बाखरवडी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 1 एप्रिल 2019

कुकिंग-बिकिंग
 

बाखरवडीला विदर्भात बाखरवडी, पुणे-मुंबई भागात बाकरवडी किंवा गुजरातेत भाकरवडीपण म्हणतात. बाखरवडी म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर एकच नाव येते - चितळे! मीही या पदार्थाची जबरदस्त फॅन आहे. पण बाहेर मिळणारी प्रत्येक गोष्ट घरी करून पाहायचीच, हा खास सुगरणीचा बाणा असल्याने मग प्रयोग करायला सुरुवात केली आणि बाखरवडी जमली. त्यानंतर मग घरीच बाखरवडी करायला सुरुवात केली. घरची, ताजीताजी आणि टेलरमेड बाखरवडी आज तुम्हीही करून पाहा. सोपी आणि स्वादिष्ट बाखरवडी! 

साहित्य : वरच्या पारीकरता - दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी डाळीचे पीठ, अर्धा चमचा मीठ, ५ चहाचे चमचे तेल व साधारण एक वाटी पाणी. 
सारणाकरता - एक वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, १ वाटी बारीक शेव (झिरो नंबरपेक्षा थोडी जाड), १ वाटी चिंचगुळाची घट्टसर चटणी, १ चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा मीठ, ४ चहाचे चमचे (किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त) तिखट, १ चमचा बडीशेप, अर्धा लिटर तळण्यासाठी तेल. 
चिंचगुळाच्या चटणीसाठी - एक वाटी चिंच, १ वाटी गूळ, १/३ चमचा मीठ. (एक तास भिजवून, मिक्‍सरमधून काढून, गाळून, थोडे घट्ट होईपर्यंत शिजवून ठेवावे.) 

कृती : दोन वाट्या मैदा, अर्धी वाटी बेसन, ५ चमचे तेल, अर्धा चमचा मीठ एका परातीत घेऊन त्यात साधारण एक वाटी पाणी घालून घट्ट भिजवून घ्यावे. गोळ्याला तेलाचा हात लावून १० मिनिटे झाकून ठेवावे. 
तीळ, खोबरे, शेंगदाणे, वेगवेगळे किंचित भाजून किंवा कच्चेच मिक्‍सरमधून वेगवेगळेच जाडसर वाटून एका भांड्यात काढून घ्यावे. धने, जिरे, बडीशेपही जरासे तिळाबरोबरच भाजून किंवा कच्चेच भरडसर वाटून घ्यावे. फार भाजू नये. त्यात चार चमचे पिठीसाखर, १ चमचा मीठ आणि ३ ते ४ चमचे तिखट घालावे व चांगले मिसळून घ्यावे. 
मैद्याचे चार गोळे करावे व त्यातील एक गोळा लाटून मोठी पातळ पोळी लाटावी. ती सुरीने चौकोनी आकारात कापून घ्यावी. आता या पोळीवर एका कडेला किंचित जागा मोकळी सोडून एक टेबलस्पून चिंचगुळाची चटणी लावावी. या चटणीवर दोन टेबलस्पून सारण पसरावे. सारणाबरोबरच शेवही भुरभुरावी व मग त्यावर एक प्लास्टिकचा कागद घालून लाटण्याने हलके लाटावे. 
लाटून झाले, की सारण न लावलेल्या काठावर बोटाने किंचित पाणी लावून घ्यावे व दुसऱ्या बाजूने पोळीची घट्ट वळकटी करत आणावी. कडेला लावलेल्या पाण्यामुळे बाखरवडी व्यवस्थित चिकटेल व तळताना सुटणार नाही. 
आता या गुंडाळीचे सुरीने आवडीप्रमाणे लहान काप करून घ्यावे. सर्वसाधारणपणे १० ते १२ भाग होतील. हे काप पोळपाटावर कापलेली बाजू वर येईल असे ठेवावे व अंगठ्याने दाब द्यावा; जेणेकरून तळताना सारण बाहेर येऊन तेलात पसरणार नाही. 
कढईत पुरेसे तेल घेऊन तेल गरम करून घ्यावे. मग गॅसची आच मंद करून सगळ्या वड्या मंद आचेवर खमंग तळून घ्याव्यात. जास्त आच ठेवली, तर वड्या वरून ब्राऊन झाल्या तरी आतून ओल्या व कच्च्या राहतील आणि मऊ पडतील. तळताना वड्या झाऱ्याने वर-खाली करत राहाव्यात, म्हणजे छान एकसारखा रंग येईल. 
वरील साहित्याच्या साधारण ४४-४८ वड्या होतील व चार-पाच जणांना पुरतील. 

टीपा : 

  • वड्या करण्याआधी नेहमी सारणाची चव घेऊन पाहावी. सारण जरुरीपेक्षा थोडे जास्त तिखट, खारट, आंबटगोड असावे. कारण पारीमुळे खाताना चव थोडी (नुसत्या सारणापेक्षा) माइल्ड लागते. 
  • तीळ, खोबरे, दाणे, धने, जिरे, बडीशेप कच्चेच मिक्‍सरमधून बारीक केले तरी चालतील. कारण वड्या तळताना ते सगळे पदार्थ खमंग तळले जातातच. 
  • चिंच व गूळ शक्‍यतो जास्त गडद रंगाचा घेऊ नये. नाहीतर तळल्यावर सारणाला जास्त काळा रंग येतो. 
  • चिंचेची चटणी जास्त करून ठेवावी. बरेच दिवस/महिने फ्रिजमधे टिकते. कधीही आमटी, भाजीत घालता येते. 
  • आतले तीळ-खोबऱ्याचे जे सारण असते, त्याला ‘बाखर’ म्हणतात. म्हणून नाव बाखरवडी. ढेमशाची किंवा लाल भोपळ्याची अशी खोबरे, खसखशीचा मसाला भरलेली किंवा घातलेली भाजी असते. तिला अनुक्रमे ढेमशाची किंवा भोपळ्याची बाखरभाजी म्हणतात.
     

संबंधित बातम्या