पावभाजी

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 22 एप्रिल 2019

कुकिंग-बिकिंग
 

पावभाजी, वडापाव अशा पदार्थांच्या नुसत्या कल्पनेनेसुद्धा भूक लागते. त्यात रस्त्यावरून हॉटेलसमोरून जाताना असा पावभाजीचा वगैरेचा येणारा वास जीभ चाळवूनच जातो. 
घरी मित्रमंडळींना बोलवायचे असेल तर हा पोटभरू पदार्थ उत्तम. बरोबर वेगळा काही पदार्थ करायची गरज नाही व पोळ्याबिळ्या लाटायचे कष्टही नाहीत. सकाळीच पावभाजीची तयारी करून फ्रीजमध्ये ठेवली तर संध्याकाळी १५-२० मिनिटात पावभाजी तयार. भाजी सकाळीच तयार करून फ्रीजमध्ये ठेवली तर आणखीनच सोपे. वेळेवर मायक्रोवेव्ह केली व पाव गरम केले की झाले! 
आज ही चविष्ट पावभाजी झटपट कशी करायची ते पाहू. 

साहित्य : पावभाजीसाठी : सहा मध्यम आकाराचे बटाटे, २ मध्यम आकाराचे कांदे, ४ मध्यम आकाराचे टोमॅटो, १२-१५ लसणाच्या कळ्या, दीड इंच आले, १ तिखट हिरवी मिरची, अर्धी वाटी तेल, तीन चहाचे चमचे भरून एव्हरेस्ट पावभाजी मसाला, तीन सपाट चहाचे चमचे काश्‍मिरी तिखट, पाऊण चमचा हळद, दोन चहाचे चमचे मीठ, ५० ग्रॅम अमूल बटर, चिमूटभर ऑरेंज रेड खायचा रंग. 
पावासाठी : १६ पाव, १०० ग्रॅम बटर. 
सजावटीसाठी : दोन कांदे बारीक चिरून, २ लिंबे प्रत्येकी आठ फोडी करून, अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून, ५० ग्रॅम बटर. 

कृती : बटाटे स्वच्छ धुऊन एका भांड्यात थोडे पाणी घालून त्यात ठेवावे व मग कुकरमध्ये पाणी घालावे. त्यात हे भांडे ठेवून कुकरच्या दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे. गॅस बंद करून कुकरची वाफ गेली की सोलून, हाताने अथवा मॅशरने चांगले बारीक कुस्करून घ्यावे. 
दोन कांदे घेऊन त्याचे चार तुकडे करून मिक्‍सरच्या लहान भांड्यात घ्यावे. त्यातच आल्याचे तुकडे, हिरवी मिरची व लसूणाच्या पाकळ्या घालून छान बारीक वाटून घ्यावे. टोमॅटोंचेही चार-चार तुकडे करून मिक्‍सरमधून बारीक वाटून घ्यावे. गॅसवर एकीकडे कढईत अर्धी वाटी तेल घ्यावे. तेल तापले, की त्यात वाटलेले कांदा, आले, मिरची, लसूण व ५० ग्रॅम बटर घालावे व मध्यम आचेवर खूप चांगले खमंग लालसर होईपर्यंत परतावे. जळू देऊ नये. यात आता टोमॅटोची प्युरी (वाटलेले टोमॅटो) घालून पुन्हा तेल सुटेपर्यंत खूप परतावे. पाण्याचा अंश जाईपर्यंत परतले तरच टोमॅटोचा कच्चा उग्र वास जातो. नाहीतर पावभाजी वाईट लागते. आता यात पाऊण चमचा हळद, ३ चमचे भरून पावभाजी मसाला व कुस्करलेल्या बटाट्याचा गोळा घालावा. त्याचबरोबर कढईत लगेच दोन वाट्या पाणी, तीन चमचे काश्‍मिरी लाल तिखट, दोन चमचे मीठ व अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर घालून छान शिजवावे. आपल्या आवडीप्रमाणे भाजी पाणी घालून अथवा आटवून पातळ किंवा घट्ट करावी. 
तयारी करतानाच सुरुवातीला एका वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात चिमूटभर खायचा ऑरेंज रेड रंग मिसळून ठेवावा. रंग वापरायचा नसल्यास एखादे लहान बीटरूट धुऊन एखाद वाटी पाण्यात एका वेगळ्या भांड्यात घालून बटाट्यांबरोबरच उकडून घ्यावे व ते लाल पाणी रंगाऐवजी वापरावे (व बिटाची कोशिंबीर करावी.) 
आता भाजीत रंगाचे पाणी/बीटचे पाणी थोडेथोडे करत घालावे व ढवळत जावे. योग्य रंग आला, की पाणी घालणे बंद करावे. जास्त गडद रंग वाईट दिसतो. त्यामुळे रंग जास्त उरला असेल तर फेकून द्यावा. दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. 
सगळे पाव मधून आडवे कापून घ्यावेत. पूर्ण दोन तुकडे करू नये. सगळ्या पावांना कापलेल्या भागाला बटर लावून ठेवावे. पाव नीट झाकून ठेवावेत, नाहीतर वातड होतील. 
खायला घ्यायच्या वेळी तवा गरम करत ठेवावा व मध्यम आचेवर पाव तव्यावर उलगडून ठेवून सराट्याने किंचित दाबतदाबत आतून बाहेरून छान गरम भाजून घ्यावे. थोडे कुरकुरीत केले तरी मस्त लागतात. 
वाढताना गरमागरम पावभाजीवर चिरलेला कांदा व कोथिंबीर घालावी व वरती बटरचा छोटासा तुकडा/गोळा घालावा. बरोबर लिंबाची फोड आणि बटरमध्ये भाजलेले गरमागरम पाव द्यावे. 

टीप्स : 

  • पावभाजी नुसत्या बटाट्याची जास्त चांगली लागते. फ्लॉवर, वाटाणे, भोपळी मिरची वगैरे घालूनही चांगली होते, पण नुसत्या बटाट्याची जास्त चांगली लागते. 
  • पावभाजीसारखे पदार्थ करताना डाएट वा पौष्टिकतेचा खूप विचार करू नये. चव मारली जाते. हे पदार्थ आपण रोज करत नाही. एखाददिवशीच खायचे असल्याने छान चविष्ट करून खावे. बाजारपेक्षा स्वच्छ, आरोग्यदायी आहेत असा विचार करून आनंदाने करावे व खावे. अपराधी वाटून घेऊ नये. 
  • बटरच कमी घाल, बटाटे कमी करून भाज्याच जास्त घाल असे केले, तर चव वेगळी लागते. शिवाय इतके केले तरी शेवटी पावातून मैदा पोटात जाणारच असतो. त्यापेक्षा कमी वेळा खावे, कमी प्रमाणात खावे; पण चांगले चवीने खावे. 
  • बटर इतके सगळे लागेलच असे नाही. परंतु पावाला लावताना कमी पडायला नको म्हणून एकंदर २०० ग्रॅम सांगितले आहे. 
  • जेवणाचा ऑप्शन म्हणून करणार असल्यास प्रत्येकी ४ पाव गृहीत धरावे. नाश्‍त्यासाठी असेल तर प्रत्येकी दोन धरावे.

संबंधित बातम्या