खजुराचे लोणचे 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 4 मार्च 2019

कुकिंग-बिकिंग
 

करायला अगदी सोपे, खायला चविष्ट आणि शिवाय अत्यंत पौष्टिक! खजुराचे लोणचे! वर्षभरात कोणत्याही ऋतूत होणारे. पराठे, पुऱ्या, धिरडी अशा कोणत्याही पदार्थांची इन्स्टंट चव वाढवणारे! 
साहित्य : एक वाटी खजूर, अर्धी वाटी गूळ, अर्धी वाटी लिंबाचा रस, १ चमचा तेल (ऐच्छिक), अर्धा चमचा पादेलोण, पाव चमचा हिंग, १ चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ, १ चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर. 
कृती : एक वाटी खजुराच्या बिया घ्याव्या व अडकित्ता किंवा सुरीने कापून त्यातील देठाजवळचा छोटासा कडक पापुद्रा व आतली बी काढून स्वच्छ करून घ्याव्यात. एका खजुराचे आवडीप्रमाणे लांब वा लहान चार किंवा आठ तुकडे याप्रमाणे सगळ्या खजुरांचे तुकडे  करावे. त्यापेक्षा लहान तुकडे करू नयेत. खजुराच्या बी जवळ एखादवेळी कीड असते. ती साफ करावी. खजूर धुऊन घ्यायचे असल्यास बी व देठ काढल्यावर धुऊन घ्यावेत व नंतर चिरावेत. असा धुतलेला खजूर थोडा पंख्याखाली कापडावर सुकवून घ्यावा. नॉनस्टिक कढईत एक चहाचा चमचा तेल व बारीक केलेला अर्धी वाटी गूळ घालावा. गॅस मध्यम आचेवर पेटवून गूळ सतत हलवत वितळवून घ्यावा. यात आता चिरलेले एक वाटी खजुराचे तुकडे, अर्धी वाटी लिंबाचा रस, अर्धा चमचा काळे मीठ (पादेलोण), पाव चमचा हिंग, १ चमचा तिखट, अर्धा चमचा साधे मीठ, १ चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून ४ ते ५ मिनिटे मंद आचेवर शिजवावे. फार घट्ट करू नये. थंड झाल्यावर काचेच्या लहान बरणीत काढून फ्रीजमधे ठेवावे. 

टीप्स : 
     या लोणच्यात गुळाऐवजी साखर घालता येईल किंवा गूळ व साखर अर्धी - अर्धी घेता येईल. 
     तेल, पादेलोण व हिंग घातले नाही तर हे लोणचे उपासालाही चालेल. 
     हे लोणचे केल्याबरोबर लगेचच खाण्यास घेता येते. 
     खजुरात लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच खजुरातून व्हिटॅमिन ए, के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम प्राप्त होते. खजुरात फायबरही बऱ्याच प्रमाणात असल्यामुळे पचन व उत्सर्जन यासाठी तो उपयुक्त असतो. यात ग्लुकोज असल्याने लवकर ऊर्जा मिळते. या लोणच्यात लिंबाचा रस घातल्याने व्हिटॅमिन सी व गुळातून बरीच खनिजंही मिळतात.

संबंधित बातम्या