दुधी हलवा 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

दुधीची भाजी आवडीने खाणाऱ्यांची संख्या तशी कमीच. पण सगळ्या आया सारख्याच. देवाने निर्माण केलेल्या सगळ्या भाज्या मुलांच्या पोटात गेल्याच पाहिजेत, असा हट्ट धरून दर आठवड्याला एकदातरी दुधीची भाजी करतातच. काही आया जरा प्रेमळ असतात. अर्थात त्याही हट्टी असतातच. कुठलीही भाजी आपल्या बबडी/बबड्याच्या पोटात घालायचीच हा त्यांचाही हट्ट असतोच. पण त्या जरा मुलांना आवडेल अशा पद्धतीने अशा भाज्यांचे पदार्थ करतात.( बहुधा त्यांनाही दुधी आवडत नसावा..) 
आज त्यामुळे आपण अशा समस्त दुधीपीडित लोकांसाठी झटपट दुधी हलवा करू. 

साहित्य : एक दुधी, २ वाट्या दूध पावडर, ४ चहाचे चमचे तूप, २ काजू, २ बदाम, २ पिस्ते. 

कृती : दुधी स्वच्छ धुऊन सोलणीने सोलून घ्यावा. दोन्ही टोकावरची एक बारीक चकती काढून कडू आहे का हे पाहावे. कडू असल्यास दुधी फेकून द्यावा व दुसरा दुधी घ्यावा. दुधी किसल्यानंतर कीस वाटीने मोजून नॉनस्टिक पॅनमध्ये घ्यावा. त्यात चार चहाचे चमचे तूप घालून दोन-तीन मिनिटे परतावे व झाकण झाकून मध्यम आचेवर आणखी दोन-तीन मिनिटे शिजवावे. आता झाकण बाजूला करून किसात दोन वाट्या दूध पावडर आणि चार चहाचे चमचे साखर घालावी. आता हे मिश्रण परतून, झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे शिजवावे. साखर विरघळली, की हवी असल्यास वेलदोडेपूड घातली की हलवा तयार. 
हलवा जरा थंड झाल्यावर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवावा. वाढताना चारोळ्या, काजू - बदामाचे काप घालून सजवावे. 

टिप्स :

  • दुधी घेताना फार वेडावाकडा घेऊ नये. 
  • करायच्या आधी दोन्ही टोकावरचा तुकडा चावून पाहावा. कडू निघाल्यास गिळू नये, थुंकून टाकावा. 
  • किसल्यानंतर लगेच हलवा करायला घ्यावा, म्हणजे कीस काळा पडणार नाही. 
  • कीस पाण्यात वगैरे धुवायची आवश्यकता नाही. व्हिटॅमिन्स वाया जातात. 
  • दूध पावडरऐवजी चार टेबलस्पून खवा घालायला हरकत नाही. पण सणासुदीच्या दिवसात खवा शिळा किंवा भेसळयुक्त असू शकतो, म्हणून दूध पावडर वापरली आहे. 
  • कीस दुधात आटवूनही शिजवता येतो. तुपात परतल्यानंतर त्यासाठी एक वाटी किसाला अर्धा कप तरी दूध घालावे. साखरही थोडी जास्त घालावी लागेल.

संबंधित बातम्या