टोमॅटोचा झुणका 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

कुकिंग-बिकिंग
 

नियोजन-प्लॅनिंग करून स्वयंपाक करणे नेहमीच चांगले. परंतु, तरीही एखादेवेळी अशी वेळ येतेच, की फ्रीजमधल्या सगळ्या भाज्या संपल्या आहेत आणि फक्त एक-दोन टोमॅटो शिल्लक आहेत. झटपट स्वयंपाक करायचाय आणि बाजारात जायला जमणार नाही. तर गोंधळून न जाता आपल्याला पटकन काय करता येईल, तर टोमॅटोची पीठ पेरलेली भाजी किंवा झुणका! 

साहित्य : २-३ टोमॅटो, एक मिरची, ६-७ लसणीच्या कळ्या, ३-४ टेबलस्पून तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा तिखट, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ, १ चमचा साखर. 

कृती : टोमॅटो, मिरची, कोथिंबीर स्वच्छ धुऊन चिरून घ्यावेत. कढीपत्ता धुऊन घ्यावा. कढईत ३-४ टेबलस्पून तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाले, की त्यात अर्धा चमचा जिरे टाकून तडतडू द्यावे. जिरे तडतडल्यावर त्यात चिरलेला लसूण घालून परतावे. लसूण लालसर झाला, की हिरवी मिरची, कढीपत्ता, पाव चमचा हिंग, पाऊण चमचा तिखट घालून अर्धा मिनीट परतावे व चिरलेले टोमॅटो घालून मिसळून झाकण ठेवावे. गॅसची आच कमी करावी. दोन मिनिटांनी झाकण काढून परतावे व मग त्यात वाटीभर कोरडे बेसन व अर्धा चमचा मीठ व एक चमचा साखर (ऐच्छिक) घालून परतावे व पुन्हा झाकण ठेवावे. परतताना फार कोरडे वाटल्यास एक - दोन चमचे तेल घालावे किंवा पाण्याचा हलका शिपका मारावा. मग परतून झाकण ठेवावे. दोन-तीन मिनिटांनी गॅस बंद करावा. हा झुणका कोथिंबीर घालून गरमागरम भाकरी, लोण्याचा गोळा व कांदा याबरोबर मस्त लागतो. 
गरमागरम घडीची पोळी (तिपोडी), साजूक तूप व कांदा यांच्याबरोबरही हा झुणका छान लागतो.

टीप : 
झुणक्‍याला तेल जरा जास्तच लागते. पाणी शक्‍यतो वापरू नये. 
झुणका करताना एखाद चमचा साखर घातली तर जास्त छान चव येते. 
तिखट, मीठ आवडीप्रमाणे कमीजास्त करण्यास हरकत नाही. 
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या