डोसा अथवा दोसा 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

दक्षिण भारतात केला जाणारा डोसा वा दोसा हा पदार्थ भारतभरच नव्हे, तर भारताबाहेरही अतिशय लोकप्रिय झालेला आहे. तांदूळ आणि उडदाची डाळ या दोन पदार्थांच्या आंबवलेल्या पिठापासून बनणारा हा पदार्थ करण्यास सोपा, स्वस्त, पौष्टिक व रुचकर आहे. म्हटले तर मुख्य जेवण, म्हटले तर नाश्‍ता म्हणून हा पदार्थ वेळ निभावून नेतो. दोशाचे पीठ घरात तयार असेल तर कोणालाही अचानक येणाऱ्या पाहुण्यांना पटकन, फारसे कष्ट न करता, व्यवस्थित व पोटभर खाऊ घालता येऊ शकते. दोशाचे वाटलेले, आंबवलेले पीठ आजकाल बाजारात सगळीकडे मिळते. पण हे पीठ घरी करणे खूप सोपे आहे. घरी वाटलेल्या मिश्रणाचे दोसे अधिक चविष्ट होतात व आरोग्यकारकही असतात. आज आपण प्रथम दोशाच्या पिठाची कृती पाहू व नंतर त्यापासून दोसे करण्याची पद्धत पाहू. 

साहित्य : दोन वाट्या तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ, पाणी. 

कृती : दोन वाट्या तांदूळ निवडून दोन वेळा धुऊन, तांदूळ बुडतील इतके पाणी पातेल्यात घालून, रात्री भिजत घालावे. दुसऱ्या पातेल्यात एक वाटी उडदाची डाळ दोन वेळा धुऊन, डाळीच्या वर बोटभर पाणी राहील इतके पाणी घालून, भिजत घालावी. त्यातील पाणी काढून टाकून, भिजलेले डाळ व तांदूळ सकाळी पाणी काढून टाकून, नंतर मिक्‍सरमधून, वेगवेगळे व थोडेसे पाणी म्हणजे साधारण एकंदर दीड वाटी पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्यावे. मग ते एका मोठ्या पातेल्यात एकत्र करावे. डाळ आणि तांदूळ एकत्र धुऊन पाण्यात भिजत घालून वरील प्रमाणात पाणी घालून एकत्र बारीक वाटले तरी हरकत नाही. तेही दोसे छानच होतात. वाटताना फार जास्त पाणी घालू नये. आता हे वाटलेले पीठ झाकून ऊबदार ठिकाणी ठेवून द्यावे. उन्हाळ्यात पीठ ५-६ तासात आंबते/फुगते. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात आंबण्याची प्रक्रिया हळू होते त्यामुळे पीठ आंबण्यास १०-१२ तासांचा किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. वाटलेले दोशाचे पीठ फार आंबट झाले वा फार फसफसले तर तितकेसे चांगले लागत नाही. त्यामुळे रात्री वाटल्यानंतर सकाळी अथवा वाटल्यानंतर सहा सात तासांनी आंबलेले पीठ फ्रीजमधे ठेवावे. ३-४ दिवस पीठ चांगले राहाते. फ्रीझरमधे स्टोअर केल्यास महिना दोन महिने पण टिकते. दोसे करतेवेळी पीठ रूम टेंपरेचरला आले, की त्यात पाऊण ते एक वाटी पाणी, दोन चहाचे चमचे तेल व एक चहाचा चमचा मीठ घालून नीट मिसळून घ्यावे. मीठ आपल्या चवीप्रमाणे कमी जास्त करायला हरकत नाही. म्हणजे दोशाचे पीठ वाटणे व पीठ सारखे करणे या सगळ्याला मिळून अडीच ते तीन वाट्या पाणी पुरेसे होईल. पाचव्या चित्रात दाखवल्याप्रमाणे पीठ दाट असावे. 

