मसाला डोशाची भाजी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

बाजारात मिळणारे डोशाचे अनेक प्रकार चाखल्यानंतर घरी डोसा करून बघायचा मोह आवरत नाही. बाजारात अनेक प्रकारचे/कंपन्यांचे तयार डोसापीठ मिळते. पण घरी पीठ तयार करून केलेला डोसा जास्त चविष्ट लागतो. डोशासाठी भाजी, चटणीसुद्धा नेहमीच्या बटाट्याच्या भाजीपेक्षा किंवा नारळाच्या चटणीपक्षा थोडीशी वेगळी करतात. तशी भाजी व चटणी करून मसाला डोसा केला तर खूपच छान होतो.

साहित्य : चार मध्यम आकाराचे बटाटे, १ मोठा कांदा, ४ टेबलस्पून तेल, कढीलिंबाची १०-१२ पाने, १ हिरवी मिरची/लाल मिरची, अर्धा चमचा मोहोरी, एक चमचा उडदाची डाळ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, १ चमचा साखर, पाऊण चमचा मीठ व सात आठ काजू, कोथिंबीर. 
कृती : बटाटे स्वच्छ धुऊन घ्यावेत. कुकरमध्ये २ फुलपात्र भरून प्यायचे पाणी घेऊन त्यात बटाटे टाकून कुकरचे झाकण बंद करून गॅस सुरू करावा. कुकरच्या दोन शिट्या झाल्या की गॅसची आच कमी करावी. पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. कुकरची वाफ गेली की कुकरमधून बटाटे काढून सोलून घ्यावे व हातानेच थोडे कुस्करून घ्यावे. कांदा उभा चिरून घ्यावा. या भाजीला लांब चिरलेला कांदा जास्त चांगला वाटतो. 
    गॅसवर कढईत चार चमचे तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की त्यात मोहोरी घालावी व मोहोरी फुटली की हिंग घालून त्यात चमचाभर उडदाची डाळ घालावी व परतून घ्यावी. डाळ चांगली लालसर झाली व सुरेख गंध येऊ लागला की त्यात मग कांदा, मिरचीचे तुकडे, कढीलिंबाची पाने घालून परतावे. कांदा छान लालसर झाला की मग त्यात हळद, तिखट घालून कुस्करलेला बटाटा, मीठ व साखर घालावी. दोन मिनिटे परतून त्यात हवे असल्यास अर्धी वाटी पाणी घालून नीट हलवून भाजीवर झाकण ठेवावे. पाणी घालणे ऐच्छिक  आहे. दोन मिनिटांनी गॅस बंद करून कोथिंबीर घालून भाजी ढवळून घ्यावी. डोशात घालण्यासाठी भाजी तयार. 

टीप्स : 

  • बटाट्याचा काही भाग हिरवा असल्यास तेवढा भाग काढून टाकावा. 
  • बटाट्याची भाजी आधीच करून फ्रीजमध्ये ठेवली व डोशाचे पीठही तयार करून ठेवलेले असले की आयत्यावेळी डोसा करून खाऊ घालता येतो. 
  • भाजी करून थंड झाल्याबरोबर लगेच डब्यात झाकून फ्रीजमध्ये ठेवली तर दोन दिवस छान राहाते. 
  • उडदाची डाळ खमंग लाल तळल्यावर जो गंध त्याला येतो त्याने या भाजीला ती वेगळी विशिष्ट चव येते. 
  • एवढी भाजी साधारणपणे चार ते सहा डोशांसाठी पुरेल; म्हणजेच दोन ते तीन माणसांना पुरेल.
     

फोटो फीचर

संबंधित बातम्या