ग्वाकोमोली 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 24 जून 2019

कुकिंग-बिकिंग
 

अमेरिकेत ‘टॅको’ किंवा ‘नाचोज’बरोबर ‘ग्वाकोमोली’ हे डिप मेक्‍सिकन रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सर्व्ह केले जाते. आम्ही गेलो त्या मेक्‍सिकन रेस्टॉरंटमध्ये वेटर एक लाकडाचा ट्रे गळ्यात अडकवून सगळे साहित्य घेऊन आला. लगेच त्या ट्रे चे पाय ओपन करून त्याने त्याचा स्टॅंड कम टेबल केले आणि पाहता पाहता आमच्यासमोर भराभर एकेक पदार्थ कौशल्याने चिरतचिरत त्याने हा सुंदर पदार्थ झटपट तयार केला. त्याला सॅलडचा किंवा डिपचा प्रकार म्हणता येईल. पदार्थाचे मूळ मेक्‍सिकोतील असले, तरी यासाठी लागणारे ॲव्होकॅडो आता भारतात मोठ्या शहरांमध्ये मिळायला लागल्याने सहज करता येईल. 

साहित्य  एक मोठे ॲव्होकॅडो, १ लहान कांदा, १ मध्यम टोमॅटो, १ हिरवी मिरची, २-३ लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, अर्धे लिंबू, अर्धा चमचा मीठ, पाव चमचा मिरेपूड (व हवीच असल्यास अर्धा चमचा साखर. मूळ पदार्थात साखर घालत नाहीत.) 

कृती : ॲव्होकॅडो पिकले की त्याचा रंग गडद काळपट हिरवा होतो. असे पिकलेले ॲव्होकॅडो घ्यावेत व त्याचे उभे दोन भाग कापावे. मधे एक मोठी टणक बी असते ती काढून टाकावी व चमच्यानं सगळा पिवळट व सुरेख हिरवट रंगाचा नरम गर एका बोलमधे काढून घ्यावा. काट्याने किंवा मॅशरने दाबूनदाबून बारीक करून जरा फेटावा म्हणजे क्रीमी बेस तयार होईल. लसणीच्या एक-दोन पाकळ्या ठेचून बारीक करून त्यात घालाव्यात. 
एक लहान कांदा व मध्यम टोमॅटो (बिया काढून) अगदी बारीक चिरून घ्यावा. कोथिंबीर व मिरचीही बारीक चिरून घ्यावी. आता हा चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची ॲव्होकॅडोमध्ये टाकावी. मीठ, मिरेपूड, अर्ध्या लिंबाचा रसही त्यात घालावा व छान एकत्र करावे. टॅको किंवा नाचोज बरोबर हे डिप मेक्‍सिकन रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सर्व्ह केलं जातं. पण आपण ॲव्होकॅडोची ग्वाकोमोली चोराफली, खाकरा, मैद्याच्या खस्ता पुऱ्या, खारे शंकरपाळे, ब्रेड स्टिक्‍स, चकली स्टिक्‍स अशा कुरकुरीत पदार्थांबरोबर स्टार्टर म्हणून सर्व्ह करू शकतो. टोस्टला लावून सॅंडविचदेखील करू शकतो. 
ॲव्होकॅडोमधून आपल्याला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, ई, के, बी-६, रायबोफ्लेव्हिन, नियासिन, पॅंटोथेनिक ॲसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम तसेच ओमेगा-३ फॅटी ॲसिड्‌स मिळतात. यात डाएटरी फायबर/चोथाही भरपूर असल्याने पोट भरल्याची जाणीव लवकर होते व बराच काळ भूक लागत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. 
आपल्याकडे हे फळ/फळभाजी जरा जास्त महाग असल्याने फारसे वापरले जात नाही. परंतु वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना या फळाचा फायदा होईल.

संबंधित बातम्या