समुद्रापलीकडचा कोकण

शिरीष दामले 
बुधवार, 28 मार्च 2018

निसर्गाने सृष्टीसौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर कोकणातच आले पाहिजे. अप्रतिम समुद्र किनारे, उंचच्या उंच कडे, डोंगरांचे सुळके, खोल दऱ्या, डोंगरमाथ्यांवरील वनराई, दाट जंगल, नितांत सुंदर खाड्यांचे प्रदेश आणि नागमोडी वळणे घेत जाणारे घाट रस्ते असा कोकणचा प्रदेश अनुभवायचा असेल तर भटकंतीची रग अंगात पाहिजे.

कोकणातील सौंदर्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील वैविध्य. लोकजीवन, लोकरहाटी, नद्या, नाले, ओढे, पाऊस, समुद्र, खाड्या, दाट वनराई, ऐतिहासिक स्थळे, प्राचीन मंदिरे, आधुनिक साज ल्यालेली तीर्थक्षेत्रे या साऱ्याची अनुभूती दर ऋतूमध्ये वेगळी. कोणाला अतिशयोक्ती वाटेल; परंतु वर्षातील कोणत्याही दिवसात कोकणात पर्यटनाचा आनंद लुटता येतो. पावसातील कोकण वेगळे, हिवाळ्यातील कमी पाऊस किंवा अत्यल्प पाऊस आणि कमी ऊन अर्थात कमी घाम असा कालावधी; तर मे महिन्याची महती वेगळी सांगायला नकोच. हापूस, काजू आणि फणसाने ती जगभरात पोचवली आहे. मात्र कोकण एवढेच नाही. या पलीकडेही भटकंती करण्याची रग असेल, पायी फिरण्याची हौस असेल, निसर्गाच्या कुशीत बागडण्याची आवड असेल, साहस दाखवत डोंगरदऱ्या पार करावयाच्या असतील, दर्याच्या अंगाखांद्यावर खेळायचे असेल, आकाशाला गवसणी घालणाऱ्या माडावरचे नारळ उतरवायचे असतील, समुद्राच्या गाजेसोबत डोलणाऱ्या पोफळींखाली आपल्यालाही साद घालायची असेल तर हे सारे फक्त कोकणात आणि कोकणातच मिळू शकते. 

कोकणात पावसाचा आनंद मनमुराद घेता येतो. पावसाळा संपला, की नंतरच्या काळात पावसाविना फिरण्याची गंमत आजूबाजूची हिरवळ अधिकच वाढवते. या साऱ्या परिसरातील पर्यटनाची मोठी ठिकाणे आता साऱ्यांना माहीत झाली आहेत. किनारे तर प्रसिद्ध आहेत. काही धार्मिक स्थानेही प्रसिद्ध आहेत. परंतु त्यापलीकडे फिरण्यासाठी कोकणात वैशिष्ट्यपूर्ण तेवढीच वैविध्यपूर्णही ठिकाणे आहेत. ऐतिहासिक स्थानांची महती ज्याला भावते, इतिहासाचे ज्याला प्रेम आहे आणि किल्ले पायाखालून घालण्याची आवड आहे, अशांसाठी मालवणच्या सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गपासून ते मंडणगडमधील बाणकोट आणि त्याही पलीकडे मुरूड-जंजिरा अशी वेगवेगळ्या किल्ल्यांची आव्हाने उभी आहेत. जलदुर्गांना भेट देताना दर्याची विविध रूपे अनुभवता येतात. शिवाय ऐतिहासिक वास्तुंचा आनंदही घेता येतो. प्रसिद्ध पावलेले आणि पर्यटनासाठी सुखसोईंनीयुक्त असे गड वगळले तरी साहसवीरांना पार करण्यासाठी छोटे-मोठे किल्ले सह्याद्रीच्या कुशीत आहेतच. 

मंडणगड तालुक्‍यातील बाणकोट किल्ला असो किंवा खेडमधील रसाळगड, सुरमाडगड अथवा महिपतगड असो. गुहागर तालुक्‍यात अंजनवेलचा गोपाळगड आहेच. संगमेश्‍वरातील प्रचितगड म्हणजे ट्रेकर्ससाठी आव्हानच. याशिवाय छोट्या-मोठ्या गढ्या. या छोट्या किल्ल्यांवरून पावसातील भटकंती म्हणजे फिरणाऱ्याचा कस लागतो. 

कोकणातील ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिरांचा उल्लेख वेगळा करण्याची गरज नाही. दिवसेंदिवस पर्यटक कोकणात येऊ लागल्याने कुणकेश्‍वर असेल, रामेश्‍वर असेल, धूतपापेश्‍वर, गणपतीपुळे, मार्लेश्‍वर, कर्णेश्‍वर, चिपळूणचा पर्शुराम, गुहागरमधील व्याडेश्‍वर, आंजर्ल्याचा कड्यावरचा गणपती, दाभोळमधील चंडिकादेवी ही अशी प्रसिद्ध नावे; परंतु याच्या पलीकडेही कोकणात तुलनेने कमी प्रसिद्ध परंतु अप्रतिम मंदिरे आहेत. 

