खाराची मिरची (झटपट होणारी) 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

जेवण कितीही चविष्ट असले, तरी ताटाच्या डाव्या बाजूला कोशिंबिरी, चटण्या व्यवस्थित नसतील तर छोटेसे न्यून राहूनच जाते. भारतीय जेवणांमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या चटण्या, कोशिंबिरी आणि लोणच्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एखाद्या पदार्थाला पूरक व आंबट, तुरट, तिखट, खारट, गोड अशा चवीच्या या पदार्थांनी जिव्हेचे समाधान तर होतेच, परंतु शरीराला आवश्यक अशी व्हिटॅमिन्सही योग्य प्रमाणात पुरवली जातात. अगदी मिरचीच्या लोणच्यातूनही! कसे ते पाहूया... 

साहित्य : एक वाटीभर स्वच्छ धुऊन कोरड्या करून चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ५-६ चमचे लिंबाचा रस, १ चमचा मोहोरीची डाळ, १ चमचा मीठ, २ चमचे तेल, पाव चमचा मोहोरी, १०-१२ मेथीचे दाणे, अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद. 

कृती : आवडीप्रमाणे तिखट/कमी तिखट/मिक्स हिरव्या मिरच्या धुऊन त्यांची देठं काढून बारीक तुकडे करून घ्यावेत. कढईत दोन चमचे तेल तापवावे. तेल तापल्यावर त्यात मेथीदाणे घालावेत. मेथीदाणे लालसर झाले, की मग हळद व हिंग घालून खमंग फोडणी करावी. गॅस बंद करावा. मिरच्यांवर ५-६ चमचे लिंबाचा रस, १ चमचा मोहोरीची डाळ व पाऊण ते १ चमचा मीठ घालून त्यावर ही फोडणी ओतून नीट मिसळून घ्यावे. हे लोणचे एखाददोन दिवसात मुरते. परंतु ताजे ताजे खायलाही छान लागते. धिरडी, पोळ्या, थालीपिठे, भाकरीबरोबरही मस्त लागते. दहीभाताबरोबर किंवा वरणभाताबरोबरही मस्त लागते. पोह्यांबरोबरही छान लागते. 

टिपा : 
१. लिंबाचा रस व मिठामुळे हे लोणचे फ्रीजमध्ये १५-२० दिवस अवश्य टिकते. 
२. यातून तिखट, आंबट, कडू, खारट, तुरट असे सर्व रस, व्हिटॅमिन सी, B12 व इतर सूक्ष्म मूलद्रव्ये; जसे की कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम वगैरे मिळतात. डाएटरी फायबरपण मिळतो. 
३. गोपालकाल्यात घातले तर उत्तम चव येते.
 

संबंधित बातम्या