कोथिंबीर वडी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

कोथिंबीर वडी 
बाजारात कोथिंबिरीच्या मोठमोठ्या जुड्यांचे हिरवेगार ढीग पाहिले की त्यातल्या एक-दोन मोठाल्या जुड्या घरी आणल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. आज आपण झटपट कोथिंबीर वडी करूया. 

साहित्य ः चार वाट्या कोथिंबीर (धुऊन, सुकवून चिरलेली), १ वाटी भरून बेसन, पाव वाटी तांदळाचे पीठ, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट,१चमचा आल्याची पेस्ट, एक चमचा लसूण पेस्ट, पाऊण चमचा मीठ, दीड ते दोन चमचे तीळ, दोन चमचे पिठीसाखर, एक चमचा ओवा, तळण्यासाठी तेल. 

कृती ः निवडताना फक्त कोथिंबिरीची मुळे व जरड काड्या घेऊ नयेत. पाने व कोवळ्या सर्व काड्या घ्याव्यात. इतर वनस्पती त्यात असल्या तर त्या व सडलेली पाने काढून टाकावीत. एखाद्या मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन कोथिंबीर त्यात हलवून, बुडवून ठेवावी. पाच मिनिटांनी कोथिंबीर वरचेवर उचलून गाळणीत काढावी. माती खाली बसली असेल. आता ते गढूळ पाणी फेकून देऊन कोथिंबीर नवीन पाण्यात पुन्हा खळबळून घ्यावी. असे दोन-तीन वेळा, पाणी स्वच्छ निघेपर्यंत करावे. कोथिंबीर फडक्‍यावर
सुकायला ठेवावी. कोथिंबीर दोन-एक तास सुकली की मग बारीक चिरून घ्यावी. मग त्यातील चार वाट्या कोथिंबीर घेऊन त्यात वरील सर्व साहित्य मिसळून घ्यावे. लागलेच तर एखाद-दोन चमचे पाणी घालून गोळा करून घ्यावा व त्याला तेलाचा हात लावावा. या गोळ्याच्या दोन लांबट गोल किंवा लांबट चौकोनी वळकट्या कराव्यात. नंतर कुकरमधे तीन-चार वाट्या पाणी घालून गॅसवर ठेवावे. कुकरच्या भांड्याला तेलाचा हात फिरवून त्यात या वळकट्या ठेवून ते कुकरमधे कुकरच्या जाळीवर ठेवावे. 
कुकरच्या झाकणावरची शिटी काढून कुकर बंद करावा. वरच्या छिद्रांतून वेगाने वाफ बाहेर पडू लागल्यापासून पंधरा मिनिटे झाल्यावर गॅस बंद करावा व वळकट्या बाहेर काढून थंड करून घ्याव्या. थंड झाल्यावर त्यांचे काप करून घ्यावेत व मग ते मध्यम आचेवर तळून घ्यावेत. वरील साहित्याच्या साधारण वीस वड्या होतील.  

टीप्स : 

  • तांदुळाच्या पीठाने कुरकुरीतपणा वाढतो. नाही घातले तरी चालते. 
  • कोथिंबीर वडीत कोथिंबिरीचे प्रमाण वर लिहिल्यापेक्षा कमी घातले तरी चालते. 
  • गोळा केल्यावर चव घेऊन पाहावी. गरजेप्रमाणे मीठ, तिखट वगैरे कमी-जास्त करावे. 
  • पीठे आणि कोथिंबीर यांचे प्रमाणही गरजेप्रमाणे, आवडीप्रमाणे बदलायला हरकत नाही. पण पीठ जास्त घेतल्यास चिमूटभर सोडा व थोडे मोहन घालावे, म्हणजे वड्या खुसखुशीत व हलक्‍या होतील.

संबंधित बातम्या