फोडणीची पोळी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

कुकिंग-बिकिंग
 

आज अन्नूचा मला जरा रागच आला. फोडणीच्या पोळीसाठी प्रोसेसरमध्ये सात - आठ शिळ्या पोळ्यांची चवड तीन-चार तुकडे करून टाकताना मला पाहून कुतूहलाने माझ्या या २०-२१ वर्षांच्या बिहारी मोलकरणीने विचारले, ‘ये क्‍या कर रही हो आप?’ मी तिला फोडणीची पोळी कशी करतो हे सांगून ती कशी मस्त लागते हे सांगितल्यावर नाक मुरडून ती म्हणाली, ‘हम ऐसी बासी चीजें नहीं खाते। खाना बनाया, गरम गरम खाया और बचा हुआ गाय या कुत्ते को खिला दिया, ऐसेही करते हैं।’ मी वैतागले आणि मला तिची कीवही आली. फोडणीची पोळी किंवा कुस्करा, फोडणीचा भात यासाठी जीव टाकणारे आम्ही. असा तिचा अपमान कसा सहन करणार? असो. आनंदाची बाब हीच, की फोडणीच्या पोळीतला तिचा वाटा कमी झाला. पोळी करण्यासाठी गृहिणी बेअंदाज जास्त स्वयंपाक करणारी असणे फार महत्त्वाचे! कारण आदल्या दिवशीच्या खूप शिळ्या पोळ्या उरल्याशिवाय चांगली फोडणीची पोळी होऊ शकत नाही. आता लागणारे साहित्य पटकन पाहू.

साहित्य : सात - आठ शिळ्या पोळ्या, एक-दीड मोठा डाव किंवा साधारण अर्धा ते पाऊण वाटी तेल, एक चमचा मोहोरी, पाऊण चमचा हळद, एक ते दीड चमचा तिखट, पाव चमचा हिंग, एक मोठा कांदा, अर्धी वाटी हिरवे वाटाणे, दोन चमचे चिंचगुळाची चटणी, एक - दोन हिरव्या मिरच्या, १२-१५ कढीलिंबाची पाने, एक चमचा मीठ, अर्धी वाटी कोथिंबीर. 
कृती : पोळ्यांचा गठ्ठा हातात घेऊन त्याचे दोन तुकडे करावेत व हात एखाद्या परातीवर धरून दोन्ही हातातले ते तुकड्यांचे गठ्ठे एकमेकांवर घासावे म्हणजे परातीत तुकड्यांचा चुरा/कुस्करा गोळा होईल. 
याऐवजी पोळ्यांचे मोठ्ठाले तुकडे करून ते मिक्‍सरच्या मोठ्या भांड्यात किंवा प्रोसेसरमधे पल्स मोडवर बारीक करून घेतले तरी चालतील. खूप बारीक करू नये. 
त्याच प्रोसेसरच्या जारमधे एक मोठा कांदा सोलून व दोन तुकडे करून एक मिरची, १०-१२ कढीलिंबाची पाने घालावीत व पल्स मोडवर अर्ध्या मिनिटात वरील जिन्नस बारीक चिरून घ्यावे. 
आता एका कढईत अर्धी - पाऊण वाटी तेल घ्यावे. गॅस पेटवून कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग घालून फोडणी करावी. त्यात लगेच चिरलेला कांदा, कढीलिंब, हिरवी मिरची (आवडत असल्यास हिरवे वाटाणे व चिंचगुळाची चटणी याचवेळी) घालावी व कांदा  लालसर होईपर्यंत परतून घ्यावे. तीन-चार मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे. नंतर यात तिखट, मीठ व पोळ्यांचा कुस्करा घालून परतावे. झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. हा कुस्करा जरा क्रिस्प/कुरकुरीत/कोरडा हवा असल्यास मंद आचेवर अधून मधून हलवत परतत राहावे. झाकण ठेवू नये. साधारण ८-१० मिनिटात क्रिस्प होईल. कुस्करा मऊ हवा असल्यास वाफ आली, की गॅस बंद करून कोथिंबीर घालून खाण्यास घ्यावा. दह्याबरोबर हा कुस्करा मस्त लागतो. 
हा कुस्करा किंवा ही फोडणीची पोळी किंवा हे फोडणीचे तुकडे थोडीशी चिंच-गुळाची चटणी घालूनपण करता येतात. आंबटगोड तिखट अशी चवही छानच लागते. असा चिंच-गूळ घालायचा असल्यास दोन चमचे चिंचेचा कोळ व थोडासा गूळ बारीक करून किंवा त्याऐवजी चिंचगुळाची चटणी, कांदा लालसर झाला की त्यात घालावी व थोडे परतून मग पोळीचा कुस्करा त्यात घालावा. 
वाटाणे घालूनही कुस्करा छान दिसतो व लागतोही. वाटाणे घालायचे झाल्यास फोडणीत कांद्याबरोबरच वाटाणे घालून वाफ येऊ द्यावी व बाकी कृती वरीलप्रमाणे करावी. 
सात-आठ पोळ्यांचा कुस्करा किंवा फोडणीची पोळी २-३ जणांना नाश्‍त्याला पुरेल. 

टिपा : 
 कुस्करा शिळ्या पोळ्यांचाच छान होतो. यासाठी आदल्या दिवशीच जास्त पोळ्या कराव्या व बाहेर जेवायला जावे. 
 इतक्‍या पोळ्या करणे शक्‍य नसल्यास चक्क आदल्या दिवशी बाहेरून पोळ्या विकत आणाव्यात व फ्रीजमध्ये ठेवाव्यात. 
 पोळ्या २-३ दिवस फ्रीजमधे छान राहातात. आदल्या दिवशी जेवण झाल्यावर पोळ्या लगेच फ्रीजमधे ठेवाव्यात म्हणजे खराब होत नाहीत. अशा दोन-तीन, दोन-तीन उरलेल्या पोळ्या २-३ दिवस रोज फ्रीजमध्ये डब्यात जमा कराव्यात. 
 उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. तेव्हा कुस्करा करण्याआधी पोळीचा वास जरूर घेऊन बघावा. वास येत असेल तर त्या पोळ्या फेकून द्याव्या किंवा खताच्या खड्ड्यात घालाव्यात.

संबंधित बातम्या