केळशीतील महालक्ष्मी, खेडमधील लेणी, दापोली पन्हाळकाझी येथील लेणी, दाभोळमधील मशीद, हर्णेमधील एकनाथ मंदिर, चिपळूणमधील लोटणशहाचा दर्गा, गुहागरमधील मळण येथील आनंदीबाईचा वाडा, पेशवेकालीन तलाव, हेमाडपंती मंदिर याचबरोबर मुंबई-गोवा हायवेपासून जेमतेम १५ कि.मी. आत असलेले तळ्यातील मल्लिकार्जुन मंदिर, सह्याद्रीच्या माथ्यावरील टिकलेश्‍वर अशी एक ना अनेक स्थाने सिंधुदुर्गात बांद्यापर्यंत पाहता येतात. यासाठी थोडा संयम हवा, थोडे चालायची तयारी हवी आणि सुखासीन पर्यटनापेक्षा उघड्या-बोडक्‍या निसर्गात फिरण्याची तयारी हवी. कोकणातील पावसाळा म्हणजे आनंदाचा ठेवा आहे. धो-धो पडणारा पाऊस अंगावर घेत भटकंती करण्यासाठी सचैल भिजण्याची तयारी हवी. आषाढधारा कोसळतात तेव्हा मुसळधार पाऊस म्हणजे काय चीज असते हे समजते. पावसाला महिनाभर झाला नाही, तोच सृष्टी कसे रूप पालटते याची वैविध्यपूर्ण रूपे कोकणातच पाहायला मिळत असतील. १० मैलांवर जशी भाषा बदलते तसा हल्ली कोकणात पाऊसही बदलायला लागला आहे. दर १५ दिवसांनी एकाच प्रदेशात पुन्हा पुन्हा गेलात तर जून ते ऑक्‍टोबर या काळात पावसाची विविध रूपे, शिवाय बदलणारी सृष्टीही पाहायला मिळते. त्यासाठी थेट निसर्गात जायला पाहिजे. 

डोंगरमाथ्यावरील वाऱ्यासह घोंगावणारा पाऊस वेगळा, दरीत कोसळणाऱ्या धारांचे नृत्य वेगळे, डोंगरमाथ्यावरुन प्रपातासारखे कोसळणारे पावसाचे पाणी थोडे भीतीदायक, परंतु पाऊस शांत झाला की अर्ध्या तासात त्याच पाण्याचा शुभ्र धवल धबधबा आणि त्याचा कानात साठणारा नाद अशी लोभावणारी रूपे काही तासाच्या फरकातच कोकणात अनुभवायला मिळतात. कधी कधी दोन-दोन, तीन-तीन दिवस सूर्य डोकावत नाही. अशा वेळी शेतात काम करणारी माणसे बघून कोकणी माणसांचे कौतुकच वाटेल हेही अनुभवायला हवेच. कधी कधी याच पावसाचे रौद्र रूप अनुभवायला मिळते. त्यासाठी पूरच येण्याची गरज नाही. कोणत्याही कडेकपारीतून काही ठराविक काळातच असा काही पाऊस कोसळतो की निसर्गाचे हे अफाट रूप पाहून हडबडायला होते. कोकणातील असा सारा पाऊस अनुभवायचा असेल, तर पावसातच मुशाफिरी करायला हवी. उत्तम रेनकोट वा जाकीट घालून पावसाची गंमत कशी अनुभवता येणार. त्यासाठी पावसाच्या धाराबरोबर भिजत नाचायला हवे. पावसामुळे तुडुंब भरलेल्या नद्या, ऐन पावसात आणि पाऊस थांबला की थोड्या वेळात रूप बदलणाऱ्या नद्या व खाड्या आजूबाजूची वनराई, खळाळत जाणारे ओहोळ आणि पाऊस थांबल्याबरोबर त्यांच्या बारीक होत जाणाऱ्या धारा हीसुद्धा कोकणातील पावसाची एक वेगळीच मजा असते. पावसातील लोकजीवन आणि खाद्यसंस्कृती शिवाय, सण आणि शेतीची कामे हीसुद्धा मन गुंतवून ठेवतात. खरे तर कोकणातील पावसाळी पर्यटन हे फार आकर्षक आहे. परंतु त्याचे अजून पॅकेज करणे कोकणवासीयांना जमले नाही. 

कोकणातील रस्त्यांवर भ्रमंती हाही एक खासा अनुभव असतो. अवघ्या १० मैलाच्या परिसरात रस्त्यांची आणि वाटांची अशी काही मनोहारी रूपे पाहायला मिळतात, की तेथे थांबून विसावा घेतल्याशिवाय पाऊल हलत नाही. कोकणात धबधबे आणि बारमाही धबधबे कमी आहेत. परंतु पावसाळी त्यांची रेलचेल असते. अगदी कुंभार्ली घाट उतरताना पावसाचे रौद्र रूप आणि पाऊस थंडावल्यावर शेकडो धबधब्यांचे नाद. प्रत्येक घाटाचे सौंदर्य वेगळे. कुंभार्ली वेगळा, अणुस्कुरा वेगळा, कशेडी त्याहून वेगळा, भुईबावड्याची उंची थरकाप उडविणारी. तरीही मन मोहून टाकणारी. कोकणात अशा अनेक छोट्या घाट्या आहेत किंवा घाट आहेत. त्यांचा आनंद लुटण्यासाठी वेगावर स्वार होण्यापेक्षा वेग नियंत्रित करण्याचीच गरज भासते. वेगवेगळ्या खाड्यांच्या शेजारून जाणारे रस्ते किंवा त्यावरील पूल आणि सागरी महामार्ग यावरून सावकाश आणि सावधपणे प्रवास डोळे उघडे ठेवून केला तरी निसर्गाची लयलूट अनुभवता येते. कोकण रेल्वेचा जून ते डिसेंबर जानेवारी अखेरपर्यंतचा प्रवास म्हणजे केवळ पर्यटनच. रेल्वेमार्गासाठीच्या खोदकामाने पर्यावरणाची हानी झाली हे खरेच; परंतु अनेक सौंदर्यस्थळेही निर्माण झाली आहेत. पावसाळ्यात तर या मार्गावरची शोभा अवर्णनीय असते.

कोकणातील मुशाफिरी ही विविध कारणांसाठी करता येते. सिंधुदुर्गातील गूढ निसर्गरम्य परिसर, तेथील लोकजीवन, जत्रा, तेथील अंधश्रद्धा, त्यामुळे निर्माण होणाऱ्या परंपरा, सण साजरे करण्याची वेगळी पद्धत, देवावर माणूसपण लादून माणूस आणि देवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न याचा अनुभव निकोप मनाने घ्यायचा असेल तर त्यासाठी येथे भटकंतीच करायला हवी. धाविर म्हणजे महिला महिलांमध्येच एक प्रथा म्हणून लग्न का लावतात या प्रश्‍नाचे उत्तर हवे असेल तर सिंधुदुर्गात यायला नको का? देव भेटतो, देवादेवांची भेट होते आणि त्यासाठी ते आपली मंदिरे सोडून समुद्र किनारी जात असतात हे पटवून घ्यायचे तर येथे यायलाच पाहिजे. अगदी भुताची फेरी अनुभवायची असेल तर खारेपाटणला यायलाच हवे. अशा एक ना अनेक सांस्कृतिक अनुभवांसाठी पर्यटन करायला काय हरकत आहे. मुंबईतल्या थिएटरमध्ये दशावतार बघण्यापेक्षा सिंधुदुर्गातील कानाकोपऱ्यात पारावर चालणाऱ्या दशावताराचे गारुड काही वेगळेच. थोड्याफार फरकाने रत्नागिरी जिल्ह्याचे चित्र तसेच. रत्नागिरीतील शिमगा अनुभवण्यासाठी त्या काळात पर्यटन करायला हवे. पालख्यांचे नृत्य टीव्हीसमोर बसून पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी येऊन त्या नृत्यातील बेहोशी आणि भक्तांचे देवाशी होत असलेले अद्वैत अनुभवता येणार नाही. 

मुक्तनाट्याचे कौतुक आणि ब्रेख्तची शैली वगैरे सगळे विद्वत्तापूर्ण ठीकच; परंतु रत्नागिरी जिल्ह्यात उघड्या पारांवर होणारी नमने अथवा नमन म्हणजे मुक्तनाट्याचा असा काही आविष्कार असतो की भल्याभल्यांनी तोंडात बोट घालावे. नेपथ्याविना अथवा सेटविना रंगणारे नाट्य पाहायला येथे मुशाफिरी करायलाच हवी. राजापूरची गंगा सर्वज्ञ; परंतु गुहागर तालुक्‍यात अडूर आणि कोरकारूळ तर चिपळूण तालुक्‍यात तिवरे येथे गंगा येते. ती पाहण्यासाठी खास कोकणात घुसायला हवे. गरम पाण्याची कुंडे आणि गंगा यांचा शास्त्रीय शोध घेण्यासाठी जाणकारांची पावले कोकणातच वळतात. 

ज्याला जशी आवड तसा तो फिरू शकतो ते कोकणातच! ज्याला लोकजीवनाचा अभ्यास करायचाय, त्याच्यासाठी कितीतरी संधी. दर २० मैलावर जीवनमानाची शैली बदलते. दर्यावर्दी लोकांचे जीवन वेगळे, दऱ्याखोऱ्यातून राहणाऱ्या लोकांची राहणी वेगळी. येथे लोकांना ट्रेकिंगला वेगळे जावे लागत नाही. शाळा-कॉलेजला जाणारी मुले आणि बाजारला जाणाऱ्या बाया-बापड्याही साहसपूर्ण वाटावी अशा वाटाच तुडवत जातात हे अनुभवायचे असेल, तर अशा वाड्यावस्त्यांवरून भटकंती करण्यासाठी कोकणात भरपूर वाव आहे. चिं. त्र्यं. खानोलकरांचा कोंडुरा पाहायला जावे असे कोणाला वाटले तर सिंधुदुर्गात फिरावे. दळवींचा (ते देव मानत नसले तरी रक्षणकर्ता) वेतोबा आरवली, कवी वसंत सावंतांचा सिंधुदुर्ग आणि आगळा, केशवसुतांचे मालगुंड आणि श्री. ना. पेंडसेंच्या अफाट बापूची गारंबी कोठे याबाबत जर कुतूहल असेल तर त्यासाठीही भटकंती करता येते. ही सारी ठिकाणे साहित्यातून अजरामर झाली ती प्रत्यक्षात अनुभवता येतात. कोकणातला निसर्गच एक व्यक्ती म्हणून साहित्यात का उभा राहतो हे जाणण्यासाठी येथे जाण्याशिवाय पर्याय नाही. 

कोकणात अनेक गमतीजमतीही अनुभवायला मिळतात. काही गूढ अजूनही तशीच आहेत. काही चमत्कारी बाबींमागील शास्त्रीय सत्य वा विज्ञान उलगडून न पाहिल्यामुळे चमत्काराच्या पातळीवर या गोष्टी अजूनही सुरू आहेत. प्रा. प्र. के. घाणेकरांसारख्या जाणत्याबरोबर कोकणात भटकंती केली तर ती किती बहुआयामी होऊ शकते याचा पडताळाच घ्यायला हवा. नांदवड नापण येथे वर्षभर कोसळणाऱ्या धबधब्याखाली तयार झालेली वालुकाश्‍म २० लाख वर्षांपूर्वीची आहेत. राजापूर बारसू येथे तारवाच्या सड्यावर दगडात कोरलेली चित्रे आहेत. कोकणात अशा प्रकारे सुमारे आठ ठिकाणी खोदचित्रे आहेत. जाणत्याची नजर असेल तर कोकणातील दगडांची श्रीमंतीही अनुभवता येते. ती अनुभवली नाही तर फक्त आपली दगडाचीच भ्रमंती. कासार्डे गोठण्याचा डोह येथे प्रचंड बुडबुडे दिसतात. सिंधुदुर्गात बुधवड्याजवळ मोबाडेश्‍वराचे मंदिर आहे. तेथील पाण्यात ‘बुडबुड्या ये’ असा आवाज दिला, की असंख्य बुडबुडे येतात. चिपळूणजवळील गौतमेश्‍वराच्या मंदिरात अभिषेकाच्या धारा पडल्या की पिंडीतून आवाज येतो. पाचलजवळील अर्जुना नदीच्या पात्रातील दगडातूनही नाद येतो. मालवणजवळील मोरयाचा धोंडा हाही एक दगडाचा वेगळा प्रकार. राजापूर कोटकामथे येथील जुनी घरे विशिष्ट दगडांची आणि आजही तेथे दगडी भांडी मिळतात. या साऱ्या बाबी अनुभवण्यासाठी कोकणात भटकंतीला यावे असे नाही वाटणार...! 

पठडीतील पॅकेजपूर्ण पर्यटनाच्या जोडीला कोकणात येण्यासाठी भरपूर कारणे आहेत. अगदी शांत, निवांत देवाची भूमी असल्यागत सौंदर्यसंपन्न ठिकाणी शांतता अनुभवण्यासाठी, मेडिटेशनसाठी कोकणाइतके परिपूर्ण ठिकाण नाही. येथील जैवविविधता आणि सौंदर्यामधील विविधता ही अभ्यासासाठीही उपयुक्त आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातील वनौषधींसाठी रानोमाळ केलेली भटकंती आयुष्यभराची शिदोरी ठरेल यात शंकाच नाही. मात्र त्यासाठी थोडी मळलेली वाट सोडून कोकणातील पायवाटांवरून वाटचाल करण्याची तयारी हवी. शब्दशः थोडासा घाम गाळण्याची तयारी हवी. त्याची फिकीर बाळगली नाही आणि कलंदर वृत्तीने भटकायचे ठरविले तर अशा भटकंतीसाठी कोकणला पर्याय नाही. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या