कोबी कोफ्ता करी

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कुकिंग-बिकिंग
 

कोफ्त्यासाठी साहित्य : २ वाट्या बारीक चिरलेली पत्ताकोबीची भाजी, एक वाटी बेसन, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, एक हिरवी मिरची, दोन चमचे कोथिंबीर व कोफ्ते तळायला तेल. 

करीसाठी साहित्य : ४ चमचे तेल, एक मोठा कांदा, २ टोमॅटो, लसणीच्या ५-६ पाकळ्या, ‘आल्या’चा छोटा तुकडा (साधारण लसणींच्या एकूण आकारमानाएवढा), १/२ चमचा हळद, १ चमचा तिखट, १/२ चमचा जिरेपूड, १ चमचा धणेपूड, एक चमचा चिकन मसाला अथवा अर्धा चमचा गरम मसाला, दोन चमचे कोथिंबीर. 

कृती : पत्ताकोबी स्वच्छ धुऊन घ्यावी. वरच्या पानांवर छिद्र असेल तर एकेक पान काढून पाहावे. आत बारीक अळी असू शकते. छिद्र असलेली पाने नीट पाहून तीही बारीक चिरून घ्यावी. बारीक चिरलेली साधारण दोन वाट्या पत्ताकोबी घ्यावी व त्यात एक वाटी बेसन, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, एक हिरवी मिरची, दोन चमचे कोथिंबीर घालून कालवावे. कोरडे वाटल्यास थोडेसे पाणी घालावे व लहान गुलाबजामच्या आकाराचे गोळे करून कढईत गरम तेलात तळून घ्यावे. तेल निथळण्यासाठी टिश्‍यूपेपरवर ठेवावेत. गोळे न करता भज्यांसारखे तळले तरी चालतील. 
आता मिक्‍सरमधे एक मोठा कांदा तुकडे करून, २ टोमॅटोंचे चार-चार तुकडे करून, लसणीच्या ५-६ पाकळ्या, आल्याचा छोटा तुकडा थोडा ठेचून, १/२ चमचा हळद, १ चमचा तिखट, १/२ चमचा जिरेपूड, १ चमचा धणेपूड, एक चमचा चिकन मसाला अथवा अर्धा चमचा गरम मसाला असे घालून छान बारीक वाटावे. दुसऱ्या एका कढईत चार चमचे तेल घ्यावे. वाटलेले साहित्य त्यात घालून परतावे. आधी तेल नाहीसे झालेले दिसेल, पण सतत परतत राहिले की बाजूने तेल दिसू लागेल. असे तेल सुटेपर्यंत, खरपूस वास येईपर्यंत, सतत हलवत परतावे. परतल्यावर त्यात तीन वाट्या पाणी घालावे व रस्सा छान ३-४ मिनिटे उकळावा. 

जेवायच्या पाच मिनिटे आधी रस्सा उकळायला ठेवावा. रस्सा उकळायला लागला, की त्यात कोफ्ते टाकून दोन मिनिटे उकळावे. नंतर गॅस बंद करून झाकून ठेवावे. वाढतेवेळी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मग वाढावे.

टीप 

  • काही लोक कोबी चिरण्याऐवजी किसून घेतात. अशा वेळी कोबीला पाणी सुटते. त्यात मावेल एवढेच बेसन घालावे. गोळे फार घट्ट बांधू नयेत. बेसन जास्त झाले तर गोळे आतून कडक राहतात व रस आतपर्यंत जात नाही. 
  • ही झटपट कृती असल्याने सगळे मसाले एकत्र वाटले आहेत. हवे असल्यास कांदा, लसूण, आले, टोमॅटो वेगवेगळे वाटून एकानंतर एक तेलात परतत जावे. अर्थात चवीत फारसा फरक पडत नाही. फक्त पदार्थ छान खरपूस परतले जायला हवेत. 
  • कोफ्ते रश्‍शात घातल्यावर त्यातील पाणी शोषून घेतात, त्यामुळे आधी रस्सा थोडा पातळच असावा. पाण्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे. 
  • कोफ्ते जरा जास्त प्रमाणात करावेत. कारण जेवायच्या वेळेपर्यंत त्यातले अर्धे तरी ‘जरा चव बघू बरं’ म्हणत जाता-येता संपतात.

फोटो फीचर

संबंधित बातम्या