पालक टोमॅटोची आमटी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

कुकिंग-बिकिंग
 

रोजच्या घरगुती जेवणाचा आपल्याला कधी कंटाळा येत नाही. तेच हॉटेलमधलं सलग दोन वेळा जरी खावं लागलं तरी कंटाळा येतो. खूप जास्त मसाले, तेल हे तसे पोटालाही चांगले नसतात. रोजच्या वरण ,भात ,भाजी ,आमटी, कोशिंबीर , चटणीतला एक जरी पदार्थ आपण वेगळ्या पद्धतीने केला तरी मजा येते. 
आपली आई ,आजी या गृहिणी होत्या. तीच तुरीची डाळ पण रोज वेगळंच वरण! कसं जमलं असेल त्यांना? आपल्याला जमेल का? याचं उत्तर होय असं आहे. थोडी कल्पकता वापरली, तर सहज शक्य आहे. आज आपण असंच घरात उपलब्ध वस्तूंमधून चविष्ट पालक टोमॅटोचं फोडणीचं वरण करून पाहू. 
श्रावण सुरू आहे, त्यामुळे कृतीत लिहिलेला लसूण वगळूनही हे फोडणीचं वरण आपण करू शकू. 

साहित्य : एक वाटी तूर डाळ, १ मोठा टोमॅटो, ७-८ पालकाची पानं (मी ३ फ्रोझन क्यूब्ज घेतलेत पालकाचे), २ हिरव्या मिरच्या, २-३ लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर,कढीलिंबाची १०-१२ पाने, १ डावभर तेल, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हिंग, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, १ चमचा गोडा मसाला, १ चमचा चिंचेचा कोळ, १ टेबलस्पून गूळ. 

कृती : तूर डाळ स्वच्छ धुऊन त्यात दोन वाट्या पाणी घालून झाकून ठेवावी. मी शक्यतोवर सकाळचा चहा करतानाच डाळ धुऊन पाणी घालून भिजत ठेवून देते म्हणजे मग ती तास-दोन तासांनी कुकर लावला की भाताबरोबर दोन शिट्यांमधे छान शिजते. तुरीच्या डाळीत शिजवताना पाव चमचा हळद व पाव चमचा हिंग घालावा. कुकरमध्ये डाळ दोन-तीन शिट्या होईपर्यंत शिजू द्यावी. कुकर झाला की डाळ रवीने घुसळून एकजीव करून घ्यावी. टोमॅटो, हिरव्या मिरच्या, पालक व कोथिंबीर दोन-तीन पाण्यातून स्वच्छ धुऊन, चिरून वेगवेगळे ठेवावे. लसूण सोलून बारीक चिरून घ्यावा. 
    कढईत डावभर तेल गरम करत ठेवावे. तेल तापले, की त्यात अर्धा चमचा मोहोरी घालावी व ती तडतडू लागली की लगेच हिंग घालून त्यात चिरलेला लसूण घालून परतावे. लसूण किंचित लालसर होऊ लागला, की कढीलिंबाची पाने, हिरव्या मिरच्या व टोमॅटो घालून दोन मिनिटे चांगले परतावे. टोमॅटो शिजत आला, की त्यात बारीक चिरलेला पालक घालून दोन मिनिटे परतावे. पालकाचा रंग बदलला की त्यात पाव चमचा हळद, एक चमचा तिखट घालावे व घोटून ठेवलेले वरण घालावे. तीन वाट्या पाणी घालावे. मीठ, गोडा मसाला व गूळ घालून मध्यम आचेवर उकळू द्यावे. साधारण ८-१० मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करावा. वाढतेवेळी कोथिंबीर घालावी. 

टीप : 
१.     वरण शक्यतोवर लोखंडी कढईत करावे. याने रक्तातील लोह वाढण्यास मदत होते व वरणाला छान स्वादही येतो. 
२.     वरण व्यवस्थित उकळले की जास्त चविष्ट लागते. 
३.     लोखंडाच्या कढईत केलेले वरण अथवा कुठलाही पदार्थ लगेच स्टीलच्या अथवा काचेच्या भांड्यात काढावा म्हणजे कळकणार नाही. 
४.     हे वरण जरा पातळ जास्त छान लागते. आपल्या आवडीप्रमाणे घट्ट किंवा पातळ केल्यास चव घेऊन तिखटमीठ अॅडजस्ट करावे.

संबंधित बातम्या