कोथिंबिरीची वडी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कुकिंग-बिकिंग
 

उन्हाळापावसाळ्यात कोथिंबिरीचा उपासच घडतो. १० रुपयांच्या चार काड्या आणून पुरवून पुरवून वापरताना जिवाला फार कष्ट होतात. पावसाळ्यात कोथिंबीर भरपूर उगवत असली, तरी बाजारातून घरी आणल्यावर फार टिकत नाही. ओली असल्याने लवकर खराब होते, सडते व खूप महागही असते. पण, पाऊस कमी झाल्याबरोबर छान ताज्या, कोवळ्या कोथिंबिरीचे ढीग खुणावू लागतात. मग उन्हाळ्यातली कसर भरून निघते. ज्यात त्यात भरपूर कोथिंबीर पेरलेली दिसू लागते. मग, कोथिंबिरीची भाजी, पराठे, पुडाच्या वड्या, भाजी, कोथिंबिरीच्या वड्या; इतकेच काय कोथिंबिरीचे लोणचेपण केले जाते. पुडाच्या वड्या हा विदर्भात केला जाणार प्रकार आपण आधी केला होता. आता आज पटकन होणारी कोथिंबीर वडी करू. 

साहित्य : एक मोठी जुडी कोथिंबीर (२ वाट्या भरून चिरलेली कोथिंबीर), १ वाटी जाडसर बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, २ चहाचे चमचे तीळ, १ चहाचा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, दीड ते २ चहाचे चमचे तिखट, पाऊण ते १ सपाट चहाचा चमचा मीठ, दीड ते २ चमचे साखर, २-३ चमचे तेल (मोहनासाठी), २ वाट्या तेल तळण्यासाठी. 

कृती : कोथिंबिरीच्या जुडीतून जाड, जून काड्या, मुळे, गवत किंवा इतर वनस्पतींची पाने, सडकी पाने काढून टाकावीत. निवडलेली कोथिंबीर एखाद्या मोठ्या, पाणी भरलेल्या गंजात टाकावी व वरखाली करून पाच दहा मिनिटे भिजू द्यावी, म्हणजे कोथिंबिरीला लागलेली माती तळाशी बसेल. वरची कोथिंबीर एखाद्या चाळणीत हाताने उचलून काढून घ्यावी व गंजातले पाणी ओतून देऊन गंजात पुन्हा स्वच्छ पाणी घेऊन त्यात चाळणीतील कोथिंबीर टाकून वरखाली करावी. खळबळून पुन्हा चाळणीत काढून घ्यावी. असे मळके पाणी जाईपर्यंत तीन ते चार वेळा तरी करावे. नंतर चाळणीतील पाणी निथळून गेलेली कोथिंबीर एखाद्या स्वच्छ फडक्यावर पसरून पंख्याखाली अर्धा तास सुकत ठेवावी. नंतर ही कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. आपल्याला साधारण २ वाट्या भरून कोथिंबीर लागेल. एका टोपात किंवा परातीत ही कोथिंबीर घेऊन त्यात एक वाटी जाडसर बेसन, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, २ चहाचे चमचे तीळ, १ चहाचा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, दीड ते २ चहाचे चमचे तिखट, पाऊण ते १ सपाट चहाचा चमचा मीठ, दीड ते २ चमचे साखर, २-३ चमचे तेल (मोहन) घालून मिसळून घ्यावे. त्यानंतर त्यात थोडे थोडे करत पाणी घालून कणकेसारखा गोळा हलक्या हाताने करून घ्यावा. फार मळू नये. त्यानंतर या गोळ्याचे दोन भाग करून फोटोतल्यासारखे दोन लांबट उंडे करावे. कुकरमध्ये किंवा एखाद्या गंजात दोन तीन पेले पाणी घालून गरम करत ठेवावे. कुकरच्या भाताच्या भांड्यात आतून तळाला तेल लावून घ्यावे. त्यात हे उंडे घालून कुकरमधे ठेवावेत. कुकरच्या झाकणाची शिटी काढून कुकरला झाकण लावावे व गॅसची आच मोठी करावी. पंधरा मिनिटे उंडे छान वाफवून घ्यावेत. झाकण काढून उंडे बाहेर काढून थंड होऊ द्यावे व मग त्यांचे साधारण पाव इंच जाडीचे काप करून घ्यावे. साधारण २० काप होतील. 

दरम्यान एका कढईत तेल गरम करत ठेवावे व तेलात वडीचा छोटा तुकडा टाकून तेल तापले आहे का ते पाहावे. तो लहान तुकडा लगेच चुर्रर्र आवाज करत वर आला की तेल छान तापले आहे असे समजावे व गॅसची आच मध्यम करून तेलात चार पाच काप टाकावेत. एका बाजूने लालसर झाले, की हलकेच उलटावे. सारखे उलटपालट करू नये, नाहीतर काप/वड्या तुटतात. दोन्ही बाजूने खमंग लालसर रंग आला, की झाऱ्याने वड्या प्लेटमध्येे टिश्यूपेपरवर काढून घ्याव्यात, म्हणजे जास्तीचे तेल कागद टिपून घेईल. याच पद्धतीने सर्व वड्या तळून घ्याव्यात. कुरकुरीत, खुसखुशीत, खमंग व चविष्ट कोथिंबीर वड्या दही किंवा चिंचेच्या चटणीबरोबर खायला द्याव्यात.  

टिप :

  • यात हवी असल्यास धनेजिरेपूडही घालू शकता. वेगळी चव येईल. 
  • उंडे करताना पाणी कमी झाल्यास उकडताना उंडे फुटतील व काप करताना त्यांचे तुकडे किंवा चुरा होईल. असे झाल्यास त्या चुऱ्यात थोडे पाणी, बेसन व तिखटमीठ घालून मळून घ्यावे. हातावर चपटे करून वडे करून तळावेत.

संबंधित बातम्या