बीटरूटची कोशिंबीर 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त 
मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ 
हे सांगणारे सदर.

साहित्य : एक मध्यम आकाराचे बीटरूट, दोन टेबल स्पून शेंगदाण्याचे कूट, एक हिरवी मिरची, एक दोन टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी गोड दही, अर्धा चमचा साखर, पाव चमचा मीठ. 

कृती : बीटरूट स्वच्छ धुऊन चमचा - दोन चमचे पाणी घालून वाटीत किंवा स्टीलच्या छोट्या वाडग्यात घ्यावे. वरणभात लावताना कुकरमधे ती वाटी ठेवून उकडून घ्यावे. उकडताना बीटरूटचे पाणी भातात किंवा वरणात सांडणार नाही याची काळजी घ्यावी. कुकरमधून काढल्यावर बीट थंड होऊ द्यावे व मग त्याचे साल काढून बारीक चिरून घ्यावे. कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घ्यावी. शेंगदाणे खमंग भाजून त्यांचे जाडसर कूट करून घ्यावे. एका बोलमधे बारीक चिरलेले बीटचे तुकडे, मिरचीचे तुकडे, दाण्याचे कूट, मीठ, साखर  मिसळून फ्रीजमध्ये ठेवावे. जेवायच्या वेळी फ्रीजमधून काढून त्यात दही व कोथिंबीर मिसळून वाढावे. 

टीप्स : 

  •      बीट आख्खेच सालासकट बटाट्यासारखे उकडावे. कुकरमधे जागा कमी असल्यास अर्धे कापून मग उकडावे. 
  •      उकडलेल्या बीटचे वाटीतले पाणी टोमॅटो सूप करताना त्यात घातले की छान रंग येतो. 
  •      दही आधी मिसळले तर ते फार जास्त गडद गुलाबी होते व खाववत नाही. ऐनवेळी मिसळले तरच थोडे पांढरे थोडे गुलाबी होऊन डोळ्यांना सुखावणारा रंग येईल. 
  •      बीटची साले बटाट्यासारखीच हातानी सोलून निघतात. 
  •      बीटचा रंग गडद असल्याने कपड्यांवर सांडणार नाही याची काळजी घ्यावी. 
  •      बीटरूटमधे लोह जास्त प्रमाणात असल्याने रक्तातील लोह वाढवण्यासाठी बीटरूटचा समावेश नेहमीच्या आहारात जरूर करावा.
     

फोटो फीचर

संबंधित बातम्या