अळूवडी

साहित्यलक्ष्मी देशपांडे 
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

कुकिंग-बिकिंग  

साहित्य : अळूची १२ पाने, २ वाट्या बेसन पीठ, १ चमचा तीळ, १ चमचा ओवा, १ सपाट चहाचा चमचा मीठ, चिंचगुळाची चटणी अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी, १ चहाचा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, २ चहाचे चमचे तेल, २ टेबलस्पून तांदळाचे पीठ. 

कृती : बाजारातून वडीचा अळू मिळतो तो आणावा. अळूची पाने एकएक करून स्वच्छ धुऊन व पुसून घ्यावीत. देठे कापून देठी करण्यासाठी वेगळे ठेवून द्यावे. 
एका मोठ्या वाडग्यात दोन वाट्या बेसन, २ टेबलस्पून तांदुळाचे पीठ, १ चमचा ओवा, एक चमचा तीळ, एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, एक सपाट चमचा मीठ, २ चमचे तेल, पाव ते अर्धी वाटी चिंचगुळाची चटणी व साधारण एक वाटी पाणी एकत्र करून भज्यांच्या पिठासारखे (२) कालवावे. लागल्यास आणखी २-४ चमचे पाणी घालावे. हाताने पानावर लावण्यासारखे व्हायला हवे, फार घट्ट किंवा फार पातळ नको. सव्वा ते दीड वाटी पाणी पुरेसे व्हावे. 
आता पान पालथे ठेवावे व सुरी आडवी धरून मधली जाड शीर अर्धी कापावी (३) म्हणजे पानाची गुंडाळी करणे सोपे जाईल. अशाच सगळ्या पानांच्या मधल्या शिरा काढून घ्याव्या. आता एक पान घेऊन त्याला शिरा दिसतात त्या बाजूला (४) तयार केलेले मिश्रण हाताने चोपडावे. दुसरे पान त्यावर (५) ठेवून त्याला मिश्रण लावावे. अशी एकावर एक चार पाने ठेवावी व मिश्रण लावावे (६). आता (७) दोन्ही बाजूंनी पाने लांबीत दुमडावी. 
(८ आणि ९) मध्ये दाखवल्याप्रमाणे पानांची घट्ट गुंडाळी करून घ्यावी. एका स्टीलच्या चाळणीला तेलाचा हात लावून घ्यावा व त्यात ही गुंडाळी ठेवावी. अशा सगळ्या पानांच्या मिळून तीन गुंडाळ्या कराव्या. 
आता कुकरमध्ये किंवा एखाद्या मोठ्या पातेल्यात तीन - चार कप पाणी घालावे. चाळणी कुकर किंवा पातेल्याच्या तोंडावर बसत असेल तर ठीक, नाहीतर कुकरमधे एक कुकरचेच भांडे ठेवावे व त्यावर ही चाळणी ठेवावी जेणेकरून चाळणीला खालून पाणी लागणार नाही.
वर झाकण ठेवावे व गॅस सुरू करावा. पाणी उकळू लागल्यापासून १५ मिनिटांनी गॅस बंद करावा. चाळणी बाहेर काढून थंड होऊ द्यावी. (१०). हे आपले अळुवडीचे उंडे थंड झाले, की त्यांचे काप करून घ्यावे. एका कढईत साधारण तीन-चार वाट्या तेल गरम करावे व हे काप लालसर होईपर्यंत छान कुरकुरीत तळून काढावे. 
या तीन उंड्यांचे साधारण ३०-४० काप होतील. माणशी सहा-सात काप खाल्ले जातातच. त्यामुळे त्या अंदाजाने काप तळावे व उरलेले काप किंवा उंडे हवाबंद डब्यात किंवा झिपलॉकमधे घालून फ्रीझरमध्ये ठेवावे. बरेच महिने टिकतात. म्हणजे कधी खावेसे वाटले, की नुसते फ्रीजमधून अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवले की झटपट तळता येतील. 

 

  •     मिश्रण केल्यावर मिश्रणाची चव घेऊन पाहावी व आपल्या आवडीप्रमाणे हवे असल्यास तिखट, मीठ, चिंच वा गूळ आणखी घालावे. 
  •  गुंडाळी घट्ट बांधावी नाहीतर काप कापताना तुटतील. 
  •     तांदुळाचे पीठ घातले की काप/वड्या कुरकुरीत होतात. 
  •  मध्यम आचेवर काप तळावे म्हणजे काप/वड्या कुरकुरीत होतात.
     

फोटो फीचर

संबंधित बातम्या