यावा व वांगे ताटलीत ठेवून थोडे थंड होऊ द्यावे. वांगे थंड होईपर्यंत कांदे, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर, लसूण बारीक चिरून घ्यावेत व एका ताटलीत वेगवेगळे ठेवावे. 

आता वांग्याची साल बोटांनी किंवा सुरीने हलकेच काढून घ्यावी. थोडे जळलेल्या सालीचे तुकडे चिकटलेले राहिले तरी चालतात. छान चव येते. आता फोटोतल्याप्रमाणे वांग्याला देठापासून उभा छेद द्यावा व वांगे सुरीनेच उकलत आतमधे कीड किंवा आळी नाही याची खात्री करावी. आता वांगे फोटोतल्याप्रमाणे आडवे धरून कापून घ्यावे म्हणजे वांग्याच्या लांब रेषा राहणार नाहीत. 

आता गॅस सुरू करून कढईत पाव वाटीपेक्षा थोडे जास्त तेल घालावे. तेल तापले की अर्धा चमचा मोहोरी घालून ती तडतडली की पाव चमचा हिंग घालावा व लगेच चिरलेला कांदा व लसूण घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावे. आता त्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा तिखट व हिरवी मिरची घालून परतावे व मग त्यात चिरलेला टोमॅटो व हिरवे वाटाणे घालून पुन्हा परतावे व झाकण ठेवून गॅस कमी करावा. दोन मिनिटांनी झाकण काढून त्यात भाजून चिरलेले वांगे त्याला सुटलेल्या रसासकट घालावे. देठही घालावा. हा देठ चोखायला छान लागतो. 

पाऊण ते एक चमचा मीठ व दीड चमचा साखर घालावी. चिरलेल्या कोथिंबीरीतील अर्धी कोथिंबीर घालावी व दोन मिनिटे छान परतून झाकण ठेवावे व आणखी दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. वाढताना त्यावर उरलेली कोथिंबीर पेरावी.  

टीप 

  • वांगी विकत घेताना टणक, चमकदार व बिनाछिद्राची अशी नीट पाहून घ्यावी. लहान जरी छिद्र असेल तरी आत अळी असते व मग भाजल्यावर ते वांगे अळी निघाल्यास टाकून देण्याची वेळ येते. वांगे वरून चांगले दिसले तरी एखादवेळी क्वचित आत अळी असू शकते म्हणून भाजल्यावर नीट पाहणे आवश्‍यक. 
  • वांग्याचे भरीत खमंग छान लागण्यासाठी तेल, तिखट, मीठ सगळेच किंचित जास्त प्रमाणात लागते. पण आपल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करण्यास हरकत नाही. 
  • वांगे भाजताना गॅसखाली ताटली ठेवावी व त्यात सांडलेला वांग्याचा रस भरतात घालावा. 
  • वरील प्रमाणात केलेले भरीत साधारण ३ वाट्या भरून होईल व भाकरीबरोबर पिठल्यासारखा इतर पदार्थ नसल्यास २-३ जणांना पुरेल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या