उंधियो 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 10 जानेवारी 2019

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

मस्त पडलेली थंडी, भाज्यांनी भरलेली मंडई... खवय्यांना आणखी काय हवे? मग नॉनव्हेज खाणाऱ्यांनासुद्धा व्हेज पदार्थांचा मोह पडावा असे एकाहून एक चमचमीत पदार्थ तयार होऊ लागतात. पुडाच्या वड्या असतील, वांग्याचे भरीत असेल, मिश्र भाज्यांचे लोणचे असेल नाहीतर आणखी काही. उंधियो हा गुजरात प्रांतात मुख्यत्वाने प्रचलित असलेला मिश्रभाजीचा एक प्रकार आहे. पूर्वी यात सगळ्या भाज्या, जमिनीत पुरलेल्या मडक्‍यात भरून शिजवल्या जायच्या. पण आता गॅसवरही उंधियो सोप्या पद्धतीने केला जाऊ शकतो. तयारी थोडी वेळखाऊ आहे. पण पदार्थ इतका चविष्ट आहे की त्यासाठी थोडा वेळ घालवायला लागला तरी हरकत नाही. 

साहित्य ः (उंधियोसाठी) एक कच्चे केळे, पाव वाटी ताजे सोललेले तुरीचे दाणे व पाव वाटी वालाचे/पापडीचे दाणे, ४ लहान बटाटे, १ लहान कंद (गोराडू) सोलून चिरून, १ वाटी सुरती पापडीच्या शेंगा, १ लहान जुडी कोथिंबीर, १ लहान जुडी ओली लसूण हिरव्या पातीसह बारीक चिरून, ३-४ लहान वांगी, २ चमचे भरून धणेजिरे पूड, १ चमचा ओवा, १ चमचा गरम मसाला, २ चमचे तिखट, १ चमचा हळद, दीड ते दोन वाट्या तेल, अर्धा चमचा मोहोरी, २ चिमूट हिंग, अर्ध्या नारळाचा चव, दीड चमचा मीठ, २ चमचे गूळ. 

साहित्य ः (मेथी मुठियासाठी) एक वाटी धुऊन चिरलेली मेथी, दीड वाटी कणीक किंवा ज्वारीचे पीठ, १ चमचा ओवा, २ चमचे धणेजिरे पावडर, २ हिरव्या मिरच्या, दीड चमचा तिखट, १ चमचा साखर, ३ चमचे तेल, १ चमचा मीठ. 

कृती ः (मुठियाची) मेथी मुठियासाठी वर दिलेले सर्व साहित्य परातीत घेऊन त्यात साधारण पाऊण वाटी पाणी घालून कणकेसारखा गोळा तयार करावा. या गोळ्याचे लहान लहान लांबट अथवा गोल गोळे करून घ्यावे. कढईत दीड ते दोन वाट्या तेल घ्यावे. तेल चांगले तापले की मंद आचेवर लालसर होईपर्यंत हे गोळे तळून घ्यावे. साधारण १२-१३ गोळे होतील. 

कृती ः (उंधियोची) आजकाल बाजारात काही भाजीवाले उंधियोसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या एकाच दुकानात विकायला ठेवतात. सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्या. कंद, रताळे, बटाटे सोलणीने सोलून त्याचे तुकडे करून घ्यावे. पापडी, सुरती पापडी शिरा काढून सोलून मग शेंगांचे दोन तुकडे करावे. जून शेंगांचे फक्त दाणे घ्यावेत. साले टाकून द्यावीत. केळे सोलून त्याचे तुकडे करून घ्यावे. खोबरे खवून घ्यावे. वांग्याचे चार तुकडे करावे. 

मुठीये तळून घेतल्यावर राहिलेल्या तेलात मोहोरी, हिंग व ओवा घालावा. मोहोरी तडतडल्यावर तुरीचे दाणे, पावट्याचे/वालाचे दाणे व सगळ्या भाज्या घालाव्या. तेलात सर्व भाज्या पाच मिनिटे परतल्यावर मग इतर सर्व साहित्य घालावे व चांगले परतावे. तिखट हवे तर जरा जास्तच घालावे. ४-५ मिनिटे परतल्यानंतर भाजीवर ताट ठेवून ताटात अर्धी-पाऊण वाटी पाणी घालावे व गॅस मंद करून भाजी शिजू द्यावी. तेल फार आवडत/चालत नसल्यास तेल थोडे कमी घ्यावे व पाणी घालून उंधियो शिजवावा. परंतु, उंधियोत तेल जरा जास्त घातले तरच तो चांगला लागतो. भाजी शिजत आली, की तीत मुठिये घालून मिसळून पुन्हा वाफ आणावी. उंधियो पोळीबरोबर किंवा नुसताही खायला छान लागतो.

टीपा 
१. वरील प्रमाणात केलेला उंधियो सहाजणांना पुरेल.  २. भाज्यांचे प्रमाण कमी - जास्त केलेले चालेल. गाजर, सुरण वगैरेही बरेच लोक घालतात. ३. उंधियो कमी तेलात किंवा बेक करून पण करतात. पण भरपूर तेल घालून केलेला उंधियो जास्त चांगला लागतो. ४. परंपरागत पद्धतीने करायचा असल्यास कोथिंबीर - खोबऱ्याच्या मिश्रणात सगळे मसाले, मीठ वगैरे मिसळून ते मिश्रण काप दिलेल्या वांग्यात, केळ्याच्या फोडीत, बटाट्यात, मिरचीत भरतात. पण तसे न करताही उंधियो चांगला लागतो. ५. बटाटे, केळे, रताळे सालीसकट घेतले तरी छान लागते. ६. भाजीला रस हवा असेल तर थोडे पाणी किंवा तेल घालावे.

संबंधित बातम्या