रव्याच्या चंद्रकोरी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

कुकिंग-बिकिंग
 

आजोळच्या आठवणी सांगायला बसले तर वेळ पुरणार नाही. पण दुपारी चटईवर आजीच्या पोटाशी झोपून तिच्या छान सुटलेल्या पोटाला हात लावून खेळत, तिने सांगितलेल्या आवडती नावडती, काऊचिऊ किंवा इसापनीतीमधल्या गोष्टी ऐकताऐकता झोप लागायची. जाग यायची ती आजी करत असलेल्या नाश्‍त्याच्या पदार्थाच्या घमघमाटाने! ती केव्हा उठायची, केव्हा सगळे करायची माहीत नाही, पण आजीच्या हातच्या वस्तूंना वेगळीच गोडी असायची. अशीच आपली आठवण नातींच्याही मनात राहावी आणि त्यांचेही बालपण आपल्या बालपणासारखे इतके सुखाचे जावे की नुसती आठवण झाली तरी जगातले ताणतणाव विसरायला व्हावे, असे वाटते. 

आजी स्वयंपाकघरात सतत काही ना काही करत असायची. नारळ खवताना तिच्याजवळ गेल्यावर खवलेला नारळ चिमुकल्या हातावर ठेवायची. पुन्हा मागितले तरी द्यायची. आम्हाला मुले झाल्यावर म्हणायची, ‘हाताने ‘नाही’ म्हणावे, तोंडानी ‘नाही’ म्हणू नये.’ (म्हणजे दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा मागितले तर अगदी थोडेसेच द्यावे; पण, ‘नाही’ म्हणू नये.) अशा छोट्या गोष्टी सहजपणे आजीकडून शिकता आल्या. केलेला पदार्थ सगळ्यांना मिळालाच पाहिजे हा तिचा कटाक्ष असायचा. पण, स्वतःसाठी पदार्थ उरला नाही तर सगळ्यांना आवडला याचाच आनंद तिला असायचा. स्वतःला मिळाला नाही याची खंत नाही. 

सध्या नाती आल्या आहेत. येता जाता, खाऊ खायला या चंद्रकोरी मुद्दाम केल्यात. ‘आमची आजी आमच्यासाठी चंद्रकोरी करायची, चकल्या करायची, साखरपाऱ्याच्या वड्या करायची, धिरडी करायची, लाडू करायची..’ हे त्यांना अभिमानाने त्यांच्या नातवंडांना सांगता यायला हवे ना! आज माझ्या नातींसाठी केलेल्या चंद्रकोरींची कृती तुमच्यासाठी देते आहे. 

साहित्य ः दोन वाट्या अगदी बारीक रवा, अर्धा चमचा मीठ, २ टेबलस्पून तेल, १ चमचा ओवा, पाव चमचा मिऱ्याची जाडसर पूड, एक चमचा कलौंजी व तळण्यासाठी तेल. 

कृती ः बाजारात तीन प्रकारचा रवा मिळतो. परातीत त्यातील अगदी बारीक रवा २ वाट्या घ्यावा. रवा नीट चाळून, निवडून स्वच्छ करून घ्यावा. २ मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून ते तेल रव्यावर टाकून चमच्याने नीट मिसळून घ्यावे. यात आता एक चमचा मीठ, मिऱ्याची पाव चमचा जाडसर पूड, एक चमचा कलौंजी व एक चमचा ओवा घालावा. नंतर थोडे थोडे पाणी घालून पोळीच्या कणकेपेक्षा थोडा सैल गोळा मळून घ्यावा व त्यावर स्वच्छ ओले फडके पसरून झाकण ठेवावे. गोळा २-३ तास तसाच राहू द्यावा. २-३ तासांनंतर गोळा पुन्हा हाताला थोडे तेल लावून मळून घ्यावा. या गोळ्याच्या ३-४ थोड्या जाडसर पोळ्या लाटून घ्याव्यात. एक छोटी नैवेद्याची वाटी किंवा झाकण किंवा कटर घेऊन फोटोतल्यासारख्या चंद्रकोरी कट करून वेगळ्या ताटलीत काढून घ्याव्या. छोटे झाकण/वाटी घेतली व पोळी किंचित जास्त जाड घेतली तर शंकरपाळे तळल्यावर तळलेल्या काजूंसारखे दिसतील. 

एका बाजूला गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाल्यावर गॅस मंद करून १५-२० चंद्रकोरी त्यात सोडाव्या व गुलाबीसर रंगावर दोन्ही बाजूंनी तळाव्या. याप्रमाणे सगळ्या चंद्रकोरी मंद आचेवर तळून घ्याव्यात. छान खुसखुशीत होतात. वेगवेगळे कटर वापरून वेगवेगळे आकारही तळता येतील. मुलांना खूप आवडतात. रव्याऐवजी मैदा वापरला तरीही चालेल. मैदा घेतल्यास गोळा २-३ तास भिजवून ठेवायची गरज नाही. पण मग गोळा घट्ट भिजवावा सैल नको.

फोटो फीचर

संबंधित बातम्या