फरसबी किंवा फ्रेंचबीन्सची भाजी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 15 जुलै 2019

कुकिंग-बिकिंग
 

फ्रेंचबीन्सच्या कोवळ्या शेंगा या त्यांच्या सौम्य चवीमुळे अनेक पदार्थांमध्ये वापरता येतात. शिरा व देठे काढून, एकेका शेंगेचे दोन लांब तुकडे करून, बटरमध्ये परतून व त्यावर मीठमिरं भुरकवून नुसत्याच खायलाही उत्तम लागतात. आज आपण त्यांची जरा चमचमीत भाजी करणार आहोत. 

साहित्य : साधारण ३ वाट्या बारीक चिरलेल्या फ्रेंचबीन्स, १ मोठा उकडून - सोलून - चिरून घेतलेला बटाटा, २ बारीक चिरलेले टोमॅटो, १ बारीक चिरलेला कांदा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ मोठा डाव तेल, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट (आवडीनुसार कमी-जास्त), २ चमचे धनेपूड, १ चमचा जिरेपूड, १ चमचा गरम मसाला, १ चमचा मीठ, १ चमचा साखर (ऐच्छिक). 

कृती : भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्या. शेंगांची देठे व टोकाकडचा लहानसा तुकडा तोडावा. त्याबरोबर निघेल ती शीर काढून टाकावी. शेंगा बारीक चिरून घ्याव्या. बटाटा उकडून, साले काढून चिरून घ्यावा. कांदा व कोथिंबीरही स्वच्छ धुऊन चिरून घ्यावे.
कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात मोहोरी, जिरे व हिंग घालावे. मोहोरी व जिरे फुटल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावे. मग त्यात टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत खूप परतावे. आता त्यात धनेपूड, जिरे पूड, हळद, तिखट घालून पुन्हा छान परतावे. दोन-तीन मिनिटांनी मग त्यात चिरलेल्या शेंगा, बटाटे घालून परतावे व पाण्याचे झाकण ठेवून गॅस मंद करावा. (कढईवर मोठे ताट किंवा ताटली सुलट ठेवावी व त्या ताटात एक वाटी प्यायचे पाणी घालावे. याला पाण्याचे झाकण ठेवणे म्हणतात. यामुळे भाजी पाणचट होत नाही, छान शिजते व तळाला लागतही (जळत) नाही.) 

पाच मिनिटांनी पाणी न सांडवता झाकण बाजूला करावे. भाजीत गरम मसाला, मीठ, साखर घालून परतावे. वाढताना यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वाढावे. 

टीप : 
      ही भाजी फार गाळ होईपर्यंत शिजवू     नये. 
      आवडत असल्यास शिजताना यात खवलेला नारळ किंवा शेंगदाण्याचे कूट घालून परतून घ्यावे.

संबंधित बातम्या