तोंडल्याची भाजी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कुकिंग-बिकिंग
 

साहित्य : साधारण ३ वाट्या भरून होतील इतकी तोंडली, डावभर तेल, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, १ चमचा तिखट. 
कृती : तोंडली स्वच्छ धुऊन त्यांच्या दोन्हीकडच्या टोकांचा भाग कापून टाकावा. तोंडल्याचे पातळ काप कापून घ्यावेत. कढईत एक मोठा डावभर तेल घ्यावे व गॅस पेटवावा. तेल तापल्यावर तेलात जिरे, मोहोरी घालून चांगले तडतडू द्यावे. मोहोरी तडतडत असतानाच पाव चमचा हिंग त्यात टाकावे व लगेच तोंडल्याचे काप टाकावेत. जरा परतून त्यात हळद, तिखट व मीठ घालून परतावे व झाकण ठेवून गॅस मंद करून भाजी शिजू द्यावी. मधून मधून झाकण काढून जरा परतून घ्यावी. पाणी घालू नये. आवडत असल्यास शिजवताना अर्धा चमचा साखर घालावी. साधारणपणे १०-१२ मिनिटांत भाजी शिजेल. कुरकुरीत हवी असल्यास झाकण काढून अजून४-५ मिनिटे परतत राहावे. कोथिंबीर घालून वाढावी.

टीप : 
     ही भाजी झटपट व मऊ करायची असल्यास कापल्यानंतर कुकरमध्ये वरणभाताबरोबरच शिजवून घ्यावी. शिजवताना भाजीत पाणी घालू नये किंवा घातलेच तर चमचा - दोन चमचे इतपतच घालावे. भाजी कुकरमधून काढल्यावर वरीलप्रमाणे फोडणी करून त्यात भाजी २-४ मिनिटे परतावी. या जरा मऊ शिजवलेल्या भाजीत धने, जिरेपूड व ओला नारळपण छान लागतो. या भाजीत तेल बरेच कमी घातले तरी चालते. 
     कुरकुरीत भाजी करायची झाल्यास नॉनस्टिक कढईत केल्यास सोपे जाते. या भाजीला तेल जरा जास्तच लागते व वेळही जरा जास्त लागतो.

Tags

संबंधित बातम्या