मिश्र भाज्यांचे लोणचे
कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.
ऑक्टोबरपासून बाजारात वेगवेगळ्या भाज्या प्रचंड प्रमाणात दिसू लागतात. टवटवीत व ताज्या. घरी फ्रिज भाज्यांनी भरलेला असला, तरी बाजारातून येताना भाजी न घेता येणे मला कधी जमलेलेच नाही. कोथिंबिरीच्या वड्याच कर, उंधियोच कर, हळदीचे लोणचेच कर, सॅलड्स कर, भाज्या घालून केले जाणारे चायनीज, दक्षिण, उत्तर भारतीय, महाराष्ट्रीय प्रकारच कर... असे करत वेगवेगळे प्रकार केले जातात. असेच खूप चविष्ट तोंडीलावणे, जे पटकन नेहमी केले जाते, ते म्हणजे मिश्रभाज्यांचे लोणचे. आज तेच करू...
साहित्य : एक वाटी फुलकोबीचे तुरे, १ वाटी गाजराचे तुकडे, अर्धी - पाऊण वाटी ताजे सोललेले मटारदाणे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जाडसर कुटलेली मेथी पूड, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा मोहरीची डाळ, १ लिंबू, १ चमचा मीठ, ३-४ चमचे किंवा पाव वाटी तेल. असल्यास हिरव्या मिरच्या.
कृती : फ्लॉवरचे तुरे निवडून, धुऊन, निथळवून स्वच्छ कापडावर टाकावे. गाजराचेही धुऊन मग बारीक तुकडे करावे व फडक्यावर टाकावे. मटारच्या शेंगा सोलून पाऊण-एक वाटी मटारदाणे घ्यावे. हव्या असल्यास हिरव्या मिरच्याही धुऊन चिरून घ्याव्यात. एका कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाले, की त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडली, की मेथीची भरडपूड घालून गॅस बंद करावा. आता एखाद-दोन मिनिटांनी यात हळद व तिखट घालावे. एखाद्या वाडग्यात फ्लॉवर, वाटाणा, गाजर व हवे तर हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यावे. त्यात मीठ व मोहरीची डाळ घालावी व एका लिंबाचा रसही घालावा. आता यात आधी करून ठेवलेली थंड झालेली फोडणी घालून सगळे छान कालवावे व काचेच्या कोरड्या बरणीत भरून लगेच फ्रीजमधे ठेवावे. ४-५ दिवस चांगले राहते. यात तिखट, मीठ, लिंबू, तेल, भाज्या यांचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी - जास्त करायला हरकत नाही. या मिश्र लोणच्यातून सगळ्या भाज्या, कच्च्या स्वरूपात सगळ्यांच्या पोटात, न कुरकुरता आनंदाने जातात.