मसालेदार कुरकुरीत चणे 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 10 जून 2019

कुकिंग-बिकिंग
 

साहित्य : दोन वाट्या काबुली चणे, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा पादेलोण, अर्धा चमचा आमचूर पावडर, तळण्यासाठी तेल. 

कृती : काबुली चणे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. ३-४ वाट्या पिण्याच्या पाण्यात ६-७ तास भिजत घालावेत. चणे फुगून ते दुप्पट होतील. ६-७ तासांनंतर चण्यातील पाणी काढून टाकावे व त्यात २ वाट्या ताजे प्यायचे पाणी घालून कुकरमध्ये एक शिटी होईपर्यंत शिजवावे व गॅस बंद करावा. कुकरची वाफ गेल्याबरोबर चणे गाळणीत ओतून त्यातील पाणी काढून टाकून एखाद्या स्वच्छ फडक्‍यावर चणे पसरावेत. पंख्याखाली २ तास सुकत ठेवावेत. २ तासात ते थोडे सुकतील. मग एका कढईत २-३ वाट्या तेल गरम करत ठेवावे. तेल तापले, की गॅस मध्यम करून त्यात साधारण २ वाट्या उकडून सुकवलेले चणे घालावेत. सुरुवातीला चणे कढईत बुडाशी बसतील. पण जसजसे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होईल, तसतसे चणे तेलावर तरंगू लागतील. चणे कोरडे होऊन तरंगू लागले, की लगेच बाहेर काढावेत. याप्रमाणे बाकीचेही चणे तळून घ्यावे. 
एकीकडे धणे व जिरे तव्यावर भाजून घ्यावेत. मिक्‍सरच्या लहान भांड्यात मीठ, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा भाजलेले धणे, अर्धा चमचा भाजलेले जिरे, अर्धा चमचा पादेलोण, अर्धा चमचा साखर व अर्धा चमचा आमचूर पावडर बारीक करून घ्यावी. या पावडरमधील एक ते दीड चमचा पावडर तळलेल्या कुरकुरीत चण्यांवर घालून सगळे चणे खालीवर करून मसाला सगळ्या चण्यांना लागेल असे पाहावे. थंड झाल्यावर हवाबंद बाटलीत भरून ठेवावेत. खायला घेताना लहान वाटीत घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर घालून व लिंबू पिळून द्यावे. पार्टीमध्ये स्टार्टर्सबरोबर हे चणे मजा आणतात. एरवी घरी सिनेमा वगैरे पाहताना नुसतेच तोंडात टाकायलाही उत्तम. तयार केलेला मसालाही एखाद्या डबीत भरून ठेवावा व चाट मसाल्याच्या जागी वापरावा.

संबंधित बातम्या