दोसे बनवण्याची कृती : नॉनस्टिक तव्यापेक्षा साध्या जाड हिंडालियम, ॲल्युमिनियम, ॲनोडाईज्ड किंवा लोखंडी तव्यावर दोसा छान होतो. 
नॉनस्टिक तव्यावर दोसा करायचा असेल तर टिश्‍यू पेपरचे टोक तेलात बुडवून त्याने तवा पुसून घ्यावा, मग त्यावर दोसा करावा. तव्यावर फार तेल राहिले तर दोसा पसरताना पीठ पळीला चिकटून गोळा होतो व दोसा नीट पसरला जात नाही. साधा जाड तवा घेतल्यास तव्यावर दोसा चिकटू नये म्हणून तो तयार करून घ्यावा लागतो. इंग्रजीत त्याला तवा ‘सीझन’ करणे म्हणतात. त्यासाठी तवा तापत ठेवावा व त्यावर एक चहाचा चमचा तेल घालून सराट्याने तवाभर पसरवावे. तवा छान तापला, की चमचाभर प्यायचे पाणी हातात घेऊन त्याचा शिपका तव्यावर मारावा. चुर्रऽऽऽ आवाज करत पाण्याची क्षणार्धात वाफ होईल. आता तव्यावर पुन्हा एकदा अर्धा चमचा तेल घालून तवा तापला की पुन्हा पाण्याचा शिपका मारावा. असे २-३ वेळा केल्यावर तव्यावर सगळीकडे तेलाचा थर बसेल, ज्यामुळे दोसा तव्याला चिकटणार नाही. 
आता तेल न टाकता, तापलेल्या तव्यावर एक पळी दोश्‍याचे पीठ ओतावे व पळी अथवा वाटी एकाच दिशेने गोलगोल फिरवत ते तवाभर पसरवावे. त्यानंतर एक चमचा तेल अथवा बटर, दोशावर सगळीकडे लागेल, असे घालावे. गॅसची ज्योत मध्यमच ठेवावी. कडेने दोसा सुटू लागला व दोशाला बदामीसर रंग आला की सराट्याने त्याची गुंडाळी करून प्लेटमधे काढून घ्यावी. मसाला दोसा करायचा असल्यास दोसा तयार झाला की त्यावर मधे डावभर भाजी पसरून मग दोशाची गुंडाळी करावी. दोसा काढल्यावर लगेच दुसरा दोसा करण्यासाठी पळीभर पीठ तव्यावर मधे घालून आधीच्या दोशाप्रमाणे दोसा करावा व चटणी आणि सांबाराबरोबर खायला द्यावा. 

टीप्स : 

  • दोशाचे पीठ नीट आंबले नसेल किंवा जास्त आंबले असेल तर चव परफेक्‍ट येत नाही. 
  • दोशाचे पीठ आंबल्यावर फुगून दुप्पट किंवा त्याहून जास्त होते व भांडे लहान असेल तर ओसंडून वाहते. म्हणून पीठ ठेवण्यासाठी मोठे पातेले घ्यावे. 
  • पीठ वाटताना खूप पाणी घालू नये. जरा घट्टसरच ठेवावे. म्हणजे याच पिठाचे इडली व उत्तप्पे करता येतात. 
  • दोसे करतेवेळी पिठात दोन चमचे तेल व एक चमचा मीठ घालावे. आधी मीठ घातल्यास पीठ नीट फुगत नाही. 
  • पीठ सहज पसरवण्याइतपत पातळ असावे. फार पातळ झाल्यास दोसा - पेपरदोसा कुरकुरीत न होता मऊ होतो. 
  • दोसा मध्यम आचेवर केल्यास त्याचा रंगही सुरेख येतो व तो कुरकुरीतही होतो. 
  •      दोसा बाजूने सुटायला लागल्यावर व रंग बदामीसर आल्यावरच सराट्याने तव्यावरून काढावा. आधी काढायची घाई केली तर बाजारातल्यासारखा रंग येणार नाही. 
  •      तेलाऐवजी बटर घातले तर दोशाची चव जास्त छान लागते. 
  •      हॉटेलसारखा रंग व कुरकुरीतपणा हवा असेल तर तेल किंवा बटर जरा सढळ हाताने घालावे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या