मूग गाजराचे आप्पे

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 11 मार्च 2019

कुकिंग-बिकिंग
 

‘काहीतरी वेगळं कर बॉ!’ ‘उपमा, पोहे नको..’ अशी मुलांची फर्माईश आल्यावर काय करायचे हा नेहमी पडणारा प्रश्न! घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कमीतकमी वेळात, कमीतकमी कष्टात होणारा, तळकट, तेलकट नसणारा आणि पाहिल्याबरोबर खावासा वाटणारा चविष्ट पदार्थ म्हणजे आप्पे. वरून कुरकुरीत व आतून जाळीदार लुसलुशीत! चला तर मग आज करूया आप्पे! 

साहित्य : एक वाटी रवा, १ वाटी भिजवलेले मूग, पाऊण ते १ वाटी गाजराचा कीस, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ वाटी तांदळाचे पीठ, १ कांदा बारीक चिरून, पाऊण वाटी दही, २ पाकिटे इनो, २ टेबलस्पून तेल, १-२ मिरच्या, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा मीठ, १ चमचा साखर, १ चमचा जिरे, १ चमचा मोहरी, २ चमचे तीळ. 

कृती : गाजर धुऊन किसून घ्यावे. कांदा सोलून बारीक चिरून घ्यावा. हिरवी मिरची, कोथिंबीर धुऊन चिरून घ्यावी. रात्रभर भिजवून ठेवलेल्या मुगातून १ वाटी मूग घेऊन त्यात अर्धी वाटी पाणी घालून वाटून घ्यावे. एका मोठ्या पातेल्यात १ वाटी रवा, १ वाटी तांदळाचे पीठ, वाटीभर वाटलेले मूग, चिरलेली मिरची, कोथिंबीर व कांदा, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट, पाऊण वाटी दही, १ चमचा जिरे, १ चमचा मीठ व १ चमचा साखर घ्यावी. त्यात सव्वादोन ते अडीच वाट्या पाणी घालून चमच्याने चांगले मिसळून घ्यावे. 

दुसरे एक भांडे घेऊन त्यात यातील २/३ मिश्रण काढून ठेवावे. इनोची २ पाकिटे फोडून त्यातील पावडरचे एकंदर तीन सारखे भाग करावे. आप्पेपात्र मंद आचेवर तापत ठेवावे व त्यातील खोलगट भागाला ब्रशने तेल लावावे. साधारण थेंबभर तेल असेल, त्यात थोडी थोडी मोहरी व थोडे थोडे तीळ टाकावे. 

आता तयार मिश्रणापैकी एक भाग मिश्रण घेऊन त्यात एकत्र केलेल्या इनोचा एक भाग घालून भरभर ढवळावे. मिश्रण लगेच फुलून दुप्पट होईल. आता हे मिश्रण आप्पेपात्रातल्या प्रत्येक भागात फुटणाऱ्या मोहरी तिळावर घालावे. या मिश्रणाने साधारण १२ आप्पे होतील. आता झाकण ठेवून मंद/मध्यम आचेवर आप्पे होऊ द्यावे. ३ मिनिटे झाली की झाकण उघडून पाहावे. आप्पेपात्राबरोबर आलेल्या लाकडी काट्याने एक आप्पा उलटून पाहावा. खालून खरपूस झाला असल्यास बाकीचे आप्पेही उलटावे व २-३ मिनिटे आप्पे थोडे तेल सोडून दुसऱ्या बाजूनेही खरपूस होईपर्यंत भाजावे. नारळाच्या हिरव्या चटणीबरोबर किंवा खट्टामिठा सॉसबरोबर खायला द्यावे. 

वरील साहित्याचे साधारण ३६ आप्पे होतील. एका व्यक्तीस ६ ते ८ आप्पे नाश्‍त्याला पुरतात. एवढे आप्पे ४-५ जणांना नक्कीच पुरतील. 
 

संबंधित बातम्या