वांग्याबटाट्याची रस्साभाजी
कुकिंग-बिकिंग
साहित्य : दोन जरा मोठी वांगी, १ मोठा बटाटा, १ मोठा कांदा, लसणाच्या ७-८ पाकळ्या, बोटाच्या दोन पेरांएवढे आले, १ हिरवी मिरची, २ चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, १ चमचा खसखस, पाव चमचा हिंग, पाऊण चमचा हळद, दीड चमचा काश्मिरी तिखट, दीड चमचा गोडा मसाला, १ चमचा मीठ, २ चमचे भरून गूळ, कोथिंबीर, तेल.
कृती : वांगी स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी व एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात ते तुकडे बुडवून ठेवावे म्हणजे वांगे रापणार (काळे पडणार) नाही. बटाटा उकडून, चिरून तुकडे करून ठेवावा. कांदा, लसूण सोलून, तुकडे करून मिक्सरमधून बारीक वाटावे. वाटताना त्यात लालसर भाजून घेतलेला खोबऱ्याचा कीस, भाजलेली खसखस, हिरवी मिरची व आलेही घालावे.
कढईत दीड-दोन डाव तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर त्यात मोहोरी घालावी व ती तडतडू लागली, की लगेच हिंग घालून त्यात वाटलेला मसाला घालावा. मसाला सारखा परतत राहावा. जळू देऊ नये. चांगला लाल झाला व खमंग वास सुटला, की मग त्यात ब्याडगी किंवा काश्मिरी मिरचीचे तिखट, हळद घालून परतावे. मग त्यात वांग्याच्या व बटाट्याच्या फोडी घालून परतावे. थोडे परतल्यावर त्यात रस्सा दाट / पातळ हवा असेल तसे २-३ वाट्या पाणी, मीठ, गूळ व काळा मसाला घालावे. झाकण ठेवून साधारण दहा मिनिटे मंद गॅसवर शिजवावे. वरून कोथिंबीर पेरावी.
टीप :
- या भाजीत भाजलेल्या तिळाचे कूट दोन - तीन चमचे घातले, तरी मस्त चव येते व रस्साही दाट होतो.
- रस्सा पातळ वाटल्यास उकडलेल्या बटाट्याच्या २ - ३ फोडी कुस्करून त्यात घालाव्यात.