हर्षवर्धन सदगीर : महाराष्ट्र केसरी

संपत मोरे
गुरुवार, 23 जानेवारी 2020

कव्हर स्टोरी
‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्पर्धांपैकी एक. दरवर्षी या स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळतो. याही वर्षी ही स्पर्धा अशीच रंगली.. भले भले चीतपट झाले... तर काहींनी दोस्तीत कुस्ती होऊनही खिलाडूवृत्तीचे उत्तम प्रदर्शन घडवले... या वर्षीच्या थरारक स्पर्धेचा आढावा... 

महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठीची अंतिम लढत ‘अर्जुन’वीर काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्यात झाली. गादी गटातून हर्षवर्धन तर माती गटातून शैलेश अंतिम लढतीला आले. हे दोन मल्ल जिंकून बाहेर आल्यावर या दोघांच्या समवेत काकांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा काकांना विचारण्यात आले, ‘हे दोन्हीही मल्ल तुमचेच आहेत. मग या दोघांपैकी तुमचा आशीर्वाद कोणाला?’ ‘दोघांनाही...’ काका हसत हसत म्हणाले.

हर्षवर्धन आणि शैलेश हे दोघे चांगले मित्र. शिवाय एकाच तालमीत सराव करणारे. ही कुस्ती कशी होईल असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. पण या दोघांनीही सांगितले, ‘आम्ही मित्र असलो तरी आम्ही आखाड्यात गेल्यावर आमची कुस्तीच होणार.’ आणि झालेही तसेच. या दोघांची कुस्ती लक्षवेधी झाली. या कुस्तीत सदगीरने शेळकेवर विजय मिळवला. पण त्या विजयाचा जल्लोष न करता त्याने शेळकेला खांद्यावर घेतले. आखाड्यात फिरवले आणि सगळ्या कुस्तीशौकिनांची मने जिंकली. आखाड्यात हे मित्र झुंजले खरे, पण कुस्ती संपल्यावर मात्र पुन्हा दोस्तीचा अध्याय सुरू झाला.

‘महाराष्ट्र केसरी’साठी यावर्षी अभिजित कटके, बाला रफिक हे दोन महाराष्ट्र केसरी तर सागर बिराजदार, माऊली जमदाडे, गणेश जगताप, सिकंदर शेख, आदर्श गुंड हे आखाडे गाजवणारे पैलवान चर्चेत होते. यांच्याच नावाची चर्चा कुस्तीच्या वर्तुळात होती. गेल्या वर्षीची अभिजित कटके विरुद्ध बाला रफिक शेख यांची लढत, त्याच्या अगोदरच्या वर्षीची अभिजित कटके विरुद्ध किरण भगत यांच्यातील तुफानी लढत, त्यापूर्वी झालेली विजय चौधरी विरुद्ध अभिजित कटके या लढती लक्षवेधी होत्या. गेल्या वर्षी बाला रफिकने अभिजित कटकेला हरवल्याने आणि सतत वर्षभर त्याने तुफानी कुस्त्या केल्याने त्याचे नाव चर्चेत होते. 

लढतीत दिसणाऱ्या पैलवानांची नावे जरी चर्चेत असली, तरी कुस्तीच्या खेळात कधी काय होईल याचा अंदाज कोणालाही येत नाही. कुस्ती हा युक्तीचा खेळ आहे. या खेळात अनेकदा नामवंत मल्लांना धक्का बसला आहे. नामवंत मल्लाला आसमान दाखवत नवा मल्ल उदयास आल्याचा कुस्तीचा इतिहास आहे. कुस्तीत अपेक्षेप्रमाणे काही घडत नाही, असा अनुभव यावेळी कुस्तीप्रेमींना आला आणि जबरदस्त लढती, अनपेक्षित निकाल बघायला मिळाले. माऊली जमदाडेने केलेला महाराष्ट्र केसरी बाला रफिकचा पराभव आणि हर्षवर्धन सदगीरने केलेला महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेचा पराभव आणि विजयाच्या दिशेने आगेकूच करत असलेल्या माऊली जमदाडेचा शैलेश शेळकेकडून माती गटात झालेला पराभव या सगळ्या लढती अविस्मरणीय आहेत. सिकंदर शेख विरुद्ध गणेश जगताप ही लढत अशीच लक्षवेधी ठरली. पैलवान जिंकले, पैलवान हरले यापेक्षा ‘ते लढले कसे’ याचीच चर्चा होताना दिसली.

सागर बिराजदार विरुद्ध आदर्श गुंड यांच्या लढतीत सागर विजयी झाला. अभिजित कटके विरुद्ध सागर बिराजदार या लढतीत अभिजितची सरशी झाली. माती गटात सिकंदर शेखचे आव्हान गणेश जगतापने थोपवले. बाला रफिक विरुद्ध माऊली जमदाडे यांची कुस्ती डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. दोन्हीही ताकदीचे मल्ल. या कुस्तीचा अंदाज करणे कठीण होते. कारण दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकवेळा महाराष्ट्र केसरी झालेल्या अभिजित कटकेला गेल्यावर्षी बाला रफिकने हरवले होते, तर माऊली जमदाडे यांचीही बाला रफिकसोबत कुस्ती झाली होती. त्यामुळे तसा अंदाज येत नव्हता. मात्र, माऊलीने बालाच्याच हप्ते या हुकमी डावावर बालाला चीतपट केले. बाला स्पर्धेतून बाहेर पडला. त्याचे आव्हान संपुष्टात आले. यानंतर मात्र सगळ्यांच्या नजरा अभिजित कटकेकडे लागल्या. कारण अभिजीतपुढे बाला रफिकचे आव्हान होते. या दोघांमध्येच अंतिम लढत होईल, असे कुस्तीशौकिनांत बोलले जात होते. नंतर काही वेळात झालेल्या हर्षवर्धन सदगीर विरुद्ध अभिजित कटके यांच्या लढतीत भल्या भल्यांचे अंदाज चुकले. हर्षवर्धन सदगीरने अभिजित कटकेला हरवले.

लातूरच्या शैलेश शेळके याने माती गटात माऊली जमदाडेला हरवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्याच दिवशी महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी हर्षवर्धन आणि शैलेश यांच्यात लढत होणार हे नक्की झाले. जी नावे चर्चेत होती ती बाहेर पडली होती. काका पवार यांचे दोन पठ्ठे आता गदेसाठी झुंजणार होते. ‘महाराष्ट्र केसरी’ आणि ‘उपमहाराष्ट्र केसरी’ हे दोन्ही किताब पवार यांच्याच तालमीला मिळणार याचा आनंद त्यांच्या तालमीत साजरा होत होता.

महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे. वयाच्या अकराव्या वर्षी तो कुस्तीचे धडे घ्यायला नाशिक येथील भगूरमधील बलकवडे तालमीत गेला. तिथे त्याने सरावाला सुरुवात केली. त्याला गोरखनाथ बलकवडे यांनी कुस्तीचे धडे दिले. नंतरच्या सरावासाठी तो पुण्याला काका पवार यांच्याकडे आला. काका पवारांकडे आल्यावर त्याचा सराव गतिमान झाला. कुस्ती जगतात त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय विद्यापीठ ग्रीक रोमन कुस्तीत यश मिळवले आहे. महाराष्ट्र केसरी झालेल्या दोन कुस्तीविरांवर मात करत त्याने यावर्षी मिळवलेली गदा ही त्याच्या यशाच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे.

या लढतीतील उपविजेता शैलेश शेळके याने ‘मी पराभूत झालो आहे, असे मला वाटत नाही. आम्ही दोघेही या गदेचे मानकरी आहोत. मी पुढच्या वर्षी पुन्हा मैदानात उतरून विजयी होईन..’ असा विश्वास व्यक्त केला.

गदेचा इतिहास
कुस्तीविश्‍वात ‘महाराष्ट्र केसरी’ होणाऱ्या पैलवानाला मानाचे स्थान असते. महाराष्ट्र केसरीची गदा मिळावी म्हणून शेकडो मल्ल अहोरात्र सराव करत असतात. जी महाराष्ट्र केसरीची गदा दरवर्षीच्या कुस्ती अधिवेशनात दिली जाते ती गदा मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबाकडून दिली जाते.

सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून गदा दिली जात होती. मात्र, १९८४ पासून कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ मोहोळ कुटुंबीय गदा देतात. गेल्या ३५ वर्षांपासून त्यांनी ही प्रथा सुरू केली आहे. याबाबत माजी खासदार अशोकराव मोहोळ म्हणाले, ‘मामासाहेब मोहोळ यांनी महाराष्ट्रात कुस्ती वाढावी म्हणून प्रयत्न केले. त्यांनी कुस्तीगिरांची संघटना स्थापन केली. कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ आम्ही महाराष्ट्र केसरीच्या विजेत्या मल्लास चांदीची गदा देण्याची प्रथा सुरू केली आहे.’

सन १९८४ पासून मोहोळ कुटुंबाने गदा देण्याची प्रथा सुरू केली. ही गदा प्रदीप प्रतापराव पानगरी तयार करतात. गदेची उंची २७ ते ३० इंच, व्यास ९ ते १० इंच, तर वजन १० ते १२ किलो असते. गदेचा आतील भाग लाकडी असतो. वरच्या भागावर पानगरी यांनी केलेले चांदीचे कोरीव नक्षीकाम असते. बाहेरच्या दिसणाऱ्या बाजूला ३२ गेज चांदीचा पत्रा वापरला जातो. गदेच्या मध्यभागी  मामासाहेब मोहोळ यांचा फोटो असतो.

अटकळे बंधू सुवर्णपदकाचे मानकरी
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मुख्य लढतीसोबत अनेक प्रेक्षणीय लढती झाल्या. त्यात काही मल्लांनी मिळवलेले यश उल्लेखनीय होते. पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील आबासाहेब अटकळे आणि जोतिबा अटकळे या दोन भावांनी सुवर्णपदक मिळवले. विशेष म्हणजे हे दोन्ही भाऊ सत्तावन्न वजनी गटात लढले. माती गटातून आबासाहेबने, तर गादी गटात जोतिबाने सुवर्णपदकाची कामगिरी केली.

‘अटकळे बंधूंच्या यशाची आखाड्यात खूप चर्चा होती. त्यांचे वडील बजरंग अटकळे हे स्वतः नामांकित पैलवान होते. त्यांनी विष्णू सावर्डे, दिनानाथ सिंह, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर, श्रीपती खांचनाळे यांच्या तालमीतल्या पैलवानांशी कुस्त्या केल्या होत्या. त्यांनी आपली मुले पैलवान व्हावीत म्हणून खूप परिश्रम केले. आजही ते मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पंढरपुरात बजरंग यांना तेव्हा कुस्तीत चार आणे बक्षीस मिळाले होते, तेव्हापासून त्यांना कुस्तीची प्रेरणा मिळाली. आता त्यांची ही दोन्ही मुले देशपातळीवर चमकतील.’ असा विश्वास त्यांच्याच गावचे कुस्तीप्रेमी गणेश अटकळे यांनी व्यक्त केला.

यावर्षीच्या कुस्ती अधिवेशनाचे प्रायोजक अमनोराचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे होते. टेबलटेनिस, चेस यासारखे खेळ वाढावेत म्हणून त्यांनी प्रायोजकत्व घेतले. यावेळी ते कुस्तीसाठी पुढे आले. देशपांडे म्हणाले, ‘कुस्ती महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. आपल्याकडचे अनेक कुस्तीगीर ऑलिंपिकमध्ये चमकू शकतात, पण त्यांच्या पाठीशी शक्ती उभा राहिली नाही. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा ऑलिंपिकसाठी खेळाडू शोधण्याची मोहीम आहे. इथे जे गुणवंत खेळाडू सापडतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. मला तशी कुस्तीबद्दल फारशी ओढ नव्हती, पण दोन वर्षांपूर्वी भूगाव येथे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा बघायला गेलो होतो. तेव्हा आखाड्यात पैलवान लढत असताना बघायला आलेले प्रेक्षक त्यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद देत होते. त्यांचे कौतुक करत होते. काहीजण लढणाऱ्या पैलवानास बाहेरून मार्गदर्शन करत होते. ते पाहून मला जाणवले, इथल्या माणसांच्या नसानसांत कुस्ती भिनलेली आहे. पण खेळाडूंना जेवढे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळायला हवे तेवढे मिळत नाही. कुस्ती गावोगावी आहे. कुस्ती आवडणारा माणूस घराघरांत आहे. मात्र, खेळाडूंना ऑलिंपिकमध्ये फारसे चमकता आलेले नाही. मग या खेळाडूंसाठी काहीतरी करावे असे वाटू लागले. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून कष्टकऱ्यांची पोर कुस्तीत करिअर करण्यासाठी झगडत आहेत. त्यांना ऑलिंपिकपर्यंत पोचवण्यासाठीच आमचा प्रयत्न राहील.’

आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीसाठी ज्या टेक्निकल गोष्टींची आवश्यकता असते, त्या आपल्या राज्यातील पैलवानांना मिळत नाही. त्यामुळे आपली मुले मागे पडतात. गुणवत्ता असूनही तांत्रिकदृष्ट्या त्यांची पीछेहाट होते. असे मत व्यक्त करताना या स्पर्धेतून जागतिक पातळीवर लढतील अशा खेळाडूंची निवड करून त्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी घेण्याची तयारी देशपांडे यांनी दाखवली आहे. ते पंधरा खेळाडूंना दत्तक घेऊन त्यांच्या ऑलिंपिकपर्यंतच्या खर्चाची सगळी जबाबदारी घेणार आहेत.

हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी झाला. त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा गदा मिळाली आहे. त्याचे गुरू गोरखनाथ बलकवडे यांनी महाराष्ट्र केसरी गदा मिळावी म्हणून प्रयत्न केले होते, राजू लोणारी यांनीही प्रयत्न केले होते, पण या दोघांनाही गदा मिळाली नाही. हर्षवर्धनने ज्या तालमीत सराव केला, त्या काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्रालाही पहिल्यांदाच गदा मिळाली आहे. अकोले तालुक्यालाही त्याच्यामुळे पहिल्यांदाच मानाची गदा मिळाली आहे.

संबंधित बातम्या