खाऱ्या सळ्या 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 17 जून 2019

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

साहित्य : दोन वाट्या मैदा, अर्धा चमचा मीठ, १५-२० काळीमिरीचे दाणे, अर्धा चमचा कलौंजी (कांद्याचे बी), ४ चहाचे चमचे तेल, एक वाटी पाणी, तळण्यासाठी २-३ वाट्या तेल. 

कृती : दोन वाटी मैदा बारीक चाळणीने चाळून घ्यावा. अर्धा चमचा मिऱ्याची जाडसर पूड करून त्यात घालावी. मैद्यात चार चमचे तेल, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा कलौंजी घालून नीट मिसळून मग त्यात साधारण एक वाटी पाणी घालावे. त्यानंतर पुऱ्यांसाठी गोळा भिजवतो तसा घट्ट गोळा भिजवावा. गोळ्याला तेलाचा हात लावून झाकून १५ मिनिटे ठेवून द्यावा. 
पंधरा मिनिटांनंतर गोळा मळून 
घ्यावा. मोठ्या गोळ्याचे लहान तीन किंवा 
चार गोळे करावेत. एक गोळा घेऊन मैदा लावून अथवा पोळपाट लाटण्याला तेल 
लावून नेहमीसारखी पोळी लाटून घ्यावी. आता सुरीने किंवा कातणीने साधारण एका सेंटीमीटरमध्ये तीन ते चार पट्ट्या; या आकारात त्याच्या बारीक लांब पट्ट्या कापून घ्याव्या. आडवे दोन काप दिले म्हणजे साधारण पाच सेंटीमीटर बाय पाव सेंटीमीटरच्या पट्ट्या होतील. 
कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले, की या पट्ट्या गॅसची आच मध्यम करून कुरकुरीत तळून घ्याव्या. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्या. महिनाभर टिकू शकतात. 

टीप्स : 

  • यात ओवा घालून वेगळ्या चवीच्या सळ्या करता येतील किंवा मैद्यात ओवा, मिरेपूड, कांद्याचे बी वगैरे न घालता फक्त तेल, मीठ घालून वरीलप्रमाणे सळ्या तळून घ्याव्या. 
  • गरम असतानाच त्यावर मीठ, तिखट, आमचूर पावडर व पिठीसाखर भुरभुरून नीट मिसळून घ्यावे. 
  • या सळ्या नुसत्या खायला छान लागतातच, तसेच मुलांना मधल्या वेळेचा किंवा डब्यातला खाऊ म्हणूनही देता येतात. 
  • पार्टीमध्ये एखाद्या चीज डीप किंवा चक्‍क्‍याच्या (हंग कर्ड) डिपबरोबर खायला आणखीन मजा येते. 
  • स्मॉल ईट्‌स वा फिंगरफूड म्हणून सुरुवातीला देता येतात.

संबंधित बातम्या