गिलक्‍याची भाजी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 20 मे 2019

कुकिंग-बिकिंग
 

गिलके किंवा घोसाळे. यालाच इंग्रजीत स्पाँज गोर्डही म्हणतात.. यालाच विदर्भात ‘चोपडी दोडकी’पण म्हणतात. चोपडी म्हणजे गुळगुळीत व दोडकी म्हणजे शिराळी. वनस्पतिशास्त्रातली भावंडं! वेलावर येणारी. त्यामुळे साधारणपणे तारांचा मांडव करून किंवा घरावर वेल चढवतात म्हणजे घोसाळी/गिलकी मांडवाखाली लटकतात, डाग न येता वाढतात व तोडायलाही सोपे जाते. दुधी, कारली या भाज्याही अशाच तऱ्हेने मांडव घालून त्यावर चढवतात. 

ही लहानपणी फारशी न आवडणारी पण मोठे झाल्यावर खूप आवडू लागलेली भाजी. गिलकं वा गिलके, दोडकं वा दोडके, घोसाळं वा घोसाळे ही एकवचने व गिलकी, दोडकी, घोसाळी ही अनेकवचने. गिलक्‍याची कोशिंबीर व थालीपीठे छान होतात. गिलक्‍याची भजी जास्त पॉप्युलर आहेत. 
आज आपण चटकन होणारी सोपी, तरीही चविष्ट अशी गिलक्‍याची भाजी करू. 

साहित्य : दोन मध्यम आकाराची गिलकी, अर्धी वाटी चण्याची डाळ, एक-दीड टेबलस्पून तेल, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, १ चमचा गोडा/काळा मसाला, १ गुळाचा लिंबाएवढा खडा, अर्धा चमचा मीठ, चिमूटभर हिंग, कोथिंबीर. 
कृती : चण्याची डाळ धुऊन पाण्यात भिजत घालावी, गिलकी व कोथिंबीर स्वच्छ धुऊन घ्यावी. गिलके घेऊन त्याचे उभे चार भाग व नंतर ते चारही भाग डाव्या हातात पकडून त्यांचे अर्धा इंचाचे तुकडे कापून घ्यावे. 
कढई तापत ठेवावी. त्यात एक ते दीड टेबलस्पून तेल घालावे. तेल तापले की मोहोरी घालावी व ती तडतडू लागली की लगेच हिंग, हळद व तिखट घालावे. लगेच चण्याची भिजवलेली डाळ घालावी. अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवून डाळ दोन-तीन मिनिटे शिजू द्यावी. नंतर त्यात चिरलेली गिलकी घालून झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे थोडे शिजवावे व त्यानंतर गूळ, मीठ व काळा मसाला घालून परतावे. पाणी आटले असेल, तर अर्धी वाटी पाणी घालून पुन्हा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. वाढताना बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घ्यावे.  

टीप्स : 
 भाजीला तळाशी दोन - तीन चमचे रस राहील इतपत ओलसर असावी, म्हणजे जास्त चांगली लागते. अगदी कोरडी नको. 
 डाळ अर्धातास आधी भिजवलेली असेल तर चांगले. पटकन शिजेल. पण डाळ भिजवलेली नसेल व घाई असेल तेव्हा डाळ धुऊन फोडणीत टाकावी. एक वाटी पाणी टाकून, झाकण ठेवून आधी पाच मिनिटे शिजवून घ्यावी. ती शिजत असताना भाजी पटपट चिरून होईल.

संबंधित बातम्या