खारे शेंगदाणे
कुकिंग-बिकिंग
खारे शेंगदाणे न आवडणारी जगात कोणी व्यक्ती असू शकेल हे खरेच वाटत नाही. चौपाटीवर गेल्यावर गरमागरम, खमंग भाजलेले खारे शेंगदाणे खाल्ले नाहीत तर चुकल्याचुकल्यासारखे वाटते. सिनेमा पाहताना, फिरायला गेल्यावर, मॅच पाहताना, समुद्राकाठी वाळूत बसले असताना... कुठेही, केव्हाही; शेंगदाणे हवेतच! आता पाऊस पडतोय, बाहेर पडायचा कंटाळा आलाय, टीव्हीवर छान सिनेमा लागलाय.. अशावेळी बिस्किटे वगैरे नको असतात; खारेदाणेच हवेत. घ्या तर मग भाजायला.. झटपट होतील...
साहित्य ः दोन वाट्या शेंगदाणे, २ वाट्या मीठ, दोन वाट्या पाणी.
कृती ः एका पातेल्यात दोन वाट्या पाणी उकळेपर्यंत गरम करून घ्यावे व गॅस बंद करावा. त्यात दोन चहाचे चमचे मीठ घालून ढवळावे. या गरम पाण्यात दोन वाट्या शेंगदाणे घालून झाकून ठेवावे. पंधरा-वीस मिनिटांनी एका कढईत २ वाट्या मीठ गरम करत ठेवावे. मीठ चांगले तापले, की शेंगदाणे चाळणीत ओतून त्यातील पाणी काढून टाकावे व लगेच हे शेंगदाणे कढईतल्या गरम मिठात टाकावे. सतत परतावे. सुरुवातीला शेंगदाण्यांना मीठ चिकटलेले दिसेल, पण तीन-चार मिनिटांतच ते मीठ दाण्यांपासून वेगळे होईल. साधारण पाच-सहा मिनिटांत दाणे कोरडे व कुरकुरीत होतील. ते तळण्यासाठीच्या गाळण्यात घातले की मीठ कढईत पडेल व दाणे वर राहतील. हे दाणे किंचित कोमट होऊ लागले की कुरकुरीत होऊ लागतील. पूर्ण थंड झाले की हवाबंद बाटलीत भरून ठेवावे.
टीप : राहिलेले मीठ केक करण्याकरता वा फुटाणे वगैरे भाजण्यासाठी पुन्हा पुन्हा वापरता येते.