नारळ कसा सोलावा 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

कुकिंग-बिकिंग
 

नारळाच्या अनेक रेसिपीज आपण वाचत, पाहात असतो. तिखट चटणी आणि रश्शांपासून ते नारळीभातापर्यंत अनेक पदार्थ. सूप आणि कढीपासून मासळीपर्यंत. खूप रेसिपीज करून पाहाव्याशा वाटतात पण सोललेला, खवलेला वा किसलेला नारळ हाताशी नसतो, नारळाचे दूध नसते, नारळाचे काप जवळ नसतात. अनेकांना नारळ खवता/खवणता येत नसतो. अनेक ठिकाणी खवणी किंवा विळी जवळ नसते. बरे प्रत्येक पदार्थाला लागणारा नारळ वेगळा असतो. कशात किसलेला, कशात वाटलेला, कशात तुकडे, कशात काप, कशात  खवलेला... 

आज नारळ खवता न येणाऱ्यांसाठी आपण आख्खा नारळ फार कष्ट न करता दोन प्रकारे कसा सोलायचा ते पाहू. 

पहिली पद्धत 
एक नारळ घ्यावा. त्याची शेंडी काढून स्वच्छ धुऊन घ्यावा. शेंडी काढल्यावर त्याखाली नारळाचे तीन डोळे दिसतील, ते सुरीच्या टोकाने खरवडावे. त्या तीनमधील एक डोळा सहज निघतो, तो काढावा. आतला नारळाचा भाग दिसेल. त्यात एखाद्या पातळ सुरीने वा धुतलेल्या स्वच्छ टोकदार वस्तू म्हणजे विणायच्या सुईने अथवा स्टीलच्या स्क्रूड्रायव्हरने छिद्र करावे. आता छिद्रावर ग्लास ठेवून ग्लास उलटा करून ग्लासावर नारळ ठेवावा. सगळे पाणी ग्लासमधे जमा होईल. 
१) आता हा नारळ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून फ्रीझरमध्ये अर्धा एक तास ठेवावा. अर्धा तासाने नारळ बाहेर काढून ठेवावा. नारळाचे कवच तडकलेले असेल. दहा-पंधरा मिनिटांनी नारळ हातात घेऊन बत्त्याने वा सांडशीने नारळावर सगळीकडून हलके हलके प्रहार करावेत. कवचाचे सहजपणे तुकडे व्हायला लागतील. आता सगळे तुकडे हाताने बाजूला करावे, म्हणजे संपूर्ण नारळाचा पांढरा गोळा हाती येईल. काही ठिकाणी कथ्थ्या रंगाचे साल नारळाला चिकटलेले दिसेल ते बटाटे सोलायच्या सोलणीने काढून टाकावे. 

दुसरी पद्धत 
पहिल्या पद्धतीत १ नंबरच्या पॅराग्राफमध्ये सांगितल्याप्रमाणे कृती करावी व पाणी काढून घ्यावे. त्यानंतर नारळ गॅसवर ठेवून सगळ्या बाजूने फिरवत फिरवत पाच-सहा मिनिटे भाजावा. नारळाची करवंटी तडकू लागेल. अशी तडकली, की गॅस बंद करावा व पाच मिनिटांनी हातात घेऊन त्यावर सांडशी किंवा हातोड्याने हलके हलके मारत, फिरवत वरच्या करवंटीचे तुकडे बाजूला करावे. मग वरीलप्रमाणे नारळ वापरावा. 
हा नारळ आता किसता येईल, त्याचे तुकडे करून मिक्सरमधून काढून त्याचे दूध करता येईल व त्याचे कापही करता येतील. या नारळाचे तुकडे करून प्रोसेसरमधून किसून घेतला, तर काही रेसिपीजमध्ये वापरता येईल. पण जेव्हा खवलेल्या नारळाचे हलकेपण व टेक्श्चर हवे असते, तेव्हा हाच कीस प्रोसेसरमध्ये फिरवून घेतला तर बऱ्यापैकी आपल्याला हवे तसे टेक्श्चर मिळते.    

संबंधित बातम्या