नारळाची बर्फी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर. 

नारळी पौर्णिमा होऊन गेली, परंतु नारळाचे पदार्थ या दिवसात खायला मजाच येते. ओल्या नारळाच्या करंज्या, उकडीचे मोदक, तळलेले मोदक, नारळी भात आणि काय काय... आज आपण अगदी पटकन होणारी नारळाची बर्फी कशी करायची ते पाहू. 

साहित्य : एक मोठा नारळ (नारळाचा चव २ वाट्या), १ वाटी दूधपावडर, दीड वाटी साखर, ५-६ बदाम, ५-६ पिस्ते, २-३ चमचे तूप, १०-१२ वेलदोडे, अर्धे जायफळ. 

कृती : नारळाच्या शेंड्या काढून नारळ स्वच्छ धुवावा, म्हणजे त्याचा कचरा खवलेल्या नारळात पडणार नाही. त्यानंतर नारळ फोडून पाणी एका ग्लासमधे काढून ठेवावे. नारळ विळीवर, नारळ-खवणीवर अथवा प्रोसेसरला नारळ खवायची ॲटॅचमेंट असेल तर त्यावर खवून घ्यावा. अगदी करवंटीपर्यंत खरवडू नये, नाहीतर वड्या तितक्याशा छान दिसत नाहीत. करवंटीजवळचा नारळ भाग चमच्याने काढून तो चटणी/आमटी/सार वगैरेंसाठी वापरावा. 
एका मोठ्या नारळात साधारण दोन वाट्या चव निघतो. हा चव नॉनस्टिक कढईत घ्यावा. त्यात दोन चमचे तूप, पावणेदोन वाट्या साखर घालून गॅस चालू करावा. साखर विरघळून नारळ शिजत आला, की त्यात एक वाटी दूधपावडर घालावी. सतत तळापासून हलवत राहावे. आच मध्यमच ठेवावी. सगळा गोळा कढईपासून वेगळा होऊन सुटायला लागला,  की आच जरा मंद करून आणखी परतावे व गॅस बंद करावा. वेलदोडे तव्यावर दोन मिनिटे अथवा मायक्रोवेव्हमधे १५-२० सेकंद गरम करून घ्यावेत. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये दोन चमचे साखर व जायफळ घालून त्याची बारीक पूड करावी व वरील शिजवलेल्या मिश्रणात मिसळावी. काजू आणि पिस्त्याचे अडकित्त्याने काप करून ठेवावे. 
एका ताटाला चमचाभर तूप चोपडावे व तयार गोळा त्यात पसरावा व थापावा. त्यावर तयार केलेले काजू व पिस्त्याचे काप भुरभुरावे. नंतर त्यावर प्लास्टिकचे शीट पसरावे व वरून लाटणे फिरवावे. साधारण दोन - तीन तासांनी सुरीने वड्या कापाव्यात. सुरेख दिसतात व लागतातही छान!

संबंधित बातम्या