स्टर फ्राइड व्हेजिटेबल्स 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

थंडीचे दिवस म्हणजे भाज्यांची रेलचेल! बाजारात गेले, की रंगीबेरंगी भाज्या बघून मन वेडावते. पंचतारांकित हॉटेल्समधे सर्व्ह केल्या जाणाऱ्या या भाज्या असतात 
थोड्या महाग, पण यांचा कलात्मकतेने वापर करून नजरेला खूष करून टाकणारे पदार्थ हॉटेलपेक्षा कितीतरी कमी किमतीत आपण घरीच करू शकतो. आज आपण हे सोप्पे सॅलड बनवू. 

साहित्य : चिरलेली लाल, पिवळी व हिरवी ढोबळी मिरची प्रत्येकी अर्धी वाटी, अर्धी वाटी (स्वीट कॉर्न) मक्‍याचे दाणे, अर्धी वाटी चिरलेला जांभळा पत्ताकोबी, अर्धी वाटी ब्रोकोली, अर्धी वाटी लेट्यूस, अर्धी वाटी बेबीकॉर्न, १ टेबलस्पून बटर अथवा ऑलिव्ह ऑइल, मीठ अर्धा चमचा, पाव चमचा मिरी पावडर. 

कृती : सर्व भाज्या स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्या. एका कढईत एक टेबलस्पून बटर अथवा ऑलिव्ह ऑइल गरम करावे. त्यात कडक भाज्यांपासून म्हणजे मका, ब्रोकोली, बेबीकॉर्न, पत्ताकोबीपासून मऊ भाज्यांपर्यंत म्हणजे भोपळी मिरच्यांपर्यंत एक-एक भाजी टाकत टाकत मोठ्या आचेवर सतत हलवत परतावे. तीन-चार मिनिटे परतल्यावर गॅस बंद करून साधारण अर्धा चमचा मीठ व तेवढीच काळी मिरीची पूड त्यात मिसळून गरमच खाण्यास द्यावे. वाढताना त्याबरोबर लेट्यूसची पाने हाताने तुकडे करून वाढावी. बटरमधे हा पदार्थ केल्यास फारच छान लागतो. डायबेटिस असलेल्यांनी बटरऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरावे. 
नाश्‍त्याला हे सॅलड नुसतेच मोठा बोलभर खाल्ल्यास जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ 
भरपूर प्रमाणात मिळतील व रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्यासही मदत होईल. पोटभर होते. 

टीपा 
१. भाज्या फार शिजवू नयेत. 
२. लेट्यूस शिजवू नये. कच्चेच घ्यावे. 
३. वरील सॅलड दोन - तीन माणसांना नाश्‍त्यासाठी पुरेल.

संबंधित बातम्या