फ्लॉवरची रस्साभाजी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

कुकिंग-बिकिंग
 

लग्नकार्यात आजकाल सगळीकडे पंजाबी पद्धतीने केलेल्या खूप मसालेदार भाज्या असतात. अतिरिक्त कांदा, लसूण, टोमॅटो, गरम मसाला आणि काजूपेस्ट घातलेल्या त्या भाज्या एखाद्या वेळीच खायला बऱ्या वाटतात. आजकाल घरोघरीही याच मसाल्यांनी धुमाकूळ घातलाय. पण कांदा, लसूण, टोमॅटो, गरम मसाला न घालताही आपण अप्रतिम चवीच्या भाज्या घरी करू शकतो. अशा या भाज्यांचा कधी कंटाळाही येत नाही व कधी त्रासही होत नाही. शिवाय करायलाही सोप्या. आज अशीच फुलकोबीची रस्साभाजी करू. 

साहित्य : दोन वाट्या चिरलेला फुलकोबी, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, २ चमचे धणे-जिरेपूड, १ चमचा काळा मसाला, २ टेबलस्पून किसलेले सुके खोबरे, १ चमचा मीठ, १ चमचा साखर, १ चमचा खसखस, साधारण १ इंच आले, १-२ हिरव्या मिरच्या, ३-४ टेबलस्पून तेल. 

कृती : फ्लॉवर म्हणजेच फुलकोबी विकत घेताना नीट निवडून घ्यावा. फुलकोबी विकत घेताना पांढरा स्वच्छ व घट्ट असावा. घेतानाच उलटा करून, पाने बाजूला करून आत कीड नाही ना याची खात्री करून घ्यावी. हिवाळ्यात फ्लॉवर छान मिळतो. उन्हाळा वाढला की फ्लॉवरला अतिशय उग्र वास येऊ लागतो. कितीही धुतला तरी तो विशिष्ट वास जात नाही. पावसाळ्यात फ्लॉवरला कीड बरीच असते. 

फुलकोबीचे तुरे काढून मध्यम आकारात चिरून घ्यावे. चिरलेली फुलकोबी, कोथिंबीर, आले व हिरवी मिरची धुऊन घ्यावी. कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घ्यावी. आले किसून किंवा वाटून घ्यावे. 

आता गॅसवर कढईत किसलेले सुके खोबरे, खसखस खमंग भाजून घ्यावे व मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावे. त्याच कढईत तेलात मोहोरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. मोहोरी तडतडली की त्यात मिरच्या, हळद, तिखट घालून लगेच चिरलेली फुलकोबी व किसलेले किंवा वाटलेले आले घालावे आणि चांगले परतून घ्यावे. दोन-तीन मिनिटे परतल्यानंतर धणे-जिरेपूड, काळा मसाला व बारीक केलेले खसखस, खोबरे घालून परतावे. दोन-तीन मिनिटे परतल्यानंतर साखर (ऐच्छिक), मीठ व दीड वाटी पाणी घालून मिसळून भाजीवर झाकण ठेवावे व गॅस मंद करावा. चार ते पाच मिनिटांनी गॅस बंद करावा. फार शिजलेली भाजी चांगली लागत नाही. वाढतेवेळी भाजी गरम करून वर कोथिंबीर पसरावी. 

टीपा : 

  • उन्हाळ्यात फुलकोबीला उग्र वास असतो. तो कमी होण्यासाठी भाजी शिजवताना एक-दोन चमचे दूध घालावे. 
  • फुलकोबीची भाजी करताना मधला मोठा दांडा व पाने, न फेकता त्याबरोबर एक - दोन टोमॅटो, कोथिंबिरीच्या किंवा मेथीसकट कुठल्याही पालेभाजीच्या काड्या, एखादा कांदा, गाजराचा तुकडा, दुधी, मटार वगैरेंची साले, एखादा बटाटा असे जे काही असेल ते सगळे स्वच्छ धुऊन, चिरून भरपूर पाण्यात उकळत ठेवावे. गाळून ते पाणी फ्रीजमधे ठेवावे. हे व्हेजिटेबल स्टॉक म्हणून बऱ्याच पदार्थांत वापरता येते किंवा मीठ, मिरे, हवे तर आले किंवा लसूण किंवा दालचिनी व चवीला थोडी साखर घालून मिक्‍सरमधून वाटून, गाळून त्याचे मस्त सूप करता येते. 
  • उरलेला चोथा कुंडीत घालावा. कचऱ्याची समस्या दूर होते. झाडांना फुकटचे खत मिळते व आणलेल्या भाजीचा कण अन कण वापरला जातो. पैशांचा आणि नैसर्गिक संसाधनांचा पूर्ण विनियोग. 
  • पावसाळ्यात फ्लॉवरमधे खूपच बारीक, फिक्‍या हिरव्या अळ्या लपलेल्या असतात. फ्लॉवरचे तुरे त्यामुळे बारकाईने तर निवडावेच, पण निवडल्यानंतर ते गरम पाण्यात हळद व मीठ घालून ५-१० मिनिटे बुडवून ठेवावे. म्हणजे एखादी अळी राहिली असेल तर निघून येते. 
  • याच भाजीत हवे तर कधी ओले वाटाणे, कधी उकडलेल्या बटाट्याच्या फोडी किंवा कधी दोन्ही घालावे. प्रत्येक वेळी थोडा बदल केला की चांगले वाटते. 
  • रस्सा लाल आवडत असल्यास काश्‍मिरी मिरचीचे तिखट घालावे. 
  • भाजीत साखर आवडत नसल्यास थोडे तेल, तिखट व मीठ जास्त घातले तर हीच भाजी झणझणीत तिखट करता येईल.

संबंधित बातम